आळंदीत कितीतरी आधुनिक मुक्ताई भेटतात. पुरुषी वर्चस्वाच्या विरोधात बंड करण्याची प्रेरणा त्यांना आजही मुक्ताई देतेय. त्यांची ही कथा…
नाव मुक्ताई खेडकर. वय वर्षे १९. भगवानगडाचा पायथा हे माझं गाव. गेली तीन वर्षे आळंदीत राहते.’ सिद्धबेटात अजानवृक्षाखाली ज्ञानेश्वरीची कवाड उघडून बसलेली मुक्ताई माझ्याशी बोलत होती. ‘या सिद्धबेटाची माहिती मला देशील का?’, असं विचारल्यावर ती प्रचंड आनंदून गेली. ज्ञानेश्वरी बाजूला ठेवली. सुरू असलेल्या पानात मोरपीस ठेवलं. डोळ्यांचा चष्मा बाजूला करतच ती जागेवरून उठली.
शेजारीच मंदिर होतं. आम्ही चालत निघालो. ती बोलू लागली, ‘सुरवातीला इथं फक्त जंगल होतं. इंद्रायणी माता इथून दूथडी भरून वाहत असायची. दादा, इथं सगळीकडे पक्ष्यांचा किलबिलाट होता.’ ती मधेच थांबली. मला म्हणाली, तुम्हाला, दादा म्हटलं तर चालेल ना? तिच्या निरागस प्रश्नाला मी होकारार्थी मान हलवली. ती पुढे सांगू लागली, ‘हे छोट मंदीर म्हणजे निवृ्त्तीदादा, माऊली, सोपानकाका, मुक्ताबाई आणि त्यांच्या आईवडलांचे राहण्याचं ठिकाण. पूर्वी इथं झोपडी होती.
गावातल्या लोकांनी या भावंडांवर बहिष्कार टाकला. म्हणून ते गावकुसाबाहेर या जंगलात राहू लागले. त्यांच्या आई वडिलांनी देहान्त प्रायश्चित ही शिक्षा स्वीकारल्यानंतर याच इंद्रायणी नदीत त्यांनी आत्महत्या केली. इथेच इंद्रायणी काठावर त्यांचं समाधी मंदिरसुद्धा आहे.’
असं म्हणत ती मला सिद्धबेटातल्या मंदिरात घेऊन आली. तिच्या मते इथल्याच झोपडीत माऊलींनी स्वतःला कोंडून घेतलं होतं. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. मुक्ताई दार ठोठावतेय आणि ज्ञानदेव रागावून आत बसलेत, हे चित्र समोर आलं. आणि त्यापाठोपाठ आठवलं मुक्ताईने सांगितलेलं आजही प्रेरणादायी असलेलं तत्त्वज्ञान, ताटीचे अभंग. मुक्ताई म्हणते, अरे दादा, ज्याला संत व्हायचं आहे, त्याने जगाची निंदा सहन केली पाहिजे. त्याने सर्व अपराध पोटात घालायला हवेत. जग आग म्हणून कोसळणार असेल, तर आपण पाणी व्हायला हवं.
या मंदिराच्या अवतीभवती अजान वृक्ष आहेत. बरोबर पाठीमागे बरंच जुनं पिंपळाचं झाड आहे. समोर एक तुळस आहे. मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, उजव्या बाजूला छोटीशी महादेवाची पिंड आणि समोर नंदी आहे. भिंतींवर स्कंदपुराणातले आणि संतसाहित्यातले सिद्धबेटाचं वर्णन करणारे फ्लेक्स टांगले आहेत. मंदिरातील एक एक चित्र दाखवत ही आधुनिक मुक्ताई मला त्या काळातल्या मुक्ताईशी स्वतःशी असलेलं नातं सांगत होती.
सिद्धबेटाचा हा परिसर जवळपास सहा एकराचा आहे. आळंदीतील जयराम बाबा यांनी सिद्धबेटात पहिल्यांदा झोपडी बांधली होती. या झोपडीत त्यावेळी काही विद्यार्थी राहत असायचे. पखवाज वादन आणि गायन त्याचबरोबर अभंग पाठांतर करायचे. सरकारने काही वर्षांपूर्वी सिद्धबेटाचा विकास केला. मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण सुरू आहे.
