भारतीय १९ वर्षाखालील संघ(फोटो-सोशल मीडिया)
Indian Under-19 team breaks 36-year-old record : भारत १९ वर्षांखालील संघ ऑस्ट्रेलियामध्ये धुमाकूळ घालत आहे . भारत १९ वर्षांखालील संघ आणि ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील संघादरम्यान खेळल्या गेलेल्या पहिल्या युवा कसोटी सामन्यात, भारतीय १९ वर्षांखालील संघाने ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि ५८ धावांनी पराभूत करून इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील संघ दुसऱ्या डावात १२७ धावांवर बाद झाला आणि भारतीय संघाचामोठा विजय नोंदवला गेला.
या विजयासह, भारतीय १९ वर्षांखालील संघाने ऑस्ट्रेलियामध्ये एक महत्त्वपूर्ण विक्रम रचला आहे. ऑस्ट्रेलियातील कोणत्याही १९ वर्षांखालील संघाचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. यापूर्वी, हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावे होता. ऑस्ट्रेलियाने १९८९ मध्ये न्यूझीलंडला मोठ्या फरकाने पराभूत केले होते. यासह, भारतीय संघाने ३६ वर्षांचा विक्रम मोडीत काढला आणि एक महत्त्वपूर्ण कामगिरी करून दाखवली आहे.
हेही वाचा : IND vs WI: भारताविरुद्ध जॉन कॅम्पबेलचा मोठा पराक्रम! कसोटी क्रिकेटमध्ये केली ‘ही’ कामगिरी
जगातील सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम देखील भारताच्या नावावर जमा आहे. सप्टेंबर २००६ मध्ये, पियुष चावलाच्या नेतृत्वाखालील भारतीय १९ वर्षांखालील संघाकडून पेशावरमध्ये पाकिस्तानचा एक डाव आणि २४० धावांनी पराभव करण्यात आला होता. त्या भारतीय संघात विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा आणि इशांत शर्मा सारखे खेळाडू होते, ज्यांनी नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचा दिग्गज असा ठसा उमटवला आहे.
सामन्याची कसोटी स्थिती
ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील संघाने पहिल्या युवा कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २४३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात स्टीव्हन होगनने सर्वाधिक ९२ धावा केल्या. जेड हॉलिकने ३८, विल मलाजचुकने २१ आणि अॅलेक्स ली यंगने १८ धावा केल्या. दरम्यान, भारताकडून दीपेश देवेंद्रनने शानदार गोलंदाजी करत ५ विकेट काढल्या. किशन कुमारने तीन, अनमोलजीत सिंग आणि खिलन पटेलने यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
प्रत्युत्तरादाखल, भारतीय १९ वर्षांखालील संघाने पहिल्या डावात ४२८ धावांचा डोंगर उभा करून १८५ धावांची आघाडी मिळवली. भारताकडून वैभव सूर्यवंशीने ११३, वेदांत त्रिवेदी १४०, खिलन पटेल ४९, अभिज्ञान कुंडू २६, राहुल कुमार २३ आणि आयुष म्हात्रे यांनी २१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून हेडन सिलरन आणि विल मलाजचुक यांनी प्रत्येकी ३ आणि आर्यन शर्मा यांनी २ बळी घेतले.
पहिल्या डावात १८५ धावांनी पिछाडीवर असणारा ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या डावात १२७ धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात आर्यन शर्माने सर्वाधिक ४३ धावा केल्या. त्याच्याशिवाय विल मलाजचुकने २२, जेड हॉलिकने १३ आणि हेडन सिलरने १६ धावा जोडल्या. भारताकडून गोलंदाजी करताना दीपेश आणि खिलन पटेल यांनी प्रत्येकी ३, तर किशन कुमार आणि अम्मोलजीत सिंगने २ विकेट्स घेतल्या. भारताने आता दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.