Keir Starmer
युनायटेड किंगडम: ब्रिटनमधील निवडणुकांचे निकाल समोर आले असून, 14 वर्षांनंतर लेबर पार्टी पुन्हा सत्तेत आली आहे. मजूर पक्षाने बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. या वेळी निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे ऋषी सुनक आणि मजूर पक्षाचे कीर स्टार्मर (keir starmer) समोरासमोर उभे होते. मात्र, सुनक यांना दारूण पराभव दिल्यानंतर स्टारर यूकेच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.
मजूर पक्षाच्या या यशाचे श्रेय द्यावे लागेल ते कीर स्टार्मर यांना. पक्ष गेल्या 85 वर्षात सर्वात वाईट पराभवाला सामोरे जात असताना स्टार्मर यांनी 2020 मध्ये मजूर पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. त्यावेळी स्टार्मर यांनी मजूर पक्षाला पुन्हा सत्तेत आणणे हे आपले ध्येय बनवले होते. त्यांचे हे ध्येय आज सत्यात उतरले आहे. कीर स्टार्मर हे आता ब्रिटनचे 58 वे पंतप्रधान होणार आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व सुनकच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. सुनक हे स्वत:चे प्रचंड धार्मिक व्यक्ती म्हणून ओळख सांगतात.तर स्टार्मर हे अजिबात देवावर विश्वास ठेवत नाही.
भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचा पराभव करणाऱ्या स्टार्मर यांची कहाणी अतिशय रंजक आहे. कीर यांच्या नावे अनेक विक्रम आहेत. कीर यांचा जन्म 2 सप्टेंबर 1962 रोजी लंडनमधील साउथवार्कमधील सरे नावाच्या छोट्या गावात झाला. कीयर यांची आई नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये परिचारिका म्हणून काम करायच्या. तर वडील कारागिराचे काम करायचे.
पण कीर यांच्या आईला स्टिल डिसीज नावाचा आजार होता. 2015 मध्ये प्रथमच ब्रिटीश संसदेत निवडून येण्याच्या काही आठवड्यांपूर्वी कीर यांच्या आईचे निधन झाले. आईच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी वडिलांचेही निधन झाले.
कीर यांच्या कुटुंबात प्रचंड समस्या होत्या पण त्यांचे मन त्यांना शांत बसून देत नव्हते. लहानपणापासूनच ते अभ्यासात खूप हुशार होते. विद्यापीठात जाऊन पदवीचे शिक्षण पूर्ण करणारे त्याच्या कुटुंबातील ते पहिलेच व्यक्ती होते. कीर यांनी लीड्स विद्यापीठात कायद्याची पदवी घेतली. याच ठिकाणी ते लेबर क्लबचे सदस्य बनले. 1985 मध्ये त्यांनी बॅचलर ऑफ लॉ (LLB) पदवी प्राप्त केली. त्यांनी सेंट एडमंड हॉल, ऑक्सफर्ड येथे पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि 1986 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून सिव्हिल लॉ (BCL) पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते बॅरिस्टर झाले.
कीर स्टार्मर 2015 पासून राजकारणात सक्रिय झाले. 2015, 2017, 2019 मधील निवडणुकांमध्ये त्यांनी सलग तीन वेळा विजय मिळवला आणि 2020 मध्ये विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारली. कीर स्टार्मर वयाच्या 16 व्या वर्षापासून राजकारणात सक्रिय होते. त्यांचा कल मजूर पक्षाकडे होता. वयाच्या 16 व्या वर्षी ते लेबर पार्टी यंग सोशलिस्टचे सदस्य झाले. राजकारणासोबतच स्टार्मर हे व्यवसायाने बॅरिस्टर आहेत. त्यांनी नॉर्दर्न आयर्लंड पोलिसिंग बोर्डात मानवाधिकार सल्लागार म्हणूनही काम केले आणि 2002 मध्ये त्यांची राणीचे सल्लागार म्हणूनही नियुक्ती झाली.
2008 मध्ये, स्टार्मर यांनी व्हिक्टोरिया नावाच्या मुलीशी लग्न केले. तिच्याशी लग्न केल्यानंतर अवघ्या एका वर्षात स्टार्मर सार्वजनिक अभियोग संचालक बनले आणि यू.के. क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिसच्या अध्यक्ष झाले. स्टार्मर यांना दोन मुले आहेत. पण त्यांनी कायम आपल्या मुलांना मीडियापासून दूर ठेवले आहे.