(फोटो सौजन्य-AI एआय)
टोयोटा किर्लोस्कर मोटरने ऑगस्ट २०२६ मधील आपल्या कार विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. ऑगस्ट महिन्यात टोयोटाने एकूण ३२,८४२ वाहनांची विक्री केली आहे, ज्यामध्ये २८,४१० वाहनांची देशांतर्गत विक्री आणि ४,४३२ वाहनांच्या निर्यातीचा समावेश आहे. ऑगस्ट महिन्यातील विक्री गेल्या वर्षाच्या तुलनेत काहीशी मंदावली असली, तरी चालू वर्षातील टोयोटाची एकंदरीत कामगिरी भक्कम राहिली आहे.
ऑगस्ट २०२५ मधील २९,३०२ युनिट्सच्या तुलनेत यंदा देशांतर्गत विक्री ३ टक्क्यांनी घटून २८,४१० वर आली आहे. जुलै २०२६ मधील ३०,५१६ युनिट्सच्या तुलनेतही ही विक्री कमी आहे. मात्र, जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या आठ महिन्यांत टोयोटाने एकूण २,६६,६९६ वाहनांची विक्री केली असून, २०२५ मधील याच कालावधीतील २,४१,७३३ युनिट्सच्या तुलनेत यामध्ये १०% वाढ नोंदवली गेली आहे.
टोयोटाचा बिदाडी येथील पहिला प्लांट इनोव्हा हायक्रॉस, इनोव्हा क्रिस्टा, फॉर्च्यूनर आणि लेजेंडर कारचे उत्पादन करतो, तर दुसऱ्या प्लांटमध्ये अर्बन क्रूझर हायरायडर, हायलक्स आणि कॅम्री हायब्रिडचे उत्पादन केले जाते. आगामी सण-उत्सवांच्या काळात वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
कार मोडिफिकेशन आणि RTO नियम; महाराष्ट्रात नक्की काय लीगल आहे आणि काय नाही? जाणून घ्या सविस्तर माहिती
टोयोटाच्या विक्रीला अधिक गती देण्यासाठी कंपनी लवकरच इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्ट भारतीय बाजारात सादर करण्याच्या तयारीत आहे. या नवीन मॉडेलमध्ये अधिक आक्रमक फ्रंट ग्रिल, मोठा इन्फोटेनमेंट स्क्रीन, नवीन अपहोल्स्ट्री आणि अद्ययावत तंत्रज्ञान पाहायला मिळू शकते. यात सध्याचेच २.०-लिटर पेट्रोल आणि स्ट्रॉंग-हायब्रिड इंजिन कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे.






