झिम्बाब्वे संघ(फोटो-सोशल मीडिया)
Zimbabwe qualified for the 2026 T20 World Cup : झिम्बाब्वे संघाने मोठी कामगिरी केली आहे. झिम्बाब्वे संघ २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. झिम्बाब्वेने केनियाचा ७ विकेट्सने पराभव करून टी-२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्यात यश मिळवले आहे. झिम्बाब्वेपूर्वी नामिबिया संघाकडून २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्यात यश आले होते.
झिम्बाब्वेच्या पात्रतेसह, एकूण १७ संघांनी विश्वचषक २०२६ साठी पात्रता मिळवली आहे. भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या २०२६ च्या विश्वचषकासाठी फक्त तीन संघ पात्रता मिळवण्यापासून बाकी आहेत. ते आशिया-पूर्व आशिया पॅसिफिक पात्रता फेरीतून पात्र ठरणार आहेत. तीन स्थानांसाठी नऊ संघ स्पर्धा करणार आहेत. ८ ऑक्टोबरपासून ओमानमध्ये आशिया-ईएपी पात्रता स्पर्धा खेळवली जाईल.
आगामी टी२० विश्वचषकात एकूण २० संघ सहभागी होणार आहेत. ज्यात आशिया आणि पूर्व आशिया-पॅसिफिक पात्रता फेरीतून पात्र ठरलेल्या संघांसाठी तीन जागा राखीव असणार आहेत. जपान, कुवेत, मलेशिया, नेपाळ, ओमान, पापुआ न्यू गिनी (पीएनजी), कतार, सामोआ आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) हे टी२० विश्वचषकातील तीन जागांसाठी स्पर्धा करताना दिसणार आहेत.
झिम्बाब्वे अंतिम फेरीत पोहोचल्याने केनियाचे स्वप्न भंग झाले. केनियाविरुद्ध झिम्बाब्वेचा सामना एकतर्फीच झाला. झिम्बाब्वेने फक्त तीन विकेट्स गमावून सामना खिशात घातला. केनियाने आतापर्यंत शानदार कामगिरी केली होती, परंतु उपांत्य फेरीत झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवता न आल्याने टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरण्याच्या शर्यतीतून हा बाहेर पडला आहे.
हेही वाचा : PAK W vs BAN W: अरेरे! महिला विश्वचषकात बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव; ७ विकेट्सने चारली धूळ
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या केनिया संघाने सहा विकेट्स गमावून १२२ धावा उभ्या केल्या. संघाकडून राकेप पटेलने ६५ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या झिम्बाब्वेने १५ षटकांत ३ गडी राखून विजय मिळवला आणि टी२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवली. झिम्बाब्वेकडून ब्रायन बेनेटने २५ चेंडूत ५१ धावा करत २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी झिम्बाब्वेच्या पात्रतेत महत्त्वाची भूमिका बजावली. मुरमानीने देखील ३९ धावा केल्या.
२०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी एकूण १७ संघांनी स्थान मिळवले आहे . यामध्ये भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अमेरिका, कॅनडा, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, नेदरलँड्स, झिम्बाब्वे, नामिबिया आणि इटली या संघाचा समावेश आहे. आणखी तीन संघांचा समावेश अद्याप बाकी आहे.