भारतात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाऱ्याच्या वेगाने वाढत आहे. गाड्या कितीही आधुनिक झाल्या, तरी त्यांचे स्पेअर पार्ट्स ठराविक काळानंतर बदलावेच लागतात. यामुळेच ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्सचा व्यवसाय हा अगदी बारा महिने चालणारा एक अत्यंत हमखास नफा देणारा बिझनेस ठरत आहे. जर तुम्हाला या क्षेत्रात स्वतःचा पाय रोवायचा असेल, तर पुढील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही तुमचे नियोजन करू शकता,
मार्केट रिसर्च आणि प्रकारांची निवड
व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुमच्या भागातील वाहनांचा कल समजून घेणे गरजेचे आहे. तुमच्या परिसरात दुचाकी जास्त आहेत की चारचाकी, त्यावरून तुम्ही ‘मल्टीब्रँड स्पेयर पार्ट्स’ दुकान किंवा एखाद्या विशिष्ट ब्रँडचे अधिकृत डीलर बनण्याचा निर्णय घेऊ शकता. सुरुवातीला दुचाकींच्या सुट्या भागांपासून सुरुवात करणे कमी खर्चाचे आणि सोपे ठरते.
स्वतःच ऑटो गॅरेज सुरू करायचंय? बजेटपासून लायसेन्स पर्यंत संपूर्ण माहिती समजून घ्या
योग्य जागेची निवड
या व्यवसायासाठी जागेची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. तुमचे दुकान मुख्य बाजारपेठेत, गॅरेज गल्लीत किंवा जिथे मेकॅनिकची दुकाने जास्त असतात किंवा मुख्य रस्त्यालगत असावे. ग्राहकांना गाड्या पार्क करण्यासाठी आणि मेकॅनिकला ये-जा करण्यासाठी दुकानाचा परिसर सोयीस्कर असावा. किमान ३०० ते ५०० स्क्वेअर फूट जागा यासाठी पुरेशी ठरते.
इन्व्हेंटरी आणि मार्केट
स्पेयर पार्ट्स व्यवसायाचे यश हे तुमच्याकडील मालाच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. सुरुवातीला नट-बोल्ट, इंजिन ऑइल, फिल्टर्स, ब्रेक पॅड्स, क्लच केबल्स, इंडिकेटर्स आणि बॅटरीज यांसारख्या जास्त खपणार्या वस्तूंचा साठा ठेवावा. यासाठी दिल्लीचे करोल बाग, मुंबईचे ऑपेरा हाऊस किंवा पुण्यातील नाना पेठ यांसारख्या मोठ्या घाऊक बाजारांतून थेट कंपन्यांच्या डीलरकडून माल खरेदी केल्यास थेट बरेच मार्जिन मिळू शकते.
गुंतवणूक आणि नफ्याचे गणित
या व्यवसायासाठी सुरुवातीला साधारणपणे ३ ते ७ लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक असते. यामध्ये दुकानाचा अॅडव्हान्स, रॅक आणि अंतर्गत फर्निचर, तसेच मालाचा साठा यांचा समावेश होतो. या व्यवसायात सरासरी २०% ते ४०% पर्यंत नफा सहज मिळतो. काही स्थानिक उत्पादनांवर हा नफा ५०% पेक्षाही जास्त असू शकतो.
मेकॅनिक्सशी नेटवर्किंग
हा व्यवसाय वाढवण्याचा सर्वात मोठा उपाय म्हणजे स्थानिक गॅरेज आणि मेकॅनिक्सशी मजबूत नेटवर्क तयार करणे. अनेकदा ग्राहक मेकॅनिकच्या सल्ल्यानेच पार्ट्स खरेदी करतात. त्यामुळे मेकॅनिक्सना काही कमिशन किंवा सवलती देऊन तुम्ही तुमच्या दुकानाची विक्री दुप्पट करू शकता. उत्तम गुणवत्ता आणि प्रामाणिक सेवा दिल्यास हा व्यवसाय तुम्हाला लॉंग टाइम आर्थिक स्थिरता देऊ शकतो.






