फोटो सौजन्य सोशल मीडिया
डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅट्सना काँग्रेसमध्ये बहुमत मिळाल्यास त्यांच्या सरकारच्या धोरणांना विरोध करणारी विधेयके मंजूर होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. न्यूयॉर्क पोस्टला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी, रिपब्लिकन पक्षाचा पराभव झाल्यास आपण प्रत्येक विधेयकावर व्हेटो वापरू, असे म्हटले होते.
यासाठी त्यांनी स्वतःला ‘मिस्टर व्हेटो’ असे संबोधले. सुरुवातीला काही महिने विधेयकांना नकार देऊन त्यानंतर विरोधकांना चर्चेच्या टेबलावर आणण्याची रणनीतीही त्यांनी मांडली होती. त्यामुळे आगामी काळात व्हाइट हाऊस आणि काँग्रेस यांच्यात संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
USA News : अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठी झेप; ऑक्टोबरमध्ये १ लाख ६५ हजार नव्या नोकऱ्यांची भर
डेमोक्रॅट्सना काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांमध्ये वर्चस्व मिळाल्याने ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांवर नियंत्रण ठेवण्याची संधी विरोधकांना मिळणार आहे. सरकारी खर्च, कायदे आणि महत्त्वाच्या नियुक्त्यांबाबत डेमोक्रॅट्स प्रशासनाला अडचणीत आणू शकतात.
विशेषतः सरकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना मंजुरी देणे, प्रशासनाच्या निर्णयांची चौकशी करणे आणि विविध विधेयकांवर चर्चा घडवून आणणे, अशा माध्यमांतून विरोधक सरकारवर दबाव वाढवू शकतात. दुसरीकडे, राष्ट्राध्यक्षांकडे असलेला व्हेटोचा अधिकार ट्रम्प यांच्यासाठी महत्त्वाचे राजकीय अस्त्र ठरू शकतो. मात्र, काँग्रेसमधील दोन्ही सभागृहांमध्ये दोनतृतीयांश बहुमत मिळाल्यास राष्ट्राध्यक्षांचा व्हेटोही निष्प्रभ करता येतो.
Pakistan Breaking : पाकिस्तान बुडाला दुप्पट कर्जात; १३५ अब्ज डॉलर पार,चीन सर्वात मोठा कर्जदाता
निवडणुकीपूर्वी डेमोक्रॅट्सच्या प्रत्येक विधेयकाला विरोध करण्याची भूमिका मांडणाऱ्या ट्रम्प यांनी निकालानंतर मात्र काहीशी मवाळ भूमिका घेतली. डेमोक्रॅट्सनी निवडणुकीत चांगली कामगिरी केल्याचे मान्य करत देशाच्या हितासाठी त्यांच्यासोबत काम करण्याची तयारी त्यांनी दर्शवली.
विरोधी पक्षातील अनेक नेत्यांचे फोन आल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, प्रशासनाच्या धोरणांवरून दोन्ही पक्षांमधील मतभेद कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेतील आगामी राजकीय वातावरणात विधेयकांवरील संघर्ष, सरकारी निर्णयांची चौकशी आणि राष्ट्राध्यक्षांच्या अधिकारांवरून मोठी राजकीय रस्सीखेच पाहायला मिळू शकते.






