हिंदी झालेच हो, देशातील अन्य प्रादेशिक भाषेतील चित्रपटांच्या तुलनेत मराठी चित्रपट आशयदृष्ट्या नक्कीच सकस आहे. जगभरातील अनेक देशांतील महोत्सवात मराठी चित्रपट सहभागी होतोय, अनेक पुरस्कार देखील प्राप्त होत आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीत सतत नवीन चित्रपटांच्या घोषणा अथवा मुहूर्त, प्रमोशन- प्रीमियर, पुरस्कार सोहळे आणि उत्पन्नाचे मोठ्ठे आकडे. असं एकूणच सकारात्मक वातावरण आहे. मराठी चित्रपटाचे विदेशातही (विशेषत: लंडन) मोठ्याच प्रमाणावर चित्रीकरण होतेय. असं असूनही भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील भारतीय पॅनोरमा विभागात एकाही मराठी चित्रपटाची निवड होऊ नये? आश्चर्य व्यक्त करावे की दु:ख?
प्रत्येक चित्रपट महोत्सवाचं आपलं एक व्यक्तिमत्व असते. ओळख असते. शैली असते. तशीच ती भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीचीदेखील आहे आणि त्यातही विशेष करुन भारतीय पॅनोरमा हा विभाग अतिशय महत्त्वपूर्ण आणि लक्षवेधक. आता भारतीय पॅनोरमा म्हणजे काय? तर त्या त्यावर्षी भारतातील हिंदी, मराठीसह सर्व प्रादेशिक भाषांमध्ये निर्माण झालेल्या चित्रपटांसाठीचा एक विभाग. अर्थात या विभागात चित्रपटाची निवड करताना त्यात महत्वाचा निकष असतो. त्या भाषेतील चित्रपटांनी कोणती एखादी नवीन थीम अथवा एखादा नवा दृष्टिकोन, एखादी वेगळी दिग्दर्शनीय शैली दाखवली आणि एकूण त्या चित्रपटाचा सामाजिक प्रभाव या सर्वांचा सारासर विचार केला जातो. त्यात काही चित्रपट प्रभावी ठरतात तर काही भाषेतील चित्रपट मागे पडतात.
भारतीय पॅनोरमा हा विभाग भारतातील विविध राज्यातील चित्रपटांच्या प्रगतीचा एक प्रकारचा आढावाच असतो आणि त्याच्यातून एक वैचारिक देवाण-घेवाण होते. इतकंच नव्हे तर अन्य भाषेतील चित्रपटांमध्ये सध्या काय चाललेलं आहे, कोणते वेगळे विषय आले आहेत, त्याच्यामधला मतप्रवाह, एक वेगळा दृष्टिकोन हे जाणून घेण्याची आणि अभ्यासण्याची संधी म्हणजे भारतीय पॅनोरमा. इफ्फीत त्याचे एक अतिशय माहितीपूर्ण पुस्तकही प्रकाशित करण्यात येते. भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मुख्य विभाग, भारतीय पॅनोरमा, यशस्वी चित्रपट, सिंहावलोकन आणि इतर काही असे वेगवेगळे विभाग असतात.
देश विदेशातील अनेक भाषेतील चित्रपट त्यात दाखल होतात. एक प्रकारे ही ‘चित्रपटाची जत्रा’च! प्रत्येक वर्षी २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत पणजी, गोवा येथे आयोजित केल्या जात असलेल्या या चित्रपट महोत्सवामध्ये आपला चित्रपट दाखल व्हावा, तो अनेकांनी पहावा, त्यावर व्यक्त व्हावे हा अनेक पटकथालेखक, दिग्दर्शक, कलाकार, निर्माते, तंत्रज्ञ यांची एक इच्छा असते. कारण त्यामुळे एक प्रकारची प्रतिष्ठा वाढते. ओळख मिळते. आत्मविश्वास वाढतो. आपला चित्रपट सदर महोत्सवासाठी हजर राहिलेल्या अन्यभाषिक चित्रपट विश्लेषक, अभ्यासक, पत्रकार यांच्यापर्यंत पोहचतो हे सगळेच सुखावणारे असतं. अशा सर्व पार्श्वभूमीवर विचार करता आणि या महोत्सवातील पॅनोरमा विभागांमध्ये आपल्या भाषेचे चित्रपट दाखवण्याने एक फार मोठा आनंद किंवा आधार मिळतो हेच अधोरेखीत स्पष्ट होतं आहे. परंतु, २०२३ च्या भारतीय पॅनोरमासाठी निवडलेल्या पंचवीस चित्रपटांमध्ये एकाही मराठी चित्रपटाची निवड झाली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
जवळपास पंधरा- सतरा वर्षे वर्षभरामध्ये मराठीमध्ये शे-सव्वाशे मराठी चित्रपट निर्माण होत आहेत. त्यातील काही चित्रपट हे अतिशय दर्जेदार, वेगळे, आशयघन असतात. जगभरातील अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये मराठी चित्रपटात दाखल होतोय. नवीन शैलीचे पटकथालेखक , दिग्दर्शक निर्माते आणि कलाकार चित्रपट माध्यम व व्यवसाय यातून काहीतरी सांगण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न करतात या पार्श्वभूमीवर जर भारतीय पॅनोरमामध्ये एकाही मराठी चित्रपटाची निवड झाली नसेल तर ते खरंच अचंबित करण्यासारखंच आहे. असं का बरं झालं असावं? त्याहीपेक्षा वाईट वाटतं की यावर म्हणावी तशी प्रतिक्रिया उमटली नाही. मराठी चित्रपटसृष्टी वर्षभरात सतत लहान मोठे चित्रपट महोत्सव, नवीन चित्रपटाचे मुहूर्त, प्रीमियर, प्रमोशन, विदेशातील चित्रीकरण (विशेषतः लंडनमध्ये) उत्पन्नाचे मोठमोठे वाढते आकडे यातून सतत फोकसमध्ये असते.