भाविकांना सिद्धबेट परिक्रमा करता यावी याकरिता रस्ते बांधलेत. मात्र दुथडी भरून वाहणारी इंद्रायणी नदी अंगावर जलपर्णी घेऊन निपचित पडली आहे. पवित्र नदी आज गटार झाली आहे. काही भाविक मंडळी त्यातच स्नान करत होती. तिथेच जवळ विठ्ठलपंत आणि रुक्मिणीमाता यांचं समाधी मंदिर दिसलं. मी त्यांना नमस्कार केला.
या मुक्ताईचा निरोप घेऊन मी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराकडे निघालो. आळंदीच्या वाटेवरून चालणं, तिथला ज्ञानोबा-तुकोबा गजर अनुभवणं आणि समतेच तत्वज्ञान समजून घेणं, गरजेचं होतं. आषाढीसाठीचं प्रयाण दहा दिवसांवर आलं होतं. दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा पालखी सोहळा निघणार होता.
रस्त्याच्या दुतर्फा वारकऱ्यांची गर्दी होती. खास करून वाद्यांची दुकानं भरून गेली होती. कोणी पखवाजाला शाई भरत होतं. वाजवून टाळ काश्याचा आहे, याची खात्री करून घेत होतं. आळंदीत वारकरी शिक्षण घ्यायला आलेल्या मुलीही मधेच दिसल्या.
हे सारं पाहत मी मंदिरात पोचलो. सर्वात आधी मुक्ताई आणि भावंडांना आधार देणाऱ्या भोजलिंग काकांच्या समाधीला जाऊन नमस्कार केला.
तिथे आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर भेटले. त्यांनी माऊलींच्या समाधी गाभाऱ्याच्या पाठीमागे असणारं संत मुक्ताई मंदिर दाखवलं. संदर्भ सांगतात, या मंदिराला पूर्वी इंद्रायणी मातेचं मंदिरसुद्धा म्हणत. मात्र अलिकडच्या ५०-६० वर्षांपासून हे मुक्ताई मंदिर म्हणूनच ओळखलं जातं.
७२५ वर्षांनंतरसुद्धा मुक्ताई आपल्या ज्ञानादादाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. कदाचित आजही एखादा ताटीचा अभंग आपल्या नकळत ती दादाला सांगत असेल. मुक्ताईचं हे मंदिर नेमके कोणी बांधले, याविषयी माहिती उपलब्ध नाही. १८८१ मध्ये आळंदीतले एक सत्पुरुष नरसिंह सरस्वती यांनी या मंदिरासाठी लाकडी मंडप बांधला होता. त्यामुळे मंदिरावर त्यांचा फोटो लावलाय.
२००० मध्ये त्याच लाकडी मंडपाच्या ठिकाणी आरसीसी मंडप उभा केला. सन २०२०मधे तेथे स्टोन क्लायडिग केलं.
१९६६ मधे संत मुक्ताबाई यांच्या पुण्यस्मरणानिमित्त माऊली संस्थान आणि आळंदी ग्रामस्थांच्या सहकार्याने केशव महाराज कबीर यांनी पारायण सोहळा सुरू केला. तो आजही सुरू आहे. सुरुवातीच्या काळात फक्त ज्ञानेश्वरी पारायण होत असे. गेल्या ४ वर्षांपासून नव्या पिढीने प्रवचन आणि कीर्तनदेखील सुरू केलं आहे.
केशवबुवांनी १९९५ मध्ये ज्ञानदेवांच्या ७००व्या जन्मवर्षानिमित्त मेहूणमधून आळंदीला एक ज्योत पायी यात्रा करून आणली होती. ही ज्योत आळंदीत अजानवृक्षाखाली पूर्ण वर्षभर होती. ही ज्योत रात्रदिवस काय पेटत ठेवण्याचं काम ज्ञाननाथजी रानडे आणि त्यांच्या शिष्यांनी केलं. या वर्षभरात २४ तास पारायण सोहळा सुरू होता.
