वारी हा वारकऱ्यांचा स्वधर्म आहे. कर्म आहे. खांद्यावर विठ्ठलनामाची पताका मिरवित वारकऱ्यांची पावले पंढरीच्या वाटेवर पडू लागतात. वारीचे व्रत घेतलेल्या पांडुरंगभक्तांची भावस्थिती ‘वारी न चुको’ अशीच असते. भौतिकातला संसार मागे टाकून चंद्रभागेत मुक्तीचे स्नान करण्याची आस लागलेल्या भक्तांना वारीने मनातला संसारही सोडून देण्याचे तत्त्व शिकवले आहे. त्या आषाढी वारीविषयी… टाळ- मृदंगांचा अखंड नाद, मुखी नामाचा गजर हे वारीचे दृश रूप. वारी हे कर्म आहे. उपासना आहे. वारी हीच पूजा, असे मानून संतांनी ईश्वरशरणता जनमानसांत पेरली.
चला पंढरीसी जाऊ। रखमादेवीवरा पाहू। डोळे निवतील कान मना तेथें समाधान। संता महंता होतील भेटी। आनंदे नाचों वाळवंटी।।
भक्तीचा महिमा संतांच्या तोंडून कानी घ्यावा. त्यांच्या पायी लागावं. देहाने संसार सुरूच राहतो. पण तोच देह जेव्हा या वारीत सामावतो तेव्हा त्याची संसारफळाची वृत्तीच नाश पावते. परमेश्वर-दर्शनाचे फळ तो मागत असतो. विठ्ठलभेटीसाठीच मग त्याचा संसार सुरू राहतो.
अवघाचि संसार सुखाचा करीन। आनंदे भरीन तिन्ही लोकां। जाईन गे माये तया पंढरपुरा। भेटेन माहेरा आपुलिया।।
जड, भौतिक संसाराची दृष्टी स्थूल आहे. जसं शेतकऱ्याला निव्वळ खोल नांगरट करून चालत नाही. त्या खोलीत ओलही असावी लागते. देहाने श्रमणाऱ्या वारकऱ्याच्या कर्माचेही तसेच आहे. शेतात पेरलेलं फळ रूपाने पुन्हा शेतकऱ्याला मिळतेच. पण संसाररूपी वारीतील हे फळ मर्यादित आहे. ईश्वरभक्तीची, ईश्वरार्पणतेची ओली पंढरीच्या वारीत असते. सर्व कर्मच पांडुरंगाला अर्पण करण्यासाठी तिचा आरंभ होतो.
सर्व सुकृतांचे फळ लाहीन। क्षेम मी देईन पांडुरंगी। बापरखमादेवीवरू विठ्ठलेचि भेटी। आपले संवसाटी करूनि राहे।।
दैवास्तव संसार आहे. तो करताना मुलंबाळं आहेत. बायको आहे. त्यांचा सांभाळ ठरलेला. पण, हे सारं सोडून परमार्थ साधण्याची चूक संतांच्या सांगण्यात नाही. तो विटेवर कटी हात ठेवून उभा असलेला आमचा बाप तुला पाहायचा असेल. त्याच्या चरणाला मिठी घालायची असेल तर देह कष्टत कष्टत त्याच्याकडे यावे लागेल, ही संतांची विनवणी आहे.
वारीत सर्वांतर्मायी विनटलेल्या विठोबाला संतांनी जनांत पाहिलेले आहे. माझी म्हणून काही दृष्टी राहिलेली नाही. मी पाहत असलेला जनच जनार्दन आहे. विठ्ठल आहे.
भानुदास म्हणे मज पंढरीसी न्या रे। सुखे मिरवा रे। विठोबासी।।
वारी म्हणजे मेळा. येकायेक भेटणारे वैष्णव. एकत्व जाणणारे वैष्णव. इथे भेद नाही. दुजे काही नाही. तरीही संसारसागरात तारू लोटताना वारीचा विसर पडू न देण्यासाठी संतसज्जन नेहमी जागरूक असतात. ते विठ्ठलदासांनाकडे विनवणी करून स्वत:ला पंढरीला नेण्याचा हट्टच धरतात. वारीतून विठ्ठलास भेटण्यासारखे दुसरे सुख या जगात नाही, अशी त्यांच्या मनाची ठाम धारणा आहे. पंढरीत गेलो आणि देव भेटला. विठ्ठलचरणी मिठी घातली आणि साध्य प्राप्त झाले, त्याचा अभिमान प्राप्त होऊ नये यासाठी पुन्हा वारीची आठवण करून दे अशी विनवणी जनी जनार्दनाला करतात.
