पुणे नवरात्री 2025
सुनयना सोनवणे/पुणे: उद्योग-व्यवसायामुळे गौड सारस्वत ब्राम्हण (जीएसबी) समाज हा महाराष्ट्रसह अनेक प्रांतांमध्ये विखुरला गेला आहे. पुण्यातील अनेक कुटुंबे या समाजाशी जोडली आहेत. या समाजाच्या ऐक्यसाठी जीएसबी संयुक्त कोंकणी सभा १९८३ मध्ये स्थापन करण्यात आली. ही सभा पुण्यातील धार्मिक व सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि समाजातील एकतेसाठी हा शारदोत्सव वर्षानुवर्षे आयोजित करत आहे, ज्यामुळे सर्व सहभागी भक्ती आणि आनंदाच्या वातावरणात रमून जातात.
गौड सारस्वत ब्राह्मणांचे मूळ सारस्वत प्रदेशात आहे, जे प्राचीन भारतातील आता कोरड्या पडलेल्या सरस्वती नदीच्या काठावर वसलेले असल्याचे मानले जाते. असे मानले जाते की ते सुमारे ७ व्या शतकात ग्वाडा देश (सध्याचा बिहार आणि बंगाल) येथून कोकण किनाऱ्यावर, गोव्यासह कोकण किनाऱ्यावर स्थलांतरित झाले. म्हणूनच त्यांना ग्वाडा सारस्वत ब्राह्मण हे नाव पडले. बहुतेक जीएसबी गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि देशाच्या इतर भागात स्थलांतरित झाले. अनेक उपसमुदायांमध्ये चित्रपूर सारस्वत, राजापूर सारस्वत ब्राह्मण आणि इतर समाविष्ट आहेत. या समाजाची पाळेमुळे सरस्वती नदीच्या काठी असलेल्या गौड गावात रुजलेली आहेत.
पुण्यातल्या या शारदोत्सवाला भक्ती-रसपूर्ण वातावरणात सुरुवात २८ सप्टेंबरला शुभारंभ लॉन्स, डी. पी. रोड, म्हात्रे पुलाजवळ करण्यात आली. देवीस्तुती आणि ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चाराने, पारंपरिक वाद्यांसह ढोल-ताशा आणि शंखनादाच्या गजरात सुरुवात झाली.
या उत्सवाद्वारे महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि गुजरातमधील सांस्कृतिक परंपरा एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यंदा हा शारदोत्सव दुसऱ्यांदा आयोजित केला जात असून, समाजाच्या एकत्रिकरणासाठी आणि रूढी-परंपरा पुढील पिढीस प्रेषित करण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरतो, असे खजिनदार बिपिन पंडित यांनी सांगितले.
शारदोत्सवातील प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम
महोत्सवादरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. यात प्रार्थना, सुप्रभात भजन, प्राणप्रतिष्ठापना, पंचदुर्गा हवन, चंडिका हवन, कन्यापूजन, सुहासिनी पूजन, श्री सुक्त हवन, रामनामतारक मंत्र हवन, तुलभारसेवा, कुंकुमार्चन, पूर्णाहुती, माध्यान महापूजा, अन्नसंतार्पण, दुर्गा नमस्कार, रंगपूजा, रात्रीपूजा, दीपलंकार सेवा, रामनाम पठण, रोज रात्री भजन आणि कीर्तन यांचा समावेश आहे. तसेच २ ऑक्टोबर पर्यंत रोज दांडियाचे आयोजनही केले आहे.
शाडू मातीपासून देवीची मूर्ती
उत्सवासाठी देवी सरस्वतीची सुमारे साडेचार फूट उंचीची राजस मूर्ती शाडू मातीपासून साकारण्यात आली आहे. ही माती कर्नाटकातून आणली गेली असून, मूर्तीही कर्नाटकातील कलाकारांनी घडवली आहे.