सतत चर्चेत असते. अशा मराठी चित्रपटसृष्टीला भारतीय पॅनोरमात अजिबात प्रतिनिधित्व मिळत नसेल तर याचाच अर्थ मराठी चित्रपट हा अन्य भाषिक चित्रपटांच्या तुलनेमध्ये कुठे मागे तर पडलेला नाही ना किंवा तो त्याचा आत्मविश्वास गमावत नाही ना असा प्रश्न पडतो. आपण एक सहज म्हणून या पॅनोरमासाठी निवडलेल्या चित्रपटांमध्ये काही नाव सांगायची तर वॅक्सिन वाॅर, केरला स्टोरी, गुलमोहर, सिर्फ एक बंदा त्याचप्रमाणे अर्धांगिनी (बंगाली), इराट्टा (मल्याळम), व्हॅट्टम (मल्याळम), मलिकपुरम (मल्याळम), मंडली (हिंदी), सना (हिंदी), वध (हिंदी) इत्यादी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. म्हणजे हिंदी, बंगाली, मल्याळम कन्नड तेलगू अशा विविध भाषेतील पंचवीस चित्रपट या भारतीय पॅनोरमात आपापल्या चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व करणार आहेत. परंतु त्यात मराठी चित्रपट नसल्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीची एकूणच गैरहजरी या महोत्सवामध्ये जाणवेल यात शंका नाही. पण या गोष्टीमुळे मराठी चित्रपटसृष्टी अंतर्मुख होणार आहे का अथवा आपण ज्या मार्गावरून चाललोय त्यात वेगळ्या प्रवाहातील चित्रपट निर्माण होत आहेत ते या महोत्सवाच्या बारा जणांच्या निवड समितीला आकृष्ट का करु शकले नाहीत का? प्रभावित करु का शकले नाहीत ? याचा सखोल शोध घेतील? अभ्यास करतील? या चित्रपटाची निवड केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय आणि नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात एन एफ डी सी यांच्या संयुक्त विद्यमाने केली जाते आणि ती करताना अर्थातच यावर्षीच्या चित्रपटांमध्ये वेगळं काय दाखवले गेले अथवा त्यांनी त्या भाषेतील चित्रपटाला आणखीन किती पुढे नेलं याचा प्रामुख्याने विचार होतो.
तर त्या पार्श्वभूमीवर मराठी चित्रपट खरंच का बरं कमी पडला आहे का? का कमी पडत असावा याचा प्रॅक्टीकली विचार करणे आवश्यक आहे. कथाबाह्य विभागात मात्र तीन मराठी निवड झाली आहे. त्यामध्ये सुमीरा राॅय दिग्दर्शित ‘भंगार’, प्रथमेश महाले दिग्दर्शित “प्रदक्षिणा” आणि अभिजीत अरविंद दळवी दिग्दर्शित “उत्सवमूर्ती” या चित्रपटांचा समावेश आहे. ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट. मात्र चित्रपट महोत्सवाचा गाभा असलेल्या भारतीय पॅनोरमात मराठी चित्रपटात नसणं ही एक प्रकारची शोकांतिका अथवा मराठी चित्रपटाच्या गुणवत्तेबद्दल केलं जातं असलेले कौतुक खरंच स्वागतच आहे का की ते फसवे आहे याचासुद्धा कठोर विचार करावा लागेल. फार पूर्वी म्हणजे ऐंशी-नव्वदच्या दशकामध्ये भारतीय पॅनोरमासाठी वर्षभरातून विविध भाषेतील एकवीस चित्रपट निवडले जात. त्या काळात भारतीय पॅनलमध्ये एखाद्या मराठी चित्रपटाला जरी संधी तरी ते समाधान देणार होतं.
