सचिन पिळगांवकर, डॉ. श्रीराम लागू, रिमा लागू, विक्रम गोखले, सुमित राघवन, विजय कदम, पल्लवी जोशी, दिलीप प्रभावळकर इथपासून ते अगदी केशवराव भोसले यांच्या संगीत रंगभूमीपर्यंत अनेकांनी बालकलाकार म्हणून रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले आणि तोच भविष्याचा महामार्ग ठरला. बाळाचे पाय रंगभूमीवर सांगणारे दिग्गज रसिकांनी अनुभवले.
त्यांच्यावर प्रेम केलं. अशा बाळांची यादी तयार करण्याचा प्रयत्न केल्यास तो जवळजवळ सर्वांनाच लागू ठरेल. कारण आजचे ग्लॅमरस कलाकार हे कधी ना कधी बालकलाकार म्हणून रसिकांना सामोरे गेले असतीलच. त्यातील काही निवडकांवर एक जागर…
मराठी रंगभूमीला अभिमान वाटावा असा सचिन पिळगांवकर जो बालकलाकार ‘मास्टर सचिन’ म्हणून गाजला आणि सिनेसृष्टीतला शहनशहा अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा चित्रपटांची ‘संख्याबळ’ अधिक असलेला ठरला आपला सचिन!
‘अपराध मीच केला’ हे १९६४ साली रंगभूमीवर आलेलं नाटक. त्यातल्या लहान संजूची भूमिका त्याने केली.
ते नाटक कालेलकरांनी लिहिलेलं आणि आत्माराम भेंडे यांचे दिग्दर्शन होतं. अरुण सरनाईक, शरद तळवळकर, कामिनी कदम, लता थत्ते अशी बरीच दिग्गज मंडळी त्यात होती. हे नाटक सचिनच्या आयुष्यातलं रंगमंचावरला व्यावसायिकवर शुभारंभ ठरला. अडीचशे प्रयोगांवर सचिनने भूमिका केली. वय वाढलं. त्यामुळे सचिनने हे नाटक सोडलं.
‘अपराध’मधला संजूबाळ गाजला, त्यानंतर प्रभाकर पणशीकर यांच्या ‘नाट्यसंपदा’च्या ‘म्हैस येता माझ्या घरा’ हे फार्सिकल नाटक सचिनपुढे चालून आलं. काही प्रयोग त्याचे जरूर झाले पण प्रयोग फसला तरीही ‘सचिन’ मात्र नाट्यक्षेत्रात एक बालकलाकार म्हणून रसिकांच्या पुरता लक्षात राहिला. नंतर सत्तरएक प्रयोग झालेले ‘शिकार’ हे नाटक. कालेलकरांची संहिता मधुकर तोरडमल यांचे दिग्दर्शन.
१९६४ ते १९७३ या कालावधीत ‘सचिन’ने मराठी रंगभूमीवर पदार्पण केले आणि १९६३ साली ‘हा माझा मार्ग एकला’ यात बालकलाकार म्हणून चित्रपटातही पदार्पण केलं. उत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर ‘पोरांनं नाव काढलं!’ अशी प्रत्येक मराठी माणसाची भावना होती.
मराठी रंगभूमीवर ‘हिमालयाची सावली’ असलेले नटसम्राट डॉ. श्रीराम लागू म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, वैचारिक, सामाजिक जगतातले दीपस्तंभच होते. डॉ. श्रीराम लागू हे पुण्याचे. सदाशिव पेठेतले. बालवयात त्यांनी शाळेच्या गॅदरींगमध्ये रंगमंचाला स्पर्श केला, पण तेव्हा समोरची गर्दी बघून ते कमालीचे घाबरले. बोबडी वळली.
याचा किस्सा त्यांच्या तोंडून एकदा ऐकायला मिळाला होता आणि त्यांच्या ‘लमाण’ या आत्मचरित्रातही त्याची नोंद आहेच. ते गर्दीमुळे हादरून गेले ‘पुन्हा कधीही नाटकाच्या आसपास उभ्या जन्मात फिरणार नाही!’ अशी प्रतिज्ञाच त्यांनी केली; पण ही प्रतिज्ञा भविष्यात फसली. ‘नटसम्राट’पद त्यांच्यापुढे चालून आले… अभिनयाचे विद्यापीठ ठरले!
