Why did China decide to improve relations with India What is the purpose of the Dragon
नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांत भारत-चीन संबंधांमध्ये तणावाचे वातावरण होते. यामुळे भारत आणि चीनच्या बिघडत्या वातावरणामुळे जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात होती. पण गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशातील परस्पर संबंधांना सकारात्मक वळण मिळाले आहे. LAC वरील चीनच्या सैन्य माघारी सहमतीपासून ते मानसरोवर यात्रा सुरु करण्यापर्यंतच्या निर्णयांवर अजूनही विश्वास ठेवणं कठीण आहे. एवढेच नव्हे तर दोन्ही देशांतील यात्रा सेवा देखील पूर्ववत करण्यात येणार आहेत. मात्र चीनने अचानक भारताशी संबंध सुधारण्याचा निर्णय का घेतला आणि यामागे नेमका हेतू काय आहे हा प्रश्न उपस्थित होतोच.
गलवान-डोकलाम वादातून पुढे जाण्याचा प्रयत्न
यापूर्वी भारत आणि चीन संबंध 2020 मध्ये गलवान मधील गस्त आणि डोकलाम वादानंतर कटु झाले होते. कैलास मानसरोवर यात्रा आणि थेट विमानसेवा यावर या वादांचा परिणाम झाला होता. मात्र, आता दोन्ही देश जवळ येत असून संबंध सुधारण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, भारताशी संबंध सुधारण्यामागे अनेक राजकीय व आर्थिक कारणे असू शकतात.
यापूर्वी भारतासोबतच्या तणावपूर्ण संबंधांमुळे चीनला आर्थिक आणि राजनैतिक तोटा सहन करावा लागला होता. यामुळे चीनने आता भारताशी मैत्रीचे हात पुढे केले असल्याचे म्हटले जात आहे. यामागे आर्थिक फायद्याचे समीकरण आणि शेजारधर्म जपण्याचा प्रय्तन आहे.
ट्रम्प यांचे अमेरिकेच्या सत्तेत पुनरागमन आणि चीनवरील दबाव
आणखी एक कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुनरागमनाने चीनसाठी अनेक आव्हान निर्माण झाली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हाती घेताच स्पष्ट संकेत दिले आहेत की, अमेरिकेला तोटा करणाऱ्या देशांवर टॅरिफ वाढवले जाईल. यामुळे चीनला भारतासोबत संबंध सुधारून नवा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ट्रम्प यांच्या पुनरागमनामुळे चीनच्या चिंतेत वाढ झाली असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
आर्थिक क्षेत्रात संबंध मजबूत
याशिवाय, भारत हा मोठा बाजारपेठ असलेला देशा आहे, यामुळे चीनला भारताशी आर्थिक संबंध मजबूत करणे आवश्यक असून अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याचा प्रारंभ रशियातील कजान शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या बैठकीत झाला. या बैठकीत द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा करण्यात आली.
तसेच, भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्री वांग यी यांची बिजिंगमध्ये भेट घेतली. या भेटीदरम्यान कैलास मानसरोवर यात्रा 2025 च्या उन्हाळ्यात पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, भारत-चीन थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्यावरही सहमती झाली. या चर्चेत दोन्ही देशांनी परस्पर सहकार्य वाढवण्यावर भर दिला.
उच्च स्तरीय बैठका
गेल्या दीड महिन्यांत भारताच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चीनला दोन वेळा भेट दिली असून दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी चर्चा केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी चीनमधील बैठकीत सहा मुद्द्यांवर सहमती दर्शवली. या पावलांमुळे भारत-चीन संबंध सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.