१ महिला आणि १ पुरुष दर तीन तासाला पारायण करत होता. अशी ज्ञानेश्वरीची एकूण ७०० पारायणं वर्षभरात पूर्ण झाली. त्यानंतर ही ज्योत तापी नदीमध्ये विसर्जित करण्यात आली. पुढे या सोहळ्याची आठवण म्हणून कबीरबुवांनी नवरात्रीत संत मुक्ताबाईंच्या मंदिरात फक्त महिलांचा सप्ताह सुरू केला.
आज माऊलींच्या मंदिरातील वीणा मंडपात महिलांना कीर्तनाची परवानगी नसली तरी गाभाऱ्याच्या जवळ असणाऱ्या कारंजा मंडपात महिलांची कीर्तनं होतात. अजान वृक्षाखाली वरच्या बाजूला जागा कमी असल्याने महिलांना पारायण करता येत नाही. त्यामुळे महिला खाली बसून पारायण करतात. निदान माऊलीच्या मंदिरात तरी महिला-पुरुष अशी समतेच्या दिशेने जाणारी व्यवस्था आहे. त्यात चूक झाली, तर मुक्ताई उभी आहेच.
दरवर्षी आळंदीतून मुक्ताईंचे दोन पालखी सोहळे पंढरपूरला जातात. बीड जिल्हा पाटोदा तालुक्यातील घाटनांदूर येथील सोपानकाका वाल्हेकर यांनी २०१५मध्ये मुक्ताईंचा पालखी सोहळा सुरू केला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पुढे २ किमी पुढे हा पालखी सोहळा चालतो.
सुरूवातीच्या काळात वाल्हेकरांनी ३१ मुक्ताईंच्या पादुका डोक्यावर घेऊन दिंडी चालवली. मात्र, नंतरच्या काळात त्यांनी मुक्ताईंचा स्वतंत्र पालखी सोहळाच सुरू केला. त्याला अनेकांनी विरोध केला. पण तो थांबलेला नाही. मुक्ताईंची दुसरी पालखी कृष्णा महाराज पारेकरांची. ते मूळ भुसावळ- जामनेर रस्त्यावरच्या कुरपानाजी गावचे. २०१९ला त्यांनी मुक्ताईंचा पालखी सोहळा सुरू केला. ही पालखी ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या २ किमी मागे चालते. म्हणजेच ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या वाटेवर पुढे आणि मागे मुक्ताईच असतात.
मुक्ताईंच्या चरित्रातली आणखी एक महत्वाची घटना म्हणजे ज्ञानोबांच्या पाठीवर मांडे भाजल्याचा प्रसंग. खरं तर हा प्रसंग सिद्धबेटातच घडला. मांडे भाजायला कुंभाराने मडकं दिलं नाही. म्हणून ज्ञानदेवांनी योगसामर्थ्याने आपली पाठ गरम केली. मुक्ताईने त्यावर मांडे भाजले. याची प्रतिकृती वडगाव चौकातल्या अखिल मंडई मंडळ धर्मशाळेत आपल्या पहायला मिळते.
ही प्रतिकृती शारदाबाई इचे यांच्या स्मरणार्थ ५ मे १९४४ मधे निर्माण केलेली आहे. आज ही धर्मशाळा माऊलीच्या पाठीवर मांडे भाजल्याचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. कोरोनाच्या आधी महिन्याची कीर्तनं इथे होत होती, पण कोरोनानंतर या धर्मशाळेची अवस्था वाईट झाली आहे. साधारण २०० वर्षांपूर्वी लाकडी बांधकामात उभ्या असलेल्या इमारतीची आज बरीच पडझड झाली आहे. आज मुक्ताईनगर येथील दोन वृद्ध वारकरी त्या मठाची सेवा करत आहेत.