बालकलाकार ते अभिनेत्री असा प्रवास केलेल्या अभिनेत्री रिमा लागू या मूळच्या गिरगांवकर. त्यांच्या मातोश्री मंदाकिनी भडभडे. मराठीतील अभिनेत्री. त्यांची नाटके त्याकाळी गाजत होती. बालवयात रंगभूमीवर छोट्या भूमिका त्यांनी केल्या. पुढे हौशी व्यावसायिक रंगभूमीकडे त्या ओढल्या गेल्या. ‘पुरुष’ नाटकातील अंबिकाची भूमिका विशेष गाजली. हिंदी सिनेसृष्टीचीही दारे उघडली गेली. ग्लॅमरस रूपातली आई म्हणून त्यांचे चित्रपट गाजले.
अभिनेते विजय कदम. यांच्याही ग्लॅमरस वाटचालीत बालकलाकार म्हणून महत्त्वाचा टप्पा आहे. डॉ. शिरोडकर हायस्कूलमध्ये शालेय आणि रूपारेल कॉलेजात महाविद्यालयीन शिक्षण घेतांना ‘नाटक’ पक्के रुजले गेले. ‘राजा भिकारी माझी टोपी चोरली!’ या बालनाट्यात पोलीस हवालदाराची त्यांनी केलेली भूमिका हा शुभारंभ ठरला. ‘खुमखूमी’हा त्यांचा एकपात्री प्रयोग आणि ‘विच्छा माझी पुरी करा’ यातला हवालदार रसिकांच्या स्मरणात आहे.
गिरणगावातले संस्कार असलेला हा गुणी अभिनेता आपल्याच बालवयातल्या भूमिकांकडे अभिमानाने बघतो. बालवयात केलेला ‘हवालदार’ त्यांच्यात जणू फिट्ट बसलाय; कारण आजवर अनेक नाटके, चित्रपट, मालिका, जाहिराती यात हवालदाराची भूमिका त्यांच्या दिशेने आजही चालून येतेय. हा ही एक योगायोगच.
अष्टपैलू अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या बहुरंगी भूमिकांमध्ये ‘बालनाट्या’तील मुखवटे हे विसरता येणं शक्य नाही. दादरच्या भवानीशंकर मार्गावरल्या सोसायटीत असलेल्या शारदाश्रमात त्यांचे शिक्षण झाले. इयत्ता दुसरीत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांनी भूमिका सर्वप्रथम केली. दिवाकरांच्या नाट्यछटेतील ‘पंतोजी’ आणि ‘गड आला पण सिंह गेला’ यावरले नाटुकले होते.
पुढे प्रत्येक वर्षी गणेशोत्सव, वार्षिकोत्सव यात कुठली ना कुठली भूमिका त्यांनी केली. पण त्यांनी तरुणपणी केलेली ‘चेटकीण’ ही गाजली. रत्नाकर मतकरी यांच्या बहुतेक बालनाट्यात त्यांची हजेरी ही जणू व जशी ठरलेलीच. वयाची पंचाहत्तरी केव्हाच पार केली असली तरी ‘शारदाश्रमातला शिवाजी’ त्यांच्या स्मरणात आहे.
रूपारेल कॉलेजचा माजी विद्यार्थी असलेला सुमित राघवन याला बालपणापासूनच नाटकाचे आकर्षण. जन्मदाते तामिळ, कानडी असले तरी घरात, शाळेत मराठमोळे संस्कार. १९८३ साली आलेल्या ‘मास्टर फेणे’ या मालिकेने त्याचे या ग्लॅमरस दुनियेत पक्के पाय रोवले गेले. व्यावसायिक नाटके, सूत्रसंचलन, चित्रपट, डबिंग यातही त्याने मजबुतीने वावर केला. शालेय आणि महाविद्यालयीन स्पर्धेत गायन, अभिनय यात पुरस्कार मिळविले. एकेकाळी बालकलाकार होतो याचा अभिमान त्याला वाटतो.
रंगमंचावर बालकलाकार म्हणून ठेवलेलं पहिल पाऊल या नुसत्या आठवणीने भारावल्यागत होणारे रंगकर्मी आहेत. संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळात तर उभा संसार प्रसंगी पडेल ते काम करून नाटक सांभाळत असे. त्यातून एकेक ‘घराणी’ जन्माला आली. तो स्वतंत्र विषय ठरेल. या बाळांचे पाय नाटकात दिसले आणि नाट्यसृष्टी धन्य झाली.
संजय डहाळे
sanjaydahale33@gmail.com