एकदा मला एकेकाळचा स्टार फोटोग्राफर जगदीश माळीने सांगितलेली गोष्ट सांगतो. त्यात बबिताचा धोरणीपणा आणि आपल्या मुलींना चित्रपटसृष्टीत ‘लाॅन्च’ करण्यातील स्मार्टपणा लक्षात येईल. कपूर खानदानाची ती सून असल्याचे त्यात अधोरेखित होईल. एका फिल्मी पार्टीत जगदीश माळीची भेट होताच बबिताने त्याला सांगितले, लोलोला मी फिल्म इंडस्ट्रीत आणतेय. तिचं एक फोटो सेशन कर…
ठरल्याप्रमाणे जगदीश माळी वर्सोवा येथील बबिताच्या सोसायटीत शिरला. तेव्हा विशाल कंपाऊंडमधील स्वीमिंग पूल पाहून त्याने ठरवले. लोलोचं येथेच स्वीमिंग काॅश्चूममध्ये फोटो सूट करुया. त्याची ही कल्पना बबिताला पटली आणि लोलोही तयार झाली. जवळपास चौतीस वर्षांपूर्वी हा ‘माॅडर्न विचार’ बबिताच्या स्वभावाची कल्पना देतो. काळासोबत आपणही बदलायला हवे हा तिचा यातला दृष्टिकोन.
बबिताच्या सकारात्मक दृष्टिकोनाची आणखीन उदाहरणे, लोलोचं रुपेरी पदार्पण ‘कपूर’ आडनावाला/खानदानाला साजेसं व्हावं असे बबिताला वाटणारच. शो बिझनेसमध्ये असेच वागावे लागते, तरच पत राहते. पहिला चित्रपट स्वीकारला, ‘बरसात ‘. याचा निर्माता धर्मेंद्र-बबिताचा ‘कब, क्यू और कहा’ (१९७१) चा एकेकाळचा हीरो. दिग्दर्शन शेखर कपूरकडे आणि नायक बाॅबी देओल. मला आठवतय, गोरेगावच्या फिल्मीस्थान स्टुडिओत अतिशय दणकेबाज ग्लॅमरस मुहूर्त रंगला.
आम्ही रकानेच्या रकाने लिहिले. पण बरेच दिवस झाले तरी शूटिंगची काहीच खबर नाही. एके दिवशी बातमी आली, शेखर कपूरने हा चित्रपट सोडला. (कितवा बरे?) आणि राजकुमार संतोषी आता दिग्दर्शक आहे. या उलथापालथीत जात असलेला वेळ बबिताला स्वस्थ बसू देईना. तिने लोलोला घेऊन हैदराबाद गाठलं आणि निर्माते डी. रामा नायडू यांची भेट घेऊन लोलोला ‘प्रेम कैदी’ची हरिशची नायिका केली. पोरीचा हा पहिलाच चित्रपट सुपर हिट. आईला यापेक्षा आणखीन आनंद तो काय हवा?
लोलोचं करियर सुरु झालं आणि काही चित्रपटांनंतर तिने चित्रपट स्वीकारला, दीपक आनंद दिग्दर्शित ‘लग ते जिगर’. तिचा काका ऋषि कपूर या चित्रपटातही काकाच आणि या दोघांवर काही महत्वाची दृश्ये चित्रीत होत असतानाच आम्हा सिनेपत्रकारांना जुहूच्या मयूर महल या बंगल्यात शूटिंग रिपोर्टींगसाठी बोलावले. काही वेगळं पाह्यला मिळेल आणि म्हणूनच काही एक्स्युझिव्हज लिहायला मिळेल म्हणून थोडं लवकर गेलो तेव्हा काहीसा आडोसा पकडून चक्क बबिता बेबोला घेऊन आपल्या दीर व मुलीचे शूटिंग पाहत असल्याचे दिसले. बेबो तेव्हा शाळकरी वयातील वाटली. गंमत म्हणजे, तेव्हा शूटिंग रिपोर्टींगमध्ये हेच लिहिलं.
हा चित्रपट याच पहिल्याच शेड्युलनंतर डब्यात गेला. …पुढचं पाऊल वेळीच टाकायला हवे ही बबिताची खुबी. बेबोच्या वेळीही अशीच ‘बदलाची खेळी’ झाली. ह्रतिक रोशनची पहिली नायिका म्हणून राकेश रोशन दिग्दर्शित ‘कहो… ना प्यार है’ स्वीकारला. महालक्ष्मीच्या फेमस स्टुडिओत पहिले चित्रीकरण सत्रही पार पडतेय तोच बीग बी पुत्र अभिषेक चित्रपटसृष्टीत आला. एकदम बिग शाॅट. बेबोचा हा पहिला हीरो असायलाच हवा असे बबिताला वाटले आणि तिने चक्क तशी सकारात्मक पावलेही टाकली. आणि राकेश रोशनला सांगत ‘कहो ना.. प्यार है’ सोडला आणि दिग्दर्शक जे. पी. दत्ताची भेट घेत ‘रिफ्यूजी’त बेबो अभिषेकची नायिका झाली… आपल्या मुलींच्या कारकिर्दीच्या आखणीत इतकी काळजी कोणी घेतली असेल हो? बबिताचे वेगळेपण हेच.
बबिताची रुपेरी पडद्यावरील करियर चित्रपटाच्या संख्येत फार नाही. तरी तिचा इम्पॅक्ट भारी. राजेश खन्नाची ती पहिली नायिका. (जी. पी. सिप्पी निर्मित व भास्कर दवे दिग्दर्शित ‘राज’ चित्रपट १९६६). एका रिॲलिटी शोमध्ये बबिता व लोलो असताना लोलोचं आपल्या आईबद्दलचं फिल्मी ज्ञान जाणून घेण्यासाठी प्रश्न होता, बबिताचा पहिला चित्रपट कोणता? यावर लोलो काहीशी गोंधळली आणि म्हणाली, काकाजी (राजेश खन्ना) के साथ ‘राज’ और संजय खानजी के साथ ‘दस लाख’… तिचं उत्तर बरोबर होते, कारण बबिताने एकाच वेळेस हे दोन चित्रपट स्वीकारले. बबिताने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले त्याच सुमारास लीना चंदावरकर, हेमा मालिनी, जया भादुरी, रेखा, राखी, योगिता बाली म्हणजे स्पर्धा तगडी होती. बबिता एकेकाळी असंख्य कॉलेज गर्लची “फॅशन आयकॉन” होती. तिचा टाइट चुडीदार कुर्ता, हूप इअर
रिंग्स आणि गो-गो आय ग्लासेस त्या काळातील युवती आजही विसरलेल्या नाहीत. त्यांनी जमेल तेवढी ती केली. बबिताने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकले तेव्हा अभिनय येणे वा असणे याला ‘छान दिसणे’ असा पर्याय एस्टॅब्लिश होत होता. बबिताचे वडिल हरी शिवदासानी असून ते सिंधी होते आणि आई फ्रेंच महिला होती. साधना आणि बबिता या दोघी चुलत बहिणी. बबिताने डोली, किस्मत, ‘ फर्ज’, ‘तुमसे अच्छा कौन है’, ‘हसीना मान जाएगी’, एक श्रीमान एक श्रीमती, ‘अनजाना’,’कब क्यो और कहां’,’पहचान’, अनमोल मोती, बनफूल, सोने की लंका, एक हसिना दो दीवाने अशा अनेक चित्रपटात भूमिका साकारताना राजेंद्रकुमार, मनोजकुमार, शम्मी कपूर, शशी कपूर, जितेंद्र यांची नायिका बनण्यात यश मिळवत आपली स्पेस निर्माण केली.
यातील काही पिक्चर्सच्या सुपर हिटने बबिता नावाला ग्लॅमर आलं… अशा चढत्या भाजणीत आर. के. फिल्मच्या रणधीर कपूर दिग्दर्शित ‘कल आज और कल’मध्ये कपूर खानदानातील तीन पिढीसोबत (पृथ्वीराज कपूर, राज कपूर व रणधीर कपूर) एकाच वेळेस काम करण्याची संधी मिळताच बबिताची किस्मत आणखीन उघडली. रणधीरला लाडाने/प्रेमाने डब्बू असं म्हणता म्हणता तोच तिच्या प्रेमात पडला. पिक्चर पूर्ण होता होता ती कपूर खानदानाची सूनही झाली आणि संसारातही रमली.
काही वर्षातच दोन मुलींचा जन्म झाला. पण कशावरुन तरी या संसारात कुरबूर, कटकटी, भांडणे, गैरसमज वाढत वाढत गेले आणि बबिता आपल्या दोन मुलींना घेऊन चेंबूरच्या आर. के. काॅटेजमधून बाहेर पडली आणि वर्सोव्यात वेगळी राहू लागली… गाॅसिप्स मॅगझिनमधून यावर काहीबाही लिहून आले. ही ‘स्टोरी’ एव्हाना ‘मागील रिळा’त राहिलीय. काळ पुढे सरकायलाय आणि ते आता पुन्हा एकत्र आलेत. काही का असेना, दुरावलेली नाती पुन्हा जुळायला हवीतच. मग ती कपूर खानदानातील का ना असत? बबिताला वयाच्या पंचाहत्तरीत ही छानशी भेटच. एक गोष्ट महत्वाची, नटी म्हणून आपलं करियर फार नसले तरी आपल्या दोन्ही मुलींना यशस्वी स्टार ॲक्ट्रेस म्हणून बबिताने घडवले…
दिलीप ठाकूर
glam.thakurdilip@gmail.com