कार्लोस अल्काराझ… हे नाव खरंतर कुणाला फारसं ठाऊकही नव्हतं. युएस ओपनमधील त्याचा गतसालचा विजय किंवा एटीपी रँकींगच्या शोकेसमधील वाढता आलेखही कुणाला फारसा आशावादी ठेवत नव्हता. कारण आजवरच्या यशात तो जोकोविच किंवा नदाल या दोन दिग्गजांचा सामना करून पुढे आलाच नव्हता. विम्बल्डनच्या हिरवळीवर तो कसा खेळेल याचा अंदाज कुणालाही नव्हता. पाच सेटमधील लढती जिंकण्याची ज्याला सवय जडली होती त्या जोकोविचपुढे अंतिम फेरीत त्याची डाळ शिजेल असं वाटतही नव्हतं.
विजेतेपदावरच्या हक्कासाठीची झुंज जेव्हा पाचव्या सेटपर्यंत गेली तेव्हा मात्र कार्लोसचा कारभार आटोपलाच असं सर्वांना वाटायला लागलं; पण विम्बल्डनच्या हिरवळीची खासियतच आहे की दिग्गजांना पराभवाचे धक्के देण्याची प्रेक्षकांना अघटित अशा घटनांचे साक्षीदार बनविण्याची. जॉन बोर्गपासून किंवा त्याआधीही अशी धक्कादायक निकालांची सवय प्रेक्षकांना जडली आहे. सलग पाच विम्बल्डन विजेतीपदे पटकाविणाऱ्या बोर्गला हरविणारा जन्माला आला की नाही इथवर प्रश्न त्यावेळी पडला होता. पण मॅकॅन्रो आला आणि त्याने बोर्ग नावाची अभेद्य भिंत पाडली. तेव्हापासून टेनिस शौकिनांना विश्वास वाटायला लागला की चॅम्पीयन्स देखील पराभूत होतात. पण गेल्या दोन दशकात पुन्हा एकदा तसं काही घडू शकतं यावरचा विश्वास उडायला लागला होता. कारण फेडरर, नदाल आणि जोकोविच यांच्या तावडीतून काहीच सुटत नव्हतं. गतसाली १० पैकी ८ ग्रॅन्ड स्लॅम विजेतीपदे नदाल- जोकोविच यांनी वाटून घेतली होती. अशा वातावरणात कार्लोस नावाचा आशेचा किरण लुकलुकला. फ्रेंच ओपनमध्ये जोकोविचविरुद्ध कार्लोस मानसिकदृष्ट्या टिकेल का, असा सवाल केला जात होता. पण वीस वर्षीय कार्लोसन अल्पावधीतच आपण अनेक गोष्टी चटकन आत्मसात करू शकतो हे सिद्ध केले. त्याचाच परिणाम विम्बल्डन अंतिम लढतीत पहावयास मिळाला.
विम्बल्डनच्या इतिहासात कार्लोस हा सर्वात तरुण वयाचा चॅम्पियन म्हणून उदयाला आला. याआधी बोरिस बेकर आणि जॉर्न बोर्ग या दोघा तरुणांनाच असा पराक्रम करता आला होता. बोर्गचे विम्बल्डन साम्राज्य मॅकॅन्रोने खालसा केले. त्या धक्क्यातून बोर्ग सावरलाच नाही. अवघ्या २६ व्या वर्षीच त्याने टेनिस सोडले. जोकोविच मात्र कार्लोसच्या धक्क्याने खचला नाही. खरंतर जोकोविच हा देखील थोडा बहुत मॅकॅन्रोसारखाच बडबड्या. पण कार्लोसने पराभूत केल्यानंतर त्याने ताळतंत्र सोडले नाही. तक्रारीचा सूरही काढला नाही. उलट त्याने कार्लोसची स्तुती केली; अभिनंदन केले. कार्लोसच्या टेनिस कौशल्य शैलीला सलाम केला. कार्लोसमध्ये किंवा कार्लोसच्या खेळात माझा, फेडररचा आणि नदालचा खेळ यांचे सुरेख मिश्रण असल्याचे सांगितले. कार्लोससाठी ही प्रतिक्रीया अधिक मोलाची आहे.
स्पेनमधल्या मुर्सिया विभागात शंभर वर्षांपूर्वी “हंटर्स सोसायटी” हा शिकाऱ्यांचा क्लब स्थापन झाला. डोंगराळ भागात कबुतरांच्या शिकारीसाठी हा क्लब प्रसिद्ध होता. हवेत कबुतरे उडवायची आणि ती टिपायची. कालांतराने याच क्लबचे टेनिस क्लबमध्ये रुपांतर झाले. आजही कबुतरांच्या शिकारीचा क्लब ही ओळख कायम आहे. मात्र आज तेथे टेनिसचाच बोलबाला आहे. त्या क्लबने छोट्या म्हणजे चार-पाच वर्षांच्या कार्लोसचे आगळे वेगळे टेनिस कौशल्य प्रथम पाहिले. वडिलांबरोबर कार्लोस कोर्टवर जायचा. त्यामुळे वयाच्या पाचव्या वर्षीच त्याच्या हातात टेनिस रॅकेट आले. त्याआधी म्हणजे वयाच्या चौथ्या वर्षी कार्लोस आपल्या भावासोबत टेनिसचा सराव करायचा. कार्लोसचे वडिल टेनिस प्रशिक्षक होते. एका हातात खेळणी आणि दुसऱ्या हातात टेनिस रॅकेट, अशा अवतारातच तो वडिलांसोबत क्लबवर जायचा. कार्लोसच्या वडिलांना मोठे टेनिस खेळायचे होते. आर्थिक अडचणींमुळे त्यांना खेळाडू म्हणून करिअर घडविता आले नाही; म्हणून ते टेनिस प्रशिक्षक व प्रशासक झाले. पण त्यांनी आपल्या मुलातील कार्लोसमधील अफाट आणि अचाट टेनिस गुणवत्ता पाहिली होती. त्यांना स्वत:चे स्वप्न मुलाच्या रुपाने साकारताना दिसत होते. क्लबवर कार्लोस… “कार्लिटोस” या टोपण नावाने त्यावेळी परिचित होती. त्याच्या टेनिस कर्तृत्वामुळे सारेच आचंबित झाले होते. कारण तो आक्रमक आणि ऑल कोर्ट टेनिस खेळायचा. नाविन्यपूर्ण फटके मारायचा ध्यास त्याला होता. समोरच्याचे फोरहॅन्ड फटके सहज परतवायचा. ड्रॉप शॉट्स मारताना दमायचा नाही, नेटवर सतत धावायचा. त्याचं वय तेव्हा होते अवघे १३. मोठा खेळाडू होण्याची ही लक्षणे होती. आजही कार्लोस तसेच टेनिस खेळतो. प्रत्येक फटका त्याने सरावादरम्यान घोटून घेतला होता. शिकलेला प्रत्येक फटका सामन्यात वापरण्याचे धारिष्ठ्य त्याच्याकडे होते.
कार्लोसला लहानपणीही पराभूत व्हायला आवडायचे नाही. तो शिघ्रकोपी होता. रागात रॅकेट फेकायचा. पराभूत झाल्यानंतर कोर्टवरून बाहेर जायला नकार द्यायचा. हरल्यावर रडायचा देखील. अजूनही कार्लोस “बॅड लूझर” आहे असं त्याचे वडिल म्हणतात.