Pune Railway News : पुणे-दौंड रेल्वे मार्गावर नियमांचा भंग! आरक्षित डब्यांमध्ये घुसखोरीमुळे प्रवासी त्रस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पुणे रेल्वे विभागातील पुणे-दौंड मार्गावर पासधारक प्रवाशांमुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. आरक्षित डब्यांमध्ये प्रवेश करून अनेक प्रवासी जागा बळकावतात. रिकामी सीट दिसताच ताबा घेणे, बर्थवर झोपणे आणि आरक्षण असलेल्या प्रवाशांशी वाद घालणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबासोबत प्रवास करणाऱ्यांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
सकाळी ६ ते ९ आणि सायंकाळी ५ ते ७ या गर्दीच्या वेळेत ही समस्या अधिक तीव्र होते. दरम्यान, तिकीट तपासणी करणाऱ्यांकडून अशा प्रवाशांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आहे. कारवाईचा अभाव असल्यामुळे घुसखोरांचे धाडस वाढत असल्याचे चित्र आहे. या मार्गावर दररोज हजारो प्रवासी नोकरी, शिक्षण आणि व्यवसायासाठी प्रवास करतात. शिवाय उपलब्ध डेमू गाड्याही वेळेवर धावत नसल्याने प्रवाशांचे नियोजन विस्कळीत होते. परिणामी, पर्याय नसल्यामुळे अनेकजण एक्स्प्रेस गाड्यांच्या आरक्षित डब्यांकडे वळतात. याउलट, पुणे-लोणावळा मार्गावर ४२ लोकल गाड्या धावत असल्याने तेथे अशी समस्या तुलनेने कमी आहे.
पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, आरक्षित तिकीट न काढता आरक्षित सीटवर बसून प्रवास करणे हे कायद्याने गुन्हा आहे. प्रवाशांनी रेल्वेतून प्रवास करताना नियम पाळले पाहिजे. जे प्रवासी नियम मोडतात, अशा प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. शिवाय तिकीट तपासणीसाठी विशेष माेहीम रबविले जाते.
प्रवशांची लुटमार करणाऱ्या आणि बेकायदेशीर विक्रेत्यांवर कारवाई
याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पुणे रेल्वे विभागाने रेल्वे प्लॅटफॉर्मवरील विक्रेत्यांवर कारवाई केली होती. प्रवाशांना विनाकारण जास्त किमतीत पाण्याची बॉटल, खायचे सामान विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. तसेच अनाधिकृत विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली होती.






