फॉक्सवॅगन भारतामध्ये एक नवीन सब-चार-मीटर कॉम्पॅक्ट SUV सादर करण्याच्या तयारीत असून, हा प्रकल्प कंपनीसाठी भारतातील सर्वाधिक विक्री देणारा ठरू शकतो. या प्रकल्पाला जागतिक स्तरावर मंजुरी मिळाली असून, यासाठी सुमारे २५ दशलक्ष युरो (अंदाजे ₹२७५ कोटी) खर्च अपेक्षित आहे. स्कोडा कायलाक च्या प्लॅटफॉर्मवर आधारित असणारी ही SUV कंपनीची सब-४ मीटर सेगमेंटमध्ये पुनर्वापसी दर्शवेल आणि ती फॉक्सवॅगनच्या पोर्टफोलिओमध्ये टायगुनच्या खाली स्थानापन्न केली जाईल.
वाढती मागणी आणि बाजारातील संधी
भारतातील पॅसेंजर व्हेइकल मार्केटमध्ये सब-४ मीटर कॉम्पॅक्ट SUV ची मागणी प्रचंड वेगाने वाढत आहे. आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत ३.८ ते ४.० मीटर लांबीच्या SUV सेगमेंटमध्ये ३,९७,६०९ युनिट्सची विक्री झाली, जी गेल्या वर्षाच्या तुलनेत २४ टक्क्यांनी जास्त आहे. या सेगमेंटमध्ये सध्या टाटा पंच, मारुती फ्रॉन्क्स आणि टाटा नेक्सॉन यांचा दबदबा आहे. फॉक्सवॅगनला भारतात केवळ टायगुन आणि व्हर्टस वर अवलंबून राहता येत नसल्यामुळे, सुमारे ₹८ लाखांच्या बजेटमधील ही नवीन SUV कंपनीला एका मोठ्या ग्राहकवर्गाशी जोडण्यास मदत करेल.
Skoda Auto फॉक्सवॅगन इंडियामध्ये मोठे बदल! पियूष अरोरा यांच्याकडे सोपवली ‘ही’ अतिरिक्त मोठी जबाबदारी
इंजिन, परफॉर्मन्स आणि नवीन ऑटोमॅटिक गिअरबॉक्स
नवीन फॉक्सवॅगन SUV चे अभियांत्रिकी आणि पॉवरट्रेन स्कोडा कायलाकसारखेच असणार आहे. यामध्ये १.०-लिटर TSI ३-सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाईल, जे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांसह येईल. महत्त्वाचा बदल म्हणजे या बाइकमध्ये सुरुवातीपासूनच ६-स्पीड ऐवजी टॉर्क कन्व्हर्टर ८-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळण्याची शक्यता आहे, जो नंतर स्कोडा कायलाकमध्येही अपडेट केला जाऊ शकतो.
रचना आणि अंदाजित किंमत
ब्राझीलच्या बाजारात उपलब्ध असलेली फॉक्सवॅगन टेरा या भारतीय मॉडेलच्या डिझाइनचा आधार असू शकते, परंतु भारतीय रस्त्यांनुसार आणि ग्राहकांच्या गरजांनुसार यात काही विशेष बदल केले जातील. स्थानिक पातळीवर निर्मिती होणार असल्याने फॉक्सवॅगन या कारची एक्स-शोरूम किंमत ₹८ लाख ते ₹१३ लाख दरम्यान ठेवू शकते. ही नवीन SUV बाजारात आल्यावर थेट टाटा पंच, मारुती फ्रॉन्क्स, टाटा नेक्सॉन, ह्युंदाई व्हेन्यू, महिंद्रा XUV 3XO, किआ सोनेट आणि स्कोडा कायलाक यांसारख्या गाड्यांना जोरदार टक्कर देईल.

