फोटो सौजन्य AI
याच धर्तीवर इराणच्या अणुकार्यक्रमावर लक्ष केंद्रित करत अमेरिकेने आता माहिती मिळविण्यासाठी मोठे आर्थिक प्रलोभन जाहीर केले आहे. अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयाने म्हणजेच सेंट्रल कमांडने शुक्रवारी यासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली. इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित ठिकाणे, उपकरणे किंवा कर्मचाऱ्यांबाबत महत्त्वपूर्ण माहिती देणाऱ्या व्यक्तीला तब्बल २० दशलक्ष डॉलर्सपर्यंतचे बक्षीस दिले जाणार आहे.
विशेष म्हणजे, माहिती देणाऱ्या व्यक्तीला गरजेनुसार सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची सुविधाही देण्याचे आश्वासन अमेरिकेने दिले आहे. त्यामुळे अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या घोषणेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या ‘Rewards for Justice’ या कार्यक्रमांतर्गत ही बक्षीस योजना राबविण्यात येत आहे. इराणमधील अणुसंशोधन केंद्रे, युरेनियम संवर्धनाशी संबंधित उपकरणे, वैज्ञानिक आणि या कार्यक्रमाशी जोडलेल्या इतर कर्मचाऱ्यांची माहिती अमेरिकेला हवी आहे.
केवळ ठिकाणांची माहितीच नव्हे, तर संबंधित उपकरणे किंवा कर्मचाऱ्यांच्या हालचालींबाबत माहिती देणाऱ्यांनाही या योजनेतून बक्षीस मिळू शकते. विशेष म्हणजे, माहिती देणाऱ्या व्यक्तीची सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक असल्यास दुसऱ्या देशात स्थलांतर करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र, २० दशलक्ष डॉलर्सचे सर्वोच्च बक्षीस मिळविण्यासाठी नेमके कोणते निकष असतील, याचा तपशील अद्याप स्पष्ट करण्यात आलेला नाही.
इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) यापूर्वीही चिंता व्यक्त केली आहे. युरेनियम संवर्धनाची पातळी, अणुइंधनाचा साठा आणि सेंट्रीफ्यूजसारख्या महत्त्वाच्या उपकरणांबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याचा मुद्दा अमेरिकेने उपस्थित केला आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, इराणने IAEA च्या सुरक्षा उपायांशी संबंधित जबाबदाऱ्यांचे पालन न केल्यामुळे त्याच्या अणुकार्यक्रमातील महत्त्वाच्या घटकांवर देखरेख ठेवण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आता आर्थिक बक्षिसाच्या माध्यमातून अधिक अचूक माहिती मिळविण्याचा अमेरिकेचा प्रयत्न दिसत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यांमुळे इराणचा अणुकार्यक्रम मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाल्याचे दावे केले आहेत. मात्र, आता त्याच अणुकार्यक्रमाशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी २० दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला उधाण आले आहे. दुसरीकडे, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष संपविण्यासाठी राजनैतिक प्रयत्नही सुरू आहेत.
कतारच्या माध्यमातून दोन्ही देशांमध्ये संभाव्य चर्चेसाठी प्रयत्न होत असल्याचे वृत्त आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेची ही घोषणा इराणवरील दबाव वाढविण्याच्या रणनीतीचा भाग मानली जात आहे. अणुकार्यक्रमाची प्रत्यक्ष स्थिती, त्यातील उर्वरित क्षमता आणि संबंधित यंत्रणेची माहिती मिळविणे हे अमेरिकेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे या निर्णयातून दिसते.






