फोटो सौजन्य: Social Media
सध्या देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशातील प्रत्येक मार्केटमध्ये लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत, दुकान तिरंगा मिळत आहे. अशात काही जण आपल्या घरी किंवा सोसायटीजवळ हा तिरंगा फडकावत असतात.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांना तिरंग्यासोबत आपली सेल्फी काढायचे व ते अपलोड करायचे आवाहन केले आहे. पण तुम्हाला माहित आहे, राष्ट्रीय ध्वजाचा वापर तसेच प्रदर्शनाबद्दल काही नियम आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते.
15 ऑगस्टला आपण दरवेळी पाहतो, कसे दुचाकीस्वर व कारचालक आपल्या वाहनांवर तिरंगा लावत असतात. परंतु हे असे करण्याची प्रत्येकाला परवानगी नाही आहे. भारतीय ध्वज संहिता 2002 नुसार, केवळ काही लोकांना त्यांच्या वाहनावर तिरंगा फडकवण्याचा कायदेशीर अधिकार आहे. तसेच हा नियम हे देखील सांगते की जेव्हा तुम्ही तिरंगा फडकावता तेव्हा वर भगवा पट्टा असावा. तसेच फाटलेला, घाणेरडा तिरंगा वापरू नये. चला जाणून घेऊया आपल्या वाहनावर राष्ट्रध्वज लावण्याचा अधिकार कोणाला आहे.
हा विशेष अधिकार राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल-लेफ्टनंट गव्हर्नर, भारतीय मिशन पदांचे प्रमुख, पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, मुख्यमंत्री, लोकसभेचे सभापती, राज्यसभेचे उपसभापती, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील विधान परिषदांचे अध्यक्ष, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील विधानसभेचे उपसभापती, भारताचे मुख्य न्यायाधीश, सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती, आणि उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश याना असतो.
नागरिकांना घरोघरी तिरंगा फडकावण्याचे आणि हातात झेंडा घेऊन फिरण्याचे स्वातंत्र्य जरी असले तरी खासगी वाहनांवर झेंडा फडकावणे हा कायदेशीर गुन्हा मानला जातो. या संदर्भात कोणी दोषी आढळल्यास, राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा 1971 अंतर्गत त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते. राष्ट्रध्वज, राज्यघटना आणि राष्ट्रगीताचा अपमान केल्यास ३ वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.