जरी म्हणसी देव देखिला। तरी हा बोल भला नव्हे नाम्या। जोंवरी मी माझे न तुटे। तंव आत्माराम कैसेनि भेटे।। अशी खूण विसोबा खेचर यांनी संत नामदेवांना करून दिली आहे. वारी हे साधन आहे. ते सोडून साध्यालाच धरून राहण्याची संतांची तयारी नसते. साध्य मिळाले तर चित्ताला पुन्हा अहंकार चिटकून बसेल. अंगी ताठा येईल. तोच साऱ्याचा घात करेल, हे वर्म संतांनी सांगून ठेवले आहे. म्हणून मग संत नामदेवांनी पंढरीनिवासाच्या चरणीच आश्रय घेतला.
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान।
आणिक दर्शन विठोबाचें। हेचि मज घडो जन्मजन्मांतरी।
मागणे श्रीहरी नाही दुजें।
नामा म्हणे तुझें नित्य महाद्वरी।
कीर्तन गजरी सप्रेमाचें।।
इतकी महान मागणी संतांनी विठोबाकडे मागितली आणि विठोबाने ती पुरवलीही.
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा।
आनंदे केशवा भेटताचि।
ऐसा नामघोष एसे पताकांचे भार।
ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठे।
ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलिक।
ऐसा वेणुनादी काना दावा। सेना म्हणे खूण सांगितली संती।
या परती विश्रांती न मिळे जीवा।।
असे सुख लाभलेल्या प्रेमकल्लोळ पंढरीशिवाय अन्य दुसरे काही नकोच. आणि असे सुख अन्य कुठे मिळणारच नाही, असा संतांना विश्वास आहे.
गात गा गा गात गा गा। प्रेम मागा विठ्ठला।।
सुख म्हणजे भोग. आणि भोगाची निष्पत्ती दु:खात आहे. जगात अनंत दु:खे आहेत. पंढरीत पाऊल टाकल्या टाकल्या दु:ख, चिंतांचा नायनाट होईल, अशी हमी संत विठोबाची आण वाहून भक्तांना देतात. प्रेम आणखी कुणाकडे नाहीतर विठ्ठलाकडे मागा. तो प्रेमभावाचा रत्नाकर आहे. त्याच्यात विलीन व्हा, हा संतांचा सल्ला आहे.
सांडुनि मीठपणाचा लोभु।
मिठें सिंधुत्वाचा घेतला लाभु।
तेविं अहं देऊनि शंभू। शांभवी झालो।।
ज्ञानेश्वरांनी अमृतानुभवात एकत्वाचे वर्णन करताना भक्ताच्या अस्तित्वाला मीठाची उपमा दिली आहे. मिठाने जर अहं सोडला. तर तो कसला मीठ राहतोय. तो सिंधुच होऊन राहतो. कणा एवढे मीठ अथांग सागराएवढे होऊन जाते. तसे ज्ञानदेव शंकराला स्वत:चे अस्तित्व अर्पण करून शंकर, शिवच झाल्याचे म्हणतात. तसेच पंढरीचे आणि पंढरीच्या वारीचे आहे. वैष्णव मेळ्यात सामावणाऱ्या प्रत्येकाची भावस्थिती वारीच झालेली असते.
खेळ मांडियेला वाळवंटी घाई।
नाचती वैष्णव भाई रे।
क्रोध अभिमान गेला पावटणी।
एक एका लागतील पायीं रे।
तुका म्हणे केली सोपी पायवाट। उतरावया भवसागर रे।।
इथे पंढरीच्या वाळवंटी खेळ मांडा. म्हणजे वाळवंटी पेरा. वाळवंटी उगवा. आता वाळवंटी पेरलेलं उगवेल कसं? उगवणार नाहीच. म्हणूनच पेरा. पेरलेलं उगवेल की नाही, याची चिंता सोडा. पुढे तो कटेवरी कर ठेवून उभा असलेला पाहून घेईल. तुकाराम महाराज म्हणतात हा भवसागर उतरण्यास खूप दुस्तर आहे. म्हणूनच पंढरीत आल्यानेच तुमच्या जीवनाची सोपी पायवाट होईल.
गोविंद डेगवेकर
govind.de@gmail.com