आपली मातृभाषा आपली संस्कृती, आपले जीवन व्यवहार, आपली कुटुंबव्यवस्था, आपली सुखदुःख, आपल्या तरल भावना, आपली अस्मिता, एवढंच काय तर आपले सगळे भावविश्वच व्यापून टाकते. आपले जन्मोजन्मीचे परम भाग्य म्हणून आपण या मराठी मुलूखात जन्माला आलो. तुकोबाराय म्हणतात ‘जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, म्हणोनी या विठ्ठले कृपा केली.’ ज्ञानेश्वर माऊलींनी मराठी भाषा ‘अमृतातेही पैजा जिंके’ म्हणून ‘माझा मराठाची बोलू कौतुके’ या शब्दात मातृभाषेचा गौरव केला आहे.
ते एवढ्यावरच न थांबता पुढे या मराठीतून जे भक्त आणि भगवंत,त्याची कृपा, त्याने आपला प्रेमाने, काळजीने नित्य प्रतिपाळ केल्याचे, त्या अनुभवाने येणाऱ्या भावविभोरतेचं जे तरल, रसपूर्ण वर्णन करतात, त्यात ते पुढे मराठीतून व्यक्त होणा-या या भावना सगळी ईंद्रिये एकरूपतेने अनुभवतात, त्यांची जणू हे रसपान करण्यासाठी चढाओढ होते, असं माऊली लिहितात. हे नुसतं वाचतानाच अंगावर रोमांच येतात, हृदय भरून येतं, डोळे पाझरायला लागतात, मन शांत होतं, आपल्या जाणीवेचा प्रवास शब्दापासून सुरू होवून नि:शब्दापर्यंत जावून पोहोचतो. असा दिव्य अनुभव देणा-या माय मराठीचा गौरव शब्दात करता येईल का ? आपल्या मराठीचे हजारो शब्दांचे भांडार, तिचे ऐश्वर्य कितीही अपार असले तरी आपण तिच्या बद्दलचे प्रेम, कृतज्ञता “शब्देविण संवादु, दुजेविण अनुवादु” अशीच हृदयाच्या गाभाऱ्यात अनुभवतो ना?
बोलण्या ऐकण्याने, थोडक्यात इंद्रियांच्या पातळीवर सुरू झालेली जीवनाच्या अनुभवाची प्रक्रिया आपल्याला थेट देहातित मौनापर्यंत घेवून जाते, हे किती आश्चर्यकारक आहे!
जेव्हा सुरेश भट म्हणतात ‘उरले उरात काही आवाज चांदण्यांचे’, तेव्हा मनातील उदासीही आपल्याला आपल्या आत असलेल्या विश्वव्यापी चेतनेचा प्रत्यय देते.
गदिमा जेव्हा सुखदुःखाच्या उभ्या आडव्या धाग्यांनी जीवनाचे जरतारी वस्त्र विणतात, तेव्हा आपला आणि पूर्वजांचा अगदी रामायण महाभारतापासूनचा मानवी जीवनपट किंवा कालपट आपल्या दिव्य चक्षुंसमोरून उलगडत जातोय, याचा प्रत्यक्ष अनुभव येतो.
‘सह्याद्रीचा सिंह गर्जतो’ हे महाराष्ट्र गीतातील शब्द नुसते कानावर पडल्याबरोबर काळ्याकभिन्न पाषाणातील गिरी शिखरांची भव्यता, द-यांची भयानक खोली, जमिनीवर सुर्यप्रकाश पडू नये, इतकी दाट वृक्षराजी आणि या ईश्वर दत्त कवच कुंडलांच्या यथार्थ जाणीवेने आपल्या अंगभूत तेजाने, पराक्रमाच्या परंपरेने जुलमी इस्लामी राजसत्तांना आव्हान देणारे छत्रपती शिवराय क्षणार्धात डोळ्यासमोर साकारतात. आपण एका विलक्षण निर्भयतेच्या तेजोमंडलात जणू प्रवेश करतो आहोत, असे वाटते. प्रत्यक्ष मृत्यू ही अगदी य:कश्चित वाटायला लागतो. लक्षावधी माणसांच्या मनाला अमरतेचा थेट अनुभव देणा-या या मातृभाषेच्या अपार सामर्थ्याचा मानवी बुद्धीला थांग लागत नाही.
कुसुमाग्रज जेव्हा वेडात मराठे वीर दौडले सात लिहिताना ‘खालून आग वर आग आग बाजूंनी’ हे वर्णन करतात, कोसळल्या उल्का जळत सात दर्यात असं लिहितात, तेव्हा आपला क्षुद्र देह सर्वोच्च आदर्शासाठी हसत हसत समर्पित करण्याची सहज उर्मी मनात निर्माण होते. केवळ शब्दातून सर्वस्वाचे समर्पण करण्याची उदात्तता संक्रमित करण्यासाठी त्या शब्दांमध्ये सामावलेले आत्मबल काय दर्जाचे असेल ?
लक्षावधी/ कोट्यवधी माणसांमधे एकच भावना एकसारख्या तिव्रतेने काही क्षणात निर्माण करून त्यांच्या मनात राष्ट्र भक्तिच्या अनिवार लाटा उसळत राहतात, त्या भावावस्थेत ते काळावरही विजय मिळवतील, अशी दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांच्यात प्रत्यक्ष दिसते, या उत्तुंगतेचे मूल्यमापन कोणत्याही वैज्ञानिक परिमाणाने करणं शक्य नाही.
‘हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे’ काय हे केवळ शब्द आहेत? काय ही केवळ कल्पना आहे? किमान बाराशे वर्षे असंस्कृत रानटी आक्रमकांचे आघातांमागून आघात पचवून, त्यांनाही पचवून, स्वतःच्या अंगभूत तेजाने तळपणा-या, उत्तरोत्तर सामर्थ्य संपन्न होत गेलेल्या आपल्या मातृभूमीचे असे संजीवक स्मरण किती रोमांचकारी आहे, हे अनुभवल्याशिवाय कसे कळणार? त्यासाठी माय मराठीच्या पोटी जन्मच घ्यावा लागेल.
आपली नाट्य परंपरा, संगीत नाटके, आपले अपार साहित्य, नवरसात भिजवून जीवनाचा उत्कट, भेदक, कधी हळवा, कधी प्रेमळ, कधी तरल, धुंद अनुभव देणा-या कादंब-या, एकेका शब्दाच्या उच्चाराने जणू एखाद्या लक्षवेधी बाणाने आपले हृदय विदीर्ण करीत एकाच वेळी असह्य वेदना आणि अपूर्व आनंदाच्या लाटा उसळत असल्याचा अनुभव चित्तात येवून सुखदुःखाच्या सीमारेषाच पुसून टाकण्याचे सामर्थ्य ज्या रचनांमधून सामान्य मनुष्याला सहज प्रदान करणारी मातृभाषा प्रत्यक्ष मोक्षाकडेही तुच्छतेने पाहील, यात आश्चर्य काय ?
आपले ज्ञान विज्ञान, आपल्या मनात खोलवर रूजलेली शल्य, अत्यंत आनंददायी क्षण, आपली सफलता,विफलता,आपले जय पराजय,आपला अभूतपूर्व पराक्रम आणि आपले दैन्य, आपली गतीशीलता आणि अगतिकता, आपले समर्पण आणि आपली आतून अंत:करण जाळणारी सूडभावना, आपलं वात्सल्य,आपली कृतार्थता, कृतज्ञता, प्रयत्नांच्या पराकाष्ठेने आपण संपादन केलेलं अपार ऐश्वर्य आणि ते एका क्षणात दान देवून टाकण्याचं दातृत्व, आपले जीवनादर्श, जीवनातील सुसंगती, विसंगती, आपली शालीनता, मातृशक्तिचा गौरव, करूणा, आपला शृंगार, आपले वैराग्य, आपल्या मनात असलेले साधुत्वाचे अपार आकर्षण, आपल्या समृद्ध प्रकृतीचे रसरशीत दर्शन, त्यातून येणारी स्थितप्रज्ञता, या आणि यासारख्या अनंत भावभावनांची आंदोलने आपण मातृभाषेतूनच अनुभवतो ना? वृत्तीने तेजस्वी असलेल्या स्वा.सावरकरांचा स्वर मातृभूमीबद्दल लिहिताना किती हळवा होतो! ‘शुक पंजरी वा हरिण शिरावा पाशी’ हे गाताना स्वरलतेचा स्वर किती कातर होतो !! हे ऐकल्याशिवाय कसे कळणार ?
‘मालवून टाक दीप चेतवून अंग अंग’ हे ऐकल्याशिवाय शृंगारातली अत्त्युत्कट धुंदी कशी समजणार ?
कल्पनेची उत्तुंगता अनुभवण्यासाठी शब्दांमध्ये त्या दर्जाचे सामर्थ्य लागते.
मराठीचे वाग्वैभव लिहायला हजारो पानेही कमीच पडतील. गणित हतबुद्ध होऊन म्हणेल मी आता आकडेमोड थांबवून फक्त अनंताचीच उपमा देईन. तत्वज्ञान म्हणेल मला असलेल्या रुक्षतेच्या शापातून मुक्त करून रसपूर्ण जीवनाचे अमृतपान मराठीतून करू दे.
पृथ्वीच्या प्रेमगीतातील ‘नको क्षृद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहूनि साहवे’ हे सुर्याला उद्देशून म्हणणा-या पृथ्वीच्या मनातील भाव पाहून प्रकृती म्हणेल कि मला प्रकृती आणि पुरुष या द्वैतातून मुक्त होण्याचं बळ यातून मिळालं.
माय मराठी, मी तुझ्या कुशीत असताना तू केलेला वात्सल्याचा, प्रेमाचा वर्षाव, मला त्रिखंडात कुठेही मिळणार नाही. तो कुबेराच्या संपत्तीने विकत घेता येणार नाही. फक्त तुझं निरागस बाळ झाल्याने मला मिळालेला हा जन्मसिद्ध अधिकार आहे, ज्याला जगातल्या कोणत्याही न्यायालयात कोणी आव्हान देवू शकत नाही.
माये, मी तुझ्याच कुशीत पुनः पुन्हा जन्म घेईन, तुझ्याच कुशीत अंतिम श्वास घेईन. तूच मला मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान द्यायला संस्कारित केलंस, हे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. दाटून आलेल्या कंठाने मी फक्त म्हणू शकेन ‘तुजसाठी मरण ते जनन. तुजवीण जनन ते मरण.’ माये, तूच माझं सार सर्वस्व आहेस!
अभय भंडारी
abhaydbhandari@gmail.com