१६ डिसेंबर हा आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील सुपर स्टार लक्ष्मीकांत बेर्डे याचा अठरावा स्मृतिदिन. १६ डिसेंबर २००४ रोजी सकाळी साडेपाच वाजता लॅन्डलाईन फोन खणखणला तेव्हाच मनात धस्स झाले. एखाद्या दुर्दैवी बातमीसाठीच हा फोन असणार. पलीकडून विजय कदम म्हणाला, आपला लक्ष्या गेला…
लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव मी सर्वप्रथम माझ्या गावदेवी- गिरगावच्या भवन्स काॅलेजमध्ये ऐकले. १९७८ चे दिवस होते. आयएनटी, उन्मेष यांच्या एकांकिका स्पर्धेत भाग घेऊ इच्छित असलेल्या विद्यार्थी विद्यार्थीनीनी काॅलेजच्या पहिल्या मजल्यावरील ऑफिसशेजारी भेटावे असे नोटीस बोर्डवर वाचून माझा मित्र राजेंद्र खांडेकरसोबत मीदेखिल हजर राहिलो. त्याला अभिनयात रस होता, मी तेव्हा वृत्तपत्रे/मासिकात पत्रलेखन करायचो. त्यात हौस मौज जास्त होती. त्यात असलेल्या ‘वाचकांची पत्रे ‘ या सदरासाठी आपणही पोस्टाने काही पाठवावे अशी एक प्रकारची “खुमखुमी” होती म्हणा ना? अभिनय हा आपला प्रांत नव्हे हे डोक्यात फिट्ट होते.
आमच्या संत नावाच्या मराठी विषयाच्या प्राध्यापकांनी राजन बने आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांसह आणखीन काही जणांची निवड केली. रमेश पवार लिखित ‘द ग्रेटेस्ट सॉव्हरीन’ ही ती एकांकिका होती आणि आमच्या कॉलेजची एकांकिका म्हणून आमच्या कॉलेजचे भारतीय विद्या भवन, एल्फिस्टन कॉलेजचे सभागृह येथे प्रोत्साहन द्यायला गेलो… तेव्हा फक्त लक्ष्याला पाहणे होत होते.
याच लक्ष्मीकांत बेर्डेशी काही वर्षांनी तो मराठी चित्रपटसृष्टीतील सुपर स्टार आणि मी सिनेपत्रकार म्हणून सातत्याने भेट होईल, त्याच्या घरी जेवायला जाणे होईल, आपल्या वाढदिवसानिमित्त तो ओली पार्टी देतो त्यात ‘रम’णे होईल, तो माझ्या ‘तारांगण’ या पुस्तकाला प्रस्तावना देईल असे कधीच वाटले नव्हते. पण आमचे नाते छोट्या छोट्या भेटीतून घडत गेले, वाढत गेले, आकाराला येत गेले, घट्ट होत गेले…. कोणत्याही नात्याची वीण अशीच असावी तरच ती घट्ट होते हे अनुभवाचे बोल. आणि ठरवून नाते निर्माण होत नसते. निदान त्या काळात तरी नक्कीच नाही.
कॉलेजच्या त्याच वर्षी कॉलेजच्या निवडणुकीत भारतीय विद्यार्थी सेनेचा दणदणीत विजय झाल्याने कॉलेज परिसरातच कच्ची बाजात आमच्या सोबत लक्ष्याही नाचायला होता. तोपर्यंत त्याच्याशी फक्त चेहरा ओळख होती इतकेच….(मोहन रावले तेव्हा विद्यार्थी सेनेचा प्रमुख होता आणि कालांतराने तो चार वेळा शिवसेना खासदार झाला.) त्यानंतर काही वर्षांतच समजले लक्ष्याने अथक परिश्रमांतून मराठी रंगभूमीवर संधी मिळवलीय.
तो आमच्या गिरगावातील कुंभार वाड्याचा रहिवासी आहे, युनियन हायस्कूलमध्ये शिकून भवन्सला आला होता आणि साहित्य संघ मंदिरात तो काही छोटी मोठी कामे करतोय हे माहित होत गेले होते. अगदी प्रसंगी बॅकस्टेजलाही कामं करायचा.
लक्ष्या आपल्या कॉलेजमध्ये दिसत नाही, तो रंगभूमीवर स्थिरावायला धडपडतोय हे माहित असतानाच्या काळातच मी मीडियात आलो. आता लक्ष्यालाही मराठी चित्रपटात भूमिका मिळत होत्या. पण म्हणावा तसा आमच्या भेटीचा योग येत नव्हता. तो एन. एस. वैद्य दिग्दर्शित ‘लेक चालली सासरला’, धाकटी सून या चित्रपटांच्या निमित्ताने आला आणि दोन्ही वेळा माझे पहिलेच वाक्य होते, मी गिरगावातच राहतो… त्या काळात एक गिरगावकर दुसरा गिरगावकर भेटला की त्याला ‘आपल्या घरचाच’ माणूस भेटल्याचा आनंद होई. तेथेच आमचे सूर जमले. आणि त्यानंतर अनेकदा तरी गिरगावच्या आठवणीत आम्ही दोघे हरखून जायचो.
लक्ष्याची एकच भेट नव्हे, तर अगणित भेटीचा सिलसिला वाढत गेला. गिरगाव सोडल्यावर तो अंधेरी पूर्वला राह्यला गेला, मग आंबोलीला आणि त्यानंतर यारी रोडला गेला. तेव्हा आपला पत्ता सांगताना म्हणायचा, रानी मुखर्जी राहते त्या कृष्णा कॉम्प्लेक्समध्ये मी राहतो. या प्रत्येक ठिकाणी त्याच्या घरी गेलोय आणि भरपूर मासे खाल्लेत.
ते खाऊन झाल्यावर आम्ही मुलाखतीला सुरुवात करु. तो नेहमीच म्हणायचा, बुधवार अथवा शुक्रवारी मुलाखतीला ये (कारण ते दिवस मासे खाण्याचे) त्याच्या घरी गेल्यावर सुरुवातीला इकडच्या तिकडच्या गप्पा. त्यात जमेल तितके गाॅसिप्स. मग जेवण. त्यात तळलेली तुकडी. मग आइस्क्रीम आणि त्यानंतर तास दीड तास मुलाखत.
त्या काळात एकट्याने दीर्घ मुलाखती होत आणि स्टारमधील माणसाची भेट होई. मुलाखत संपल्यावर पुन्हा काही अरबट चरबट गप्पा. (आज स्टार भेटल्यासारखा वाटेपर्यंत मुलाखत संपवावी लागते. कारण एक तर रांगेत उभे राहिल्यावर ती मिळालेली असते, आणि मागे खूप मोठी लाईन असते.) अगदी अखेरच्या काळात त्याने माझ्याकडे त्याच्या आत्मचरित्राची इच्छा व्यक्त केली.
चार्ली चॅप्लीनचे जसे एकेक गोष्ट आठवत आठवत, फ्लॅशबॅकमध्ये जात जात आत्मचरित्र आहे, तसेच माझे तू लिही असं म्हणताक्षणीच मी माझ्या गती आणि पध्दतीने कामाला लागलो. काही भेटी झाल्या, सुरुवातीचे काही भाग लिहिलेही… पण ते पूर्ण होणे त्याच्या नशिबात नव्हते. त्या काळात तो आजारी होता आणि संपूर्ण मनोरंजन क्षेत्राला याची माहिती झाली. आपला लक्ष्या गेला….
लक्ष्याने खरोखरच शून्यातून विश्व निर्माण केले. एक प्रकारचे झपाटेपण त्याच्यात होते आणि स्वतः अतिशय मेहनतीने स्वतःला घडवताना त्याने अनेकांना मदतीचा हात पुढे केला. तो अभिनय क्षेत्रात स्थिरावण्यासाठी धडपडत असतानाच त्याला एक रुपया अशी एक प्रकारची सायनिंग अमाऊंट देऊन त्याला महेश कोठारेने करारबध्द केले आणि ‘धुम धडाका’ (१९८५) पासून चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनात पाऊल टाकले. आता तो ‘टूरटूर’ इत्यादी नाटकांतून लक्षवेधक भूमिका साकारत होता.
लक्ष्या प्रचंड क्रिकेट शौकिन होता. अगदी वानखेडे स्टेडियमवर जाऊन त्याने मॅच पाहिल्याचे किस्से तो सांगायचा. क्रिकेटच्या मौसमात तर सेटवर एका बाजूला त्याच्यासाठी दूरचित्रवाणी संचाची व्यवस्था केली असे, दोन दृश्यांच्या मधल्या वेळेत तो सामना एन्जाॅय करायचा आणि त्यातूनच त्याला उर्जा मिळायची. अनेकदा तरी आमच्या गप्पात गिरगाव येई.
तेव्हा तो जुन्या आठवणीत हरखून जाई. विशेषतः गिरगावची सण संस्कृती त्याला जास्त प्रिय होती. शालेय वयात असताना तो अनंत चतुर्थीच्या दिवशी प्रार्थना समाज ते ऑपेरा हाऊस असा चांगला कच्चीबाजा असेल त्या विसर्जन मिरवणूकीत बेफान नाचायचा. मग पुन्हा मागे येई आणि प्रार्थना समाजजवळ चांगल्या कच्चीबाजाचा गणपती कोणता हे पाहून त्यात शिरायचा आणि नाचायचा. यात त्याला आनंद मिळायचा. आणि आपल्या या जुन्या गोष्टी सांगताना त्याचा आनंद वाढायचा.
आणि मग एखाद्या फिल्मी पार्टीत सांगायचा, उद्या चांदिवली स्टुडिओत ये. ‘एक फूल चार हाफ’साठी किमी काटकरबरोबर धमाल गाणे करतोय. पण माझ्यासाठी ये. नाही तर, किमी काटकर भेटल्यावर मला विसरशील. किमी काटकरशी तुझी चांगली ओळख आहे याचीही मला कल्पना आहे, लक्ष्या सहज बोलता बोलता हसवायचा. त्याची ही खासियत सेटवरचे वातावरण हलके फुलके ठेवी. विनोदी चित्रपटाच्या ते पत्थ्यावर पडे.
जुहू अंधेरी परिसरात शूटिंग असेल तेव्हा त्याच्या घरुन मांसाहारी जेवणाचा भला मोठा डबा येई आणि सगळे मिळून भरपूर मासे खात. गिरगावात लहानाचा मोठा होताना त्याने हा इतरांनासोबत अनेक गोष्टी शेअर करण्याचा गुण कायमचा अंगिकारला होता आणि मराठीतील सुपर स्टार झाला तरी त्याच्या मूळ स्वभावात बदल झाला नव्हता.
डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘एक होता विदूषक’मधील अभिनेत्रीची भूमिका वर्षा उसगावकर चांगल्या पद्धतीने साकारेल हे लक्ष्यानेच जब्बार पटेल यांना सुचवले. याच चित्रपटाच्या अभिनयासाठी आपल्याला राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्राप्त होईल असा त्याला विश्वास होता. तशी त्याने मेहनत घेतली होती आणि त्या दर्जाचा अभिनय त्याने साकारला होता.
धोबीतलाव येथील रंगभवन येथे या पुरस्कार सोहळ्यात आपलेच नाव जाहीर होईल या विलक्षण आशेने तो होता. त्याला नामांकन प्राप्त झाल्याने तो पुरस्काराच्या अगदी जवळ होता. पण नशीबाने हुलकावणी दिली आणि तो प्रचंड निराश झाल्याचा तेव्हाचा चेहरा आजही आठवतोय….
लक्ष्याच्या काही चित्रपटांचा खास उल्लेख करायलाच हवा. महेश कोठारे दिग्दर्शित धूम धडाका, दे दणादण, धडाकेबाज, थरथराट, जिवलगा, पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित हमाल! दे धमाल, सेम टू सेम, एक फुल चार हाफ, सचिन पिळगावकर दिग्दर्शित अशी ही बनवाबनवी, एकापेक्षा एक, आयत्या घरात घरोबा, सतीश रणदिवे दिग्दर्शित चल रे लक्ष्या मुंबईला, मज्जाच मज्जा, मुंबई ते माॅरीशस, शुभ बोल नाऱ्या, डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘एक होता विदूषक’, अरुण कर्नाटकी दिग्दर्शित ‘डोक्याला ताप नाही, गिरीश घाणेकर दिग्दर्शित प्रेम करुया खुल्लम खुल्ला, रंगत संगत, राजानं वाजवला बाजा, राजा बारगीर दिग्दर्शित गडबड घोटाळा, कमलाकर तोरणे दिग्दर्शित आम्ही दोघं राजा राणी, पीतांबर काळे दिग्दर्शित इरसाल कार्टी, व्ही. के. नाईक दिग्दर्शित गोडी गुलाबी, रमेश साळगावकर दिग्दर्शित मामला पोरीचा, विनय लाड दिग्दर्शित घोळात घोळ, पटली रे पटली, बिपीन वर्टी दिग्दर्शित चंगू मंगू इत्यादी इत्यादी मराठी, तसेच सुरज बडजात्या दिग्दर्शित मैने प्यार किया, हम आपके है कौन, लॉरेन्स डिसोझा दिग्दर्शित साजन इत्यादी अनेक हिंदी चित्रपट. सतत शूटिंग आणि त्यासाठीचे दौरे.
लक्ष्मीकांत बेर्डेच्या निधनानंतर काही मराठी वृत्तपत्रांच्या अग्रलेखाचे शीर्षक होते, एक होता विदूषक…मी त्यालाच जोडून पुढे म्हणेन, तो तर आपला, तुमचा, सर्वांचा!
दिलीप ठाकूर
glam.thakurdilip@gmail.com