कारण त्या काळात एकूणच मराठी सिनेमा हा अशा प्रकारच्या महोत्सवांपासून काहीसा अलिप्त असे अथवा त्याच्यामध्ये तो हरवल्यासारखा वाटेल. एखादा “स्मृतीचित्र” अथवा “सूत्रधार” सारख्या चित्रपटाची भारतीय पॅनोरमात निवड झाली आहे. तेवढ्याचाही आनंद होई. परंतु कालांतराने मराठी चित्रपटांनी कात टाकली. विशेषतः संदीप सावंत दिग्दर्शित “श्वास” (२००३) या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये सुवर्ण कमळ पुरस्कार प्राप्त झाला आणि ऑस्करसाठीची भारताची प्रवेशिका म्हणून निवड झाली आणि मराठी चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. मराठीत कसदार, आशयपूर्ण चित्रपट बनतात, यावरचा अन्यभाषिक चित्रपट रसिकांत सुद्धा विश्वास वाढला. “श्वास”पासून एक प्रकारची सकारात्मक वाटचाल आणि उर्जा मराठी चित्रपटसृष्टीला लाभली. तसं पाहिलं तर तर मराठी सिनेमाच्या जन्मापासूनच मराठीमध्ये “दर्जेदार आशयघन कथा” हाच त्या चित्रपटाचा “स्टार” असतो. रसिकही मराठी चित्रपट पाहताना त्यामध्ये गोष्ट कोणती आहे, कशा पद्धतीने मांडली गेली आहे, प्रतिकात्मक दृश्यांचा बोलका वापर करण्यात आला आहे का याना प्राधान्य देतो. हा इतिहास आहे. हे मराठी चित्रपटाचे वेगळेपण आहे आणि ताकद आहे; परंतु दुर्दैवाने कालांतराने विशेषत: नव्वदच्या दशकांत मराठी चित्रपटसृष्टीची दुर्दैवाने घसरगुंडी झाली.
विशेषतः उपग्रह वाहिनीच्या आगमनानंतर मराठी चित्रपटाला सेटबॅक बसला. तेव्हा याच मूळ गोष्टीकडे मराठी सिनेमासृष्टीचे दुर्लक्ष झालं. परंतु “श्वास”नंतर पुन्हा एकदा मराठी चित्रपट सृष्टीने मोठी झेप घेतली आणि त्यानंतर सातत्याने मराठी चित्रपट जगभरातील अनेक चित्रपट महोत्सवामध्ये दाखल होत आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने काही वर्षांपासून कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मार्केट विभागासाठी प्रत्येक वर्षी तीन मराठी चित्रपट पाठवले जातात. त्या चित्रपटांची तिकडे जरी विक्री होत नसली तरीसुद्धा कान्समध्ये मराठी चित्रपटाचं एक प्रकारचं अल्पस का होईना परंतु अस्तित्व निर्माण करण्यामध्ये यश मिळते. या सगळ्या पार्श्वभूमीवर फक्त जर भारतीय पॅनोरमात मराठी चित्रपटाला प्रतिनिधित्व नसेल तर मात्र मराठीमध्ये जे वेगळे प्रयोग होतात ते प्रयोग योग्य दिशेने होत आहेत का की त्या प्रयोगांचा म्हणावा तसा प्रभाव निवड समितीवर पडत नाही का असा मात्र विचार करावा लागेल. मराठी चित्रपटसृष्टीच्या आत्मविश्वासाला आणि अस्तित्वाला दुर्दैवाने धक्का देणारी ही गोष्ट नाही ना असा या निमित्ताने प्रश्न पडतो…काय योगायोग आहे बघा. बरोब्बर वीस वर्षांपूर्वी ‘श्वास’च्या मराठी चित्रपटाने कात टाकली. आणि सामाजिक सांस्कृतिक माध्यम क्षेत्रात मराठी चित्रपटाचा डंका वाजू लागला. मराठी चित्रपट फ्रंट फूटवर आला आणि आता भारतीय पॅनोरमात तो नसल्याने काहीसं बॅकफूटवर गेल्यासारखं वाटतं.
– दिलीप ठाकूर