याच धर्मशाळेकडे पाठ करुन उभं राहिलं की उजव्या हाताला ज्ञानदेवादि चार भावंडं ज्या भिंत चालवत योगी चांगदेवांना भेटायला गेली ती भिंत आहे. ही भिंती मातीची आहे. पण लोक ती माती काढून घेऊ लागले. म्हणून त्याच्या चारही बाजूंना दगडी बांधकाम केलं आहे. त्यावर चारही भावंडांची प्रतिकृती आहे. ही भिंत खरच चालवली होती का? यावर मात्र वारकऱ्यांचा पूर्ण विश्वास आहे. पण दगडी बांधकामाच्या आत मूळ मातीची भिंत अजून शाबूत आहे का, हे मात्र कुणाला माहीत नाही.
आता मुक्ताई शोधायच्या तर वारकरी कीर्तनकारांना भेटावंच लागतंय. ज्येष्ठ महिला कीर्तनकार मुक्ताबाई महाराज बेलगावकर यांना भेटायला ४ नंबर शाळेच्या मागे मठात पोचलो. मी चौकशी केली. तर उत्तर आलं, आत्ताच त्यांना दवाखान्यातुन आणलंय. थोड्याच वेळात ९२ वर्षांच्या मुक्ताबाई महाराज वॅाकर टेकवत आल्या.
पांढरंशुभ्र लुगडं, डोक्यावर पदर आणि चेहऱ्यावर झळकणारी सात्विकता. वॅाकर पुढे टेकवत त्या पलंगावर येऊन बसल्या. वय ९२ असलं तरी आवाजातील जरब कायम होती. मुक्ताबाई महाराज या गयाबाई मनमाडकरांच्या शिष्या. ६ वर्षांच्या असताना त्यांनी पहिल्यांदा संत गाडगेबाबांचे कीर्तन ऐकलं. त्याचवेळी त्यांनी कीर्तनकार व्हायचं पक्कं केलं. पुढच्याच वर्षी त्यांनी गावात गयाबाई मनमाडकरांचं कीर्तन ऐकलं. त्याचवेळी गयाबाई मनमाडकरांचा हात पकडला आणि त्या पंढरपूरला आल्या. मनमाडकरांनी स्थापन केलेल्या मठात राहू लागल्या.
सुरवातीला त्या गाडगेबाबा पद्धतीनुसार कीर्तन करत. मात्र नंतर त्यांनी वारकरी सांप्रदयातील आत्ताच्या पद्धतीनुसार कीर्तन करायला सुरूवात केली. गयाबाईंबरोबर त्यांनी पायी चारधाम यात्रा केली. तुम्हाला कीर्तन करताना विरोध झाला नाही का? मी त्यांना मधेच विचारलं. खमकं उत्तर आलं, ‘सुरवातीच्या काळात अनेक पुरुषांनी विरोध केला. पण याचसाठी आईबापाचा हात सोडून आले होते. मी डगमगनारी नव्हते. थांबलेच नाही. विरोध झाला. पण जिद्दीनं तोंड दिले.
विरोधाला उत्तर कीर्तनातूनच दिलं. सुरूवातीच्या काळात विरोध करणारी माणसंच पुढे पाया पडू लागली. मी सगळ्यांनाच सामावून घेतलं.’ त्यांचा सांप्रदयातला अनुभव आत्ताच्या सर्वच पुरुष आणि महिला कीर्तनकारांपेक्षा अधिक आहे. त्यांच्या पायावर डोकं ठेवत नम्रपणाने निरोप घेतला. पुरुषी मानसिकतेविरोधात बंड करणारी या आधुनिक मुक्ताबाईमधे मला संत मुक्ताई दिसत होत्या.
