व्यवसायानिमित्त मारवाडी समाज सर्वत्र विखुरला आहे. लहानसहान व्यवसायापासून ते सराफी, कापड, बांधकाम, स्टील अशा उद्योगापर्यंत क्षेत्र विस्तारले आहे. हा समाज कोल्हापूर आणि परिसरात स्थायिक होऊन पाच-सहा पिढ्या झाल्या. येथील संस्कृती अंगीकारली. दिवाळी सणही याला अपवाद नाही. हा सण मारवाडी समाजासाठी आनंदाबरोबरच अध्यात्मिक पर्वाचा दिन मानला जातो. कारण भगवान महावीर स्वामी यांचे निर्वाण दिवाळी दिवशी झाले होते. यामुळे या दिवशी समाजात उपवास करण्याची परंपरा आहे. त्याचबरोबर पाडव्यादिवशी भगवान महावीर स्वामी यांचे प्रथम शिष्य गौतम स्वामी यांना ज्ञानप्राप्ती झाली होती. यामुळे हा दिवसही मारवाडी समाजात तितकाच महत्वाचा मानला जातो. धर्मशास्त्रानुसार दिवाळीत समाजाच्यावतीने दानधर्म करून दुसऱ्यांच्या जीवनात आनंद फुलविण्याचा प्रयत्न करतो. धार्मिक कार्यक्रमाबरोबरच मारवाडी समाज दिवाळीला वर्षभरातील व्यापार व्यवसायाचा वार्षिक लेखाजोखा मांडतो. लक्ष्मीपूजन आणि सरस्वतीपूजन केले जाते.
मारवाडी समाज मूळचा राजस्थानातील. सिरोही, चालोर, थूर, मोहब्बतनगर, पाली अशा विविध भागातून हा समाज महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्थिरावला. कोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूर, पेठवडगाव या शहरासह तालुका पातळीवरील गावे, शहरात मारवाडी समाज विखुरला आहे. या चार शहरात समाजाची लोकसंख्या मोठी आहे. दिवाळीला मारवाडी समाजात मोठी लगबग असते. गृह सजावट, खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी एकच धांदल सुरू असते. दिवाळी फळांचा घमघमाट सर्वत्र जाणवतो. करंजी, रवा-बेसनचे लाडू, चकली, बुंदी, चिवडा या पदार्थांनी सणाची लज्जत वाढते. मोहनथाळ, घेवरा हे खास मारवाडी टच असलेले गोड पदार्थ.
मोहनथाळ हे गुजराती नाव आहे. इतर हिंदी-भाषी प्रदेशात बेसनचक्की किंवा बेसनबर्फी असेही म्हणतात. सामान्यतः बेसन, तूप, मावा/ खवा/ दूध पावडर/ कडेन्स्ड मिल्क/ क्रीम, साखर, वेलची पुड. काजु-चारोळी वापरुन मोहनथाळ करतात.
साहित्य –
अर्धा किलो चणा डाळ, ४०० ग्रॅम साखर, ३०० ग्रॅम मावा, १५० ग्रॅम साजूक तूप, १५ वेलची दाणे, १० काजू, १० बदाम, अर्धा कप दूध, चवीसाठी दूध मसाला (छोटी डबी).
कृती
प्रथम चणा डाळ चक्कीवर दळून आणावी. त्यानंतर परातीमध्ये चणा डाळीचं पीठ घेऊन त्यात अर्धा कप दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. नंतर मिश्रणावर झाकण ठेवून सुमारे एक तास ठेवून द्यावं. एक तासानंतर मिश्रणातील गुठळ्या हाताने व्यवस्थित फोडून घ्या. मग हे मिश्रण चाळणीने चाळून घ्यावं. नंतर गॅसवर पितळेच्या कढईत १०० ग्रॅम साजूक तूप घालून मध्यम आचेवर गरम करावं. तूप गरम झाल्यानंतर त्यात चणा डाळीचं पीठ घालून कालथ्याने व्यवस्थित भाजून घ्यावं. पीठ भाजलं की एका ताटात काढून घ्या. पुन्हा कढईत ५० ग्रॅम साजूक तूप गरम करत ठेवा. त्यात ३०० ग्रॅम मावा, ४०० ग्रॅम साखर, एक चमचा दूध, बारीक केलेली वेलचीपूड घालून, मिश्रणाचा पाक होईपर्यंत कालथ्याच्या सहाय्याने सतत ढवळत राहा. मिश्रणाचा पाक झाल्यानंतर भाजलेलं पीठ पाकात घालून सुमारे १० मिनिटं मध्यम आचेवर एकजीव होईपर्यंत घोटत राहा. १० मिनिटांनी गॅस बंद करा. मग परातीला साजूक तूप लावून घ्या. नंतर कढईतील पिठाचं मिश्रण परातीत ओतून वाटीच्या साहाय्याने व्यवस्थित एकसमान पसरवा. मग त्यावर दूध मसाला, काजू-बदामचे तुकडे पसरवून, वाटीच्या साहाय्याने व्यवस्थित थापून घ्या. हे मिश्रण सुमारे तासभर पंख्याखाली ठेवा. मिश्रण व्यवस्थित घट्ट झाल्यानंतर सुरीच्या साहाय्याने आपल्या आवडीच्या आकाराचे तुकडे पाडून मोहनथाळचा आस्वाद घ्या.
सतीश पाटणकर
sypatankar@gmail.com