पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे अत्यंत गरीब कुटुंबात अमितचा जन्म झाला. वडील पूर्णतः दारूच्या आहारी गेले होते. तर आई बोट क्लब रोड येथे एका बंगल्यात मोलमजुरी करून परिवाराचे पोट भरत होती. अमितला दोन बहिणी, एक मोठी आणि दुसरी त्याच्यापाठची. तो लहान असतानाची गोष्ट, मोठ्या बहिणीचं लग्न लागलं. सात फेरे झाले, जेवणावळी उठल्या आणि तिच्या सासरच्यांनी हुंडा मागितला.
दारूच्या आहारी गेलेल्या वडिलांना काहीच सोयरसुतक नव्हतं. तर, मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकणारी ती माय हुंडा कुठून देणार होती? लग्न झालंही आणि सुखी संसाराचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच ते मोडलंही. या घटनेचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला. ती एकलकोंडी झाली. अमित १३/१४ वर्षाचा होता. विरोधी लिंगी आकर्षणाचं ते वय. मात्र, अमितचा कल पुरुषांकडे असायचा. आपल्या शरीरात होणार बदल त्याला जाणवत होता.
अमितची आई त्याच्या शाळेत दररोज मधल्या सुट्टीत बंगल्यातली शिळी पोळी, भाजी घेऊन यायची. त्याला दोन घास भरवून पुढे ती मॅग्नेट मॉलमध्ये एका ऑफिसची साफसफाई करायला जायची. रात्रीच्यावेळी त्या परिवाराला कधी जेवण मिळालं तर मिळायचं. नाही तर फक्त पाण्यावर दिवस काढायचे. अमित दहावीत असताना एकदा आईसोबत मॉलमधल्या ऑफिसमध्ये गेला होता. त्या ऑफिसचे मालक तिथे आले होते. त्याच आईसोबतचं बोलणं ऐकून त्याचा आवाज ऐकून ते म्हणाले, या मुलाचा आवाज चांगला आहे. आमच्याकडे टेली कॉलिंगचा जॉब आहे. करशील का?
अमितनं त्या कामाला तात्काळ होकार दिला. त्याचं वय लहान होतं म्हणून त्यांनी अमितला आउट सोर्समध्ये कामाला ठेवलं आणि पगार दिला महिना ४ हजार रुपये. आता त्याच्या घरच्यांची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत मिटली होती. पण, त्याचवेळी आईचं आजारपण बळावलं. तिनं घरकाम सोडलं. अमित कुटुंबाचा तारणहार झाला. सकाळी शाळा, दुपारी ऑफिस आणि रात्री अभ्यास असा त्याचा दिनक्रम सुरु झाला. दहावी, बारावी, बी एड केलं. त्याला मुंबईत नोकरी चालून आली. पण, त्याचा स्वार्थ सुटेना.
नोकरीपेक्षा त्याने घरच्यांना महत्व दिले. टेली कॉलिंगचे काम करता करता मेहनतीच्या बळावर टीम लीडर आणि पुढे मॅनेजर झाला. त्याच्यामधील स्त्रीत्व काही लोकांना शाप वाटत होता. पण तो शाप त्याच्यासाठी वरदान ठरला. कधी कधी वॉशरूमला जाताना लेडीज टॉयलेटमध्ये जायचे की जेन्टसमध्ये याची मनात घुसमट व्हायची. पण, त्याने त्याची काळजी, चिंता करून सोडून दिलं होतं.
सगळं काही सुखात चालू होतं. पण, एका प्रसंगाने त्याच्यातला आत्मविश्वास डळमळीत झाला.
पॅन इंडियाचा बेस्ट अवॉर्ड त्याला मिळाला. तो घेण्यासाठी दिल्लीला जात असताना त्याचे सहकारी चर्चा करत होते. अमित वॉशरूमला गेला असता ते सहकारी कुजबुजू लागले. हा ना धड पुरुष, ना स्त्री याला अवॉर्ड मिळाला?त्या घटनेमुळे तो डिप्रेशनमध्ये गेला. पंधरा दिवस तो एकटाच होता. अमितची ही व्यथा जाणून त्याच्या एका मित्राने त्याला सिंधुताई सकपाळ यांचे एक पुस्तक वाचायला दिलं. माईंना या समाजाने किती त्रास दिला, किती वेदना दिल्या होत्या. तरीही त्या आपल्या कामाने अनाथांची माय झाल्या होत्या.