आज आळंदीत महिलांना वारकरी शिक्षण देणाऱ्या बऱ्याच शिक्षण संस्था असलेल्या धर्मशाळा आहेत. यातली पहिली धर्मशाळा ही संत मुक्ताबाई महिला वारकरी शिक्षण संस्था. २००० साली गयाबाई यादव यांनी ही धर्मशाळा सुरू केली. त्या मुळच्या बीड जिल्ह्यातील. वयाच्या १४ व्या वर्षापासून त्यांनी कीर्तनाला सुरूवात केली. पंढरपुरात चातुर्मास केले. पुरुषांनी घेतलेल्या पाठाला त्यांना बसू दिलं जात नव्हतं. म्हणून त्यांनी स्वतःच वाचन केलं. त्या म्हणाल्या, ‘माझ्या कीर्तनाला पुरुष मंडळी टाळ खाली ठेवायचे. कीर्तनाला विरोध करायचे, पण मी थांबली नाही. मी खंबीरपणे उभी राहिली.
आळंदीत मुलींना वारकरी शिक्षण घेता यावं, यासाठी मी ही संस्था सुरू केली. ही संस्था सुरू करताना सुद्धा असले उद्योग करू नकोस म्हणून पुन्हा विरोध झाला. पण या विरोधाला न जुमानता पोरींना शिकवलं. आज सगळ्या महाराष्ट्रात माझ्या पोरी कीर्तन करत आहेत. त्यांच्या पाठीशी संत मुक्ताबाईंचा आशीर्वाद असावा म्हणूनच या संस्थेला मुक्ताईंच नाव दिलंय.’ गयाबाईंना भेटून आनंद वाटला. विरोधाला न जुमानता परिवर्तनाची ताकद त्यांना मुक्ताई देत होत्या.
ज्येष्ठ कीर्तनकार रामराव महाराज ढोक यांच्या घरी भेटायला गेलो. त्यांनी माझं हसतमुखाने स्वागत केलं. मी परवा तुमच्या कीर्तनाला दोन मुली टाळ घेऊन उभ्या पाहिल्या? बाकी ज्येष्ठ कीर्तनकार त्यांच्या कीर्तनात महिलांना कीर्तनाला टाळ घेऊच देत नाहीत. मग तुम्ही कसं काय..? थेट मुद्द्यालाच हात घातला. महाराज नकळत हसले म्हणाले, ‘आपणच म्हणायचं ‘यारे यारे लहान थोर । याती भलती नारी नर ॥’ आणि आपणच विरोध करायचा, हे म्हणजे संतांच्याच विचारांच्या विरोधात जाण्यासारखं आहे. संत मुक्ताबाई लहान असल्या तरी जगाला ज्ञान सांगणाऱ्या ज्ञानेश्वरांना त्या उपदेश करतात.
भारतीय संस्कृतीत महिलांचं स्थान उच्च कोटीचे आहे. राजा जनकाच्या दरबारात गार्गी या परीक्षक होत्या. हे अगदी आपल्याला त्रैतायुगापासुन पहायला मिळते. वारकरी परंपरेत संत मुक्ताबाईंपासून, संत जनाबाई ते अगदी संत बहिणाबाईंपर्यंत ही खूप मोठी परंपरा आहे. आज आपल्या कीर्तनात महिला टाळ घेऊन उभारली तर ती आपली बहीण, मुलगी अथवा आई समजावी.
आपण आपल्या परंपरेकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. आपलं अंगण आपणच स्वच्छ करावं. मग जगाला उपदेश करावा. फक्त कीर्तन मर्यादेचं पावित्र्य स्त्री आणि पुरुष अशा दोघांनी पाळलं पाहिजे.’ आम्ही बरंच बोललो. पण महत्त्वाचं ते पहिल्याच उत्तरात मिळालं होतं. मी महाराजांचे मनापासून आभार मानले.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी थेट आळंदीतल्या मुक्ताबाई मठात पोहचलो. आळंदीत संत मुक्ताबाईंच्या नावाने हा एकमेव मठ. हा मठ पूर्वी वराडकर धर्मशाळा या नावाने प्रसिद्ध होता. ही धर्मशाळा १९६९ मध्ये बांधली. विश्वस्त नामदेवराव पाटील यांनी ही धर्मशाळा १९९२ला संत मुक्ताबाई संस्थानला दान केली. कार्तिकी वारीला संत मुक्ताबाईंच्या पादