आजच्या युगात जिथे प्रत्येक गोष्ट नफा, तोटा आणि व्यावसायिक गणितांवर तोलली जाते, तिथे एका शाळकरी मुलीच्या शिक्षणासाठी संपूर्ण रेल्वे स्टेशन सुरू ठेवल्याचे ऐकले तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. परंतु, ही कोणतीही कल्पनाविलास नसून जपानमध्ये घडलेली एक सत्य आणि अत्यंत भावूक घटना आहे.
काय आहे ही हृदयस्पर्शी घटना?
जपानमधील उत्तरेकडील ‘होक्काइडो’ या बेटावरील एका अत्यंत दुर्गम भागात ‘क्यू-शिराताकी’ नावाचे एक छोटे रेल्वे स्टेशन होते. या परिसरात लोकसंख्या अत्यंत कमी असल्याने आणि प्रवासी संख्या कमी झाल्यामुळे जपान रेल्वेने हे स्टेशन कायमचे बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
परंतु, जेव्हा रेल्वे अधिकाऱ्यांना समजले की, या स्टेशनचा वापर ‘काना हाराडा’ नावाची एक उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनी रोज शाळेत जाण्या-येण्यासाठी करते, तेव्हा त्यांनी आपला निर्णय बदलला.
मुलीच्या शालेय वेळेनुसार ठरले रेल्वेचे वेळापत्रक
रेल्वे प्रशासनाने केवळ ते स्टेशन सुरूच ठेवले नाही, तर ट्रेनचे वेळापत्रकही थेट त्या मुलीच्या शाळेच्या वेळेनुसार तयार केले. तिला वेळेवर शाळेत पोहोचता यावे यासाठी दररोज सकाळी ७:१५ वाजता ट्रेन स्टेशनवर यायची. शाळा सुटल्यानंतर तिला घरी परतता यावे यासाठी संध्याकाळी ५:०८ वाजता एक ट्रेन तिथे थांबायची. या स्टेशनवर रोजची एकमेव नियमित प्रवासी ती मुलगीच असायची. जर तिची ही ट्रेन चुकली असती, तर तिला शाळेत पोहोचण्यासाठी इतर कोणताही सोपा पर्याय उपलब्ध नव्हता.
पदवी मिळेपर्यंत सुरू राहिला प्रवास
जपानी रेल्वेने तब्बल तीन वर्षे हे स्टेशन केवळ त्या एका मुलीसाठी सुरू ठेवले. मार्च २०१६ मध्ये जेव्हा कानाचे शालेय शिक्षण पूर्ण झाले आणि तिने पदवी प्राप्त केली, तेव्हाच रेल्वेने अधिकृतपणे या स्टेशनवरून सेवा कायमची बंद केली.
जगभरातून कौतुकाचा वर्षाव
ही गोष्ट जेव्हा सोशल मीडियाद्वारे जगभर पसरली, तेव्हा लोकांनी जपानी प्रशासनाच्या या निर्णयाचे मनापासून कौतुक केले. व्यावसायिक तोटा सहन करून एका नागरिकाच्या- विशेषतः एका विद्यार्थिनीच्या शिक्षणाला प्राधान्य देण्याची जपानची ही संस्कृती मानवतेचे एक उत्कृष्ट उदाहरण ठरली.