मला जगायचंय पण दुर्लक्षित मुलांसाठी, आपलं जीवन समर्पित करायचं ते अनाथ मुलांसाठी, आपल्यासारख्या तृतीयपंथासाठी आयुष्य वेचायचं हे त्याचं ध्येय बनलं. एकदा अमित मॉलमध्ये जात होता. तो रिक्षातून उतरला तेव्हा काही मुलं त्याच्यासमोर हात पसरून उभी राहिली. एका मुलाला त्याने पैसे दिले. तो मुलगा पुढे निघून गेला. दुसऱ्याकडे भीक मागू लागला. त्या व्यक्तीने त्याला झिडकारलं.
ही लहान मुलं उद्याच्या भारताचं भविष्य. पण, रस्त्यावर भीक मागताहेत. असे किती दिवस काढणार ते? त्यांचे आयुष्य बदलायचं असेल तर त्यांना शिक्षण द्यायला हवं. भिक्षेकरी मुलांच्या पालकांना तो भेटला. तुम्हाला स्वकष्टाची भाकरी खायची असेल तर मुलांना शिकवा. मुले शिकली तर पुढे काही तरी बनतील, तुमची परिस्थिती बदलेल, असमजावून सांगू लागला. काही पालकांना ते पटलं. पण, अडचण अशी की त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नव्हती. मग प्रश्न आला मुलांच्या शाळा प्रवेशाचा.
काही म्हणाले, आमच्या मुलांमुळे आमची पोट भरत आहे. त्यांना शिकायला पाठवलं तर आम्हाला जेवण कुठून मिळणार? अमितने खूप विचार केला. सतत सहा-सात महिने पालकांची भेट घेत होता. शाळेत प्रवेश मिळत नाही? ठीक, मीच रस्त्यावर शाळा सुरु करतो म्हणाला, अखेर हो, नाही करता करता काही पालक तयार झाले आणि सुरु झाली रस्त्यावरची शाळा. मात्र, त्याच्या या प्रयत्नांना कोलदांडा बसला तो कोरोनामुळे.
अमित त्यावेळी स्टर्ली हॉलिडेजमध्ये काम करता होता. जवळपास ९० हजाराची पीएफ जमा झाली होती. त्यातील ७५ हजार रुपये काढून त्याने मदतकार्य सुरु केलं. जे गरजू, भुकेले होते त्यांचा शोध घेऊन त्यांना अन्नदान केलं. काहींना रेशन किट देऊन त्यांच्या महिन्याभराचा किराणा खर्च उचलला.
कोरोना काळात त्याने भूकमुक्त अभियान राबवलं. आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत ६३ कुटुंबाना व्यवसायासाठी भांडवल आणि हातगाडी मिळवून दिली. बांधकाम कामगारांना अन्नदान केलं, तृतीयपंथी आणि सेक्सवर्कर महिलांसाठी फॅशन शो आयोजित करून त्या मार्फत त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला.कोरोनाची दोन वर्ष संपल्यानंतर अमितने पुन्हा त्या रस्त्यावरील भिक्षेकरी मुलांसाठी शाळा सुरु करायचं ठरवलं आणि सुरु झाली रस्त्यावरची अर्थात फुटपाथ शाळा.
ती मुले शाळेत जाऊ शकत नव्हती. पण आता शाळाच त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. बघता बघता पुणे शहरात स्वारगेट, मालधक्का चौक, वाघोली, ताडीवाला रोड, येरवडा अशा पाच ठिकाणी अमितनं फुटपाथ शाळा सुरु केल्या. पुढे १८ मुलांना सरकारी शाळेत अॅडमिशन मिळवून दिलं. तर, शनिवार, रविवार या दोन दिवशी ससून हॉस्पिटलमध्ये गरजूंना जेवण वाटप सुरु केलं. २५ मुलांचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारलं. ५४ मुलांच्या शाळेची फी भरून त्या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं.
बेघर असणाऱ्या व्यक्ती, अनाथ मुले यांच्यासाठी अमितला स्वतःचा आश्रम उभा करायचा आहे. वृद्ध तृतीयपंथीयांना हक्काचा निवारा दयायचा आहे. तृतीयपंथी म्हणून जगणं अतिशय कठीण आहे. आमच्या शब्दात ताकद असती तर आमचे सगळे चांगले झाले असते. आम्हीच आम्हाला तथास्तु म्हटले असते. पण, तसे काही नसते. समाजाला प्रबोधनाची गरज आहे. या मुलांना मी तेच शिकवतो. मला माझी टाळी त्या गरजूंसाठी वाजवायची आहे असे अमित सांगतो.
विद्या पवार
vidyampawar@gmail.com






