सिनेमाचा विषय निघाला की दरवेळी एक वाद ठरलेला असतो. तो असा की सिनेमा या माध्यमावर समाजाचा पगडा आहे की समाजावर सिनेमा या माध्यमाचा. काहींना पहिली बाजू बरोबर वाटते तर काहींना दुसरी. अर्थात उत्तर काही असो पण या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. खरंतर भारतीय समाजमनावर आणि त्यातही जिथे हिंदी-मराठी सिनेसृष्टी रुजली त्या मुंबईत-महाराष्ट्रात तर गणेशोत्सव प्रेमाचा आणि आपुलकीचा आहे. या उत्सवाची समाजमनावर असलेली पकड लक्षात घेऊनच हा उत्सव सिनेमात आला. बाप्पाबद्दल लोकांच्या मनात असलेला सॉफ्ट कॉर्नर लक्षात घेऊन सिनेमेकर्सनी गणपती बाप्पाला सिनेमात घेतलं. अर्थात ही आत्ताची बात नाहीये. अगदी १९२५ मध्ये.. म्हणजे जेव्हा बोलपटही आले नव्हते तेव्हा ‘गणेशा उत्सव’ या नावाचा एक मूकपट आला होता. त्यात गणपती बाप्पाची आरती आणि बाप्पाचं काही फुटेज होतं. त्यावर सिनेमा करण्याचं कारण असं की त्यावेळी सिनेमा हे माध्यम खरंतर नवं होतं. त्यावेळी लोकांना या माध्यमाबद्दल आपुलकी निर्माण व्हावी.. त्यांच्या मनात असलेली भीती जावी हा त्यामागचा खरा हेतू होता. शिवाय कला म्हणूनही सिनेमाकडे पाहिलं जाऊ लागलं होतंच. कलांची देवता मानलेला बाप्पा सिनेमात आला तर त्याचा आशीर्वाद त्या सिनेमाला मिळेल अशीही श्रद्धा त्याकाळी असावी. पुढे १९३६ मध्ये ‘पुजारन’ या सिनेमातही बाप्पा दिसले. असे कित्येक सिनेमे आहेत. म्हणजे अगदी अलिकडे एनिमेशनवर आलेला ‘माय फ्रेंड गणेशा’ या चित्रपटांपर्यंत ही यादी मोठी होते. त्याशिवाय अग्निपथ, शोर इन द सिटी, एबीसीडी, वास्तव, सत्या अशा बऱ्याच सिनेमांमध्ये बाप्पा दिसतात. मराठी सिनेसृष्टीही याला अपवाद नाहीय. ‘मोरया’सारखा चित्रपट अवधूत गुप्ते यांनी दिला तो गणेशोत्सवावर बेतलेला. सांगण्याचा मुद्दा असा की चित्रपटात बाप्पा वारंवार दिसत राहातो. कारण तो विघ्नहर्ता आहे. मग सिनेमात बाप्पा आला की त्यात त्याच्यावरचं एखादं गाणंही हमखास येतं. मग तीच गाणी पुढे गणेशोत्सवात वाजू लागतात. ते साहजिकच आहे. कारण कलांचा अधिपती म्हणत असताना त्यात नृत्य, नाट्य, संगीत आदी सर्वच कला येतात. खरंतर आता बाप्पावरचे चित्रपट आणि बाप्पा ज्या चित्रपटात आहे अशांची नावं काढायची म्हटली तर त्यासाठी गुगल आहेच की. पण आपण त्यापलिकडे विचार करायला हवा. कारण, जसा हा देश आपला आहे.. तसं हे राज्यही. आणि राज्य आपलं असल्यामुळे त्या राज्यातली सगळी शहरं, गावं.. त्यात राहणारी माणसंही आपलीच. प्रत्येक मराठी घरात हाच संस्कार रुजत असतो. त्यामुळेच येणारा बाप्पा ही आपला बाप्पा असतो. इथंच आपण थोडं विचार करण्याची गरज आता येऊन ठेपली आहे की काय असं वाटत राहतं. यंदाचा गणेशोत्सव महत्वाचा आहे तो त्यासाठी.
आपल्या बाप्पावर.. त्याच्या अस्तित्वावर आपली गाढ श्रद्धा आहे. सर्वंच कलांनी ज्याच्यासमोर शरणागती स्वीकारली आहे असा तो देव.. गणपती. आपल्या महाराष्ट्रात कोणत्याही कलेची सुरूवात होताना गणरायाचं पूजन होतं. कारण महाराष्ट्राने कलेवर अपार प्रेम केलं आहे. तसं कलाकारावरही महाराष्ट्र प्रेम करतो. हे चित्र भारताला माहीत आहेच. असं असताना आजच्या बदलत्या काळात याच खात्रीला कात्री लावण्याच काम होताना दिसतं. ज्या सिनेमाने गणरायावर अपार प्रेम केलं त्याच सिनेमाला.. त्याच्या सिनेमेकर्सना बॉयकॉट करण्याचा नवा ट्रेंड महाराष्ट्रात रुजला आहे. अलिकडे त्याचा प्रत्ययही आला. आमीर खानच्या ‘लालसिंग चड्ढा’वर बॉयकॉट करण्याची मोहीम चालवली गेली. अर्थात हे काही पहिल्यांदा झालेलं नाही. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर घराणेशाहीच्या नावाखाली बोटं मोडणाऱ्याची नवी जमात उदयाला आली. आणि त्यांनी नेपोटिझमवर यथेच्छ सूड उगवला. यातून करण जोहर सुटला नाही आणि बच्चन कुटुंबीयही सुटले नाहीत. हा ट्रेंड गेली दोन वर्षं चांगला चालू होता. पण आता त्याही वरची कडी गाठत सिनेमाच न बघण्याबद्दल सुचवलं जाऊ लागलं आहे. काही महिन्यांपूर्वी पावनखिंड, झुंड आणि काश्मीर फाईल्स या तीन चित्रपटांबद्दल असंच वादळ उठवलं गेलं होतं. यातून ना नागराज मंजुळे सुटला, ना दिग्पाल लांजेकर. मराठी दिग्दर्शकांचे हे दोन्ही सिनेमे असताना या सिनेमांना जातीपातींनी वाटून घेतलं. कुणाचा सिनेमा मोठा आणि कुणाचा सिनेमा आपला.. यात वाद रंगले. सोशल मीडियाने या महत्वाची भूमिका बजावली होती.
एखादा सिनेमा पाहिल्यानंतर तो न आवडणं हे फार साधं फिलिंग आहे. जसा एखाद्याला एखादा सिनेमा आवडतो तसाच तो नावडू शकतो. आजवर हेच होतं आलं आहे. पण असं असताना अमुक सिनेमा बघितला तर.. आणि तमुक सिनेमा नाही बघितला तर.. अशा अटी शर्तींसह जेव्हा सिनेमावरची काळी सावली गडद होऊ लागली तेव्हा मात्र हे विघ्न मोडून काढायला आता साक्षात बाप्पांनीच यायची गरज आहे हे वाटू लागलं. खरंतर लॉकडाऊनच्या चटक्यांपासून सिनेमाही सुटलेला नाही. प्रत्येकाला आता पुन्हा नव्याने सिद्ध व्हायचं आहे. असं असताना, आपण सिनेमा मोठा करायचा सोडून एकमेकांमधली उणीदुणी काढू लागलो आहोत, हे यापूर्वी कधी महाराष्ट्रानेही पाहिलं नव्हतं, ना त्या विघ्नहर्त्यानेही. कला ही कला असते. कोणतीही कला व्यक्त व्हायचं माध्यम असते आणि पाहणाऱ्यासाठी एक अनुभूती. या दोन्हीकडे सजगपणे पाहण्याची गरज आज येऊन ठेपली आहे. लालसिंग चढ्ढा नसेल चांगला तर तो नाहीच चालणारा. पण ते लोक ठरवू देत. त्यासाठी त्यांना जो विचार करायचा आहे तो करायला वेळ मिळू देत. उरला प्रश्न आमीरसारख्यांचा… तर आमीरची काही स्टेटमेंट्स आपण पुन्हा काढून पाहण्याची गरज येऊन ठेपली आहे. कारण हा तोच आमीर आहे ज्याने महाराष्ट्रातल्या कित्येक गावांमध्ये पाणी आणलं आहे. एखाद्या व्यक्तीबद्दलचं आपलं वाटणं इतकं साधं.. आणि हलकं असू नये.
यंदाचा गणेशोत्सव म्हणून महत्वाचा आहे. लॉकडाऊननंतर आपल्या सगळ्यांना नवा जन्म मिळाला आहे. ही नवी सुरूवात करताना बाप्पाला वंदन करणं तर आलंच. पण सोबत आपण ज्या गोष्टी करतो आहोत.. करणार आहोत.. त्या सगळ्या बाप्पाला साक्षी ठेवून पुन्हा एकदा तपासण्याची गरज निकट येऊन ठेपली आहे. तसं केलं तरच बुद्धीदेवता असलेला बाप्पा आपल्याला पावला असं म्हणायला वाव उरेल. यंदा आपल्या घरी येणाऱ्या बाप्पाच्या साक्षीने आपल्या सगळ्यांमधला विवेक आणखी सजग होवो.. याच गणेशोत्सवाच्या शुभेच्छा.
गणपती बाप्पा मोरया.
– सौमित्र पोटे
sampote@gmail.com