चीनमधील स्थानिक ऑटोमेकर ‘चेरी ऑटोमोबाईल’ आणि भारतातील टाटा मोटर्सची उपकंपनी असलेल्या ‘जग्वार लँड रोव्हर’ यांच्यातील संयुक्त उपक्रम ‘चेरी जग्वार लँड रोव्हर’ने आपल्या नवीन ‘फ्रीलँडर’ ब्रँडअंतर्गत पहिले मॉडेल लाँच केले आहे. जिआंग्सू प्रांतातील चांगशू येथे आयोजित प्री-सेल कार्यक्रमात हे लाँचिंग पार पडले.
१९९७ ते २०१५ दरम्यान युकेमध्ये उत्पादित झालेल्या लँड रोव्हरच्या प्रसिद्ध अशा एंट्री-लेव्हल कॉम्पॅक्ट SUV चे ‘फ्रीलँडर’ हे नाव या निमित्ताने पुनरुज्जीवित करण्यात आले आहे. आता हे नाव चेरी जग्वार लँड रोव्हरच्या संयुक्त उपक्रमांतर्गत एक स्वतंत्र सब-ब्रँड म्हणून पुन्हा सादर केले गेले आहे.
‘फ्रीलँडर ८’ या एक्स्टेंडेड रेंज इलेक्ट्रिक व्हेईकलच्या प्री-सेलची सुरुवात १४ ऑगस्टपासून झाली आहे. याच्या ५-सीटर मॉडेलची सुरुवातीची किंमत ३,३९,९०० युआन (५०,४३० अमेरिकन डॉलर) आहे, तर टॉप-स्पेक्ट ६-सीटर मॉडेलची किंमत ४,२९,९०० युआन (६३,७८० अमेरिकन डॉलर) ठेवण्यात आली आहे. या गाड्यांच्या चाचणी फेऱ्या मध्य पूर्वेतील देशांमध्ये स्थानिक रस्त्यांवर सुरू झाल्या आहेत. या वर्षी सप्टेंबरमध्ये अबू धाबी येथे ब्रँडच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
‘फ्रीलँडर ८’ हे मॉडेल चेरीच्या E0X ८००-व्होल्ट प्लॅटफॉर्मवर आधारित असून, यामध्ये १.५-लीटर रेंज एक्सटेंडर इंजिन आणि ६०-किलोवॉट-अवरची CATL बॅटरी पॅक देण्यात आली आहे. यातील ड्युअल इलेक्ट्रिक मोटर्स ८१८ hp ची कमाल पॉवर जनरेट करतात. केवळ BEV (बॅटरी इलेक्ट्रिक) मोडवर चालताना, ही बॅटरी ३१० किमीची रेंज देते.
या मॉडेलमध्ये हुआवेईची ‘ADS 5’ ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरद्वारे संचलित कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञान समाविष्ट आहे. तसेच, यात ‘i-ATS’ ही इंटेलिजंट ऑल-टेरेन सिस्टम देण्यात आली आहे, जी वेगवेगळ्या रस्त्यांच्या परिस्थितीनुसार सस्पेंशन सेटिंग्ज आपोआप ॲडजस्ट करते. फ्रीलँडर ८ चे उत्पादन चांगशू येथील संयुक्त उपक्रमाच्या वर्षाला २ लाख वाहनांची क्षमता असलेल्या अत्याधुनिक प्लांटमध्ये केले जात आहे. यासाठी ३ अब्ज युआनचा निधी खर्चून प्लांटचे अपग्रेडेशन करण्यात आले आहे. हा प्रकल्प फ्रीलँडर मालिकेचा मुख्य उत्पादन बेस म्हणून काम करेल. पुढील पाच वर्षांत या मालिकेत BEV, PHEV आणि EREV सह एकूण सहा मॉडेल्सचा विस्तार केला जाण्याची अपेक्षा आहे.
अपग्रेड केलेल्या या प्लांटमध्ये १,१०० हून अधिक रोबोट्स, संपूर्ण स्वयंचलित बॉडी शॉप आणि डिजिटल क्वालिटी ट्रॅसेबिलिटी सिस्टम आहे. यामुळे उत्पादनात उच्च दर्जाची अचूकता आणि सातत्य राखणे शक्य होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.



