पुणे : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर उद्घाटनासाठी (Ram Mandir Inauguration) अवघा देश जय्यत तयारी करत आहे. 22 जानेवारी रोजी रामलल्लाची मंदिरामध्ये भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणामध्ये प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. जगभरातील हिंदू बांधवांचे या सोहळ्यावर लक्ष राहणार आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने या ऐतिहासिक सोहळ्याची तयारी करत आहे. दरम्यान, पुण्यातून (Pune) एका तरुणाने पुणे ते अयोध्या असा सायकल प्रवासाचा निर्धार केला आहे. लोकप्रबोधन करत या तरुणाने प्रवास सुरु केला असून येत्या 22 तारखेला तो अयोध्येमध्ये पोहचणार आहे.
मुळचा खान्देश येथील असणारा आशिष दुसाने हा तरुण अयोध्या मंदिर उद्घाटनासाठी सायकलने उत्तर प्रदेशला जाणार आहे. हा तरुण जळगावच्या अमळनेरचा रहिवासी आहे. तो अयोध्येत रामलल्लाच्या उत्सवासाठी शिवजन्मभूमी जुन्नर पुणे ते रामजन्मभूमी अयोध्या अशी सायकलवारी करत आहे. पुण्यातील पुणेश्वर, काशी विश्वेश्वर आणि श्रीकृष्ण भूमी मुक्त करण्याबद्दल तो रामाकडे साकडे घालणार आहे. आज या तरुणाने अमळनेर येथे प्रवेश केल्यानंतर त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले.
आशिष दुसाने हा पुण्यामध्ये मोफत एमपीएससी व यूपीएससीचे मार्गदर्शन देतो. त्याने जुन्नर येथून पाणी व माती घेत ही अनोखी वारी सुरु केली. तो या प्रवासामध्ये गावोगावी थांबत लोकप्रबोधनाचे कार्य देखील करत आहे. राममंदिर, अयोध्या इतिहास, राजकीय व न्यायालयीन लढा याबाबत तो लोकांना माहिती देत आहे. आशिष दुसाने यांच्या प्रवासाचा मार्ग जुन्नरपासून सुरु झाला. जुन्नरहून, संगमनेर , कोपरगाव, मालेगाव, धुळे, अमळनेर येथे संत सखाराम महाराज, मंगळ ग्रह मंदिराचे दर्शन घेऊन इंदौर, उज्जैन, बागेश्वर धाम, मिर्झापूर, काशी, प्रयागराज, सुल्तानपूर प्रतापगड मार्गे तो 22 जानेवारी रोजी उद्घाटनावेळी अयोध्याला पोहचणार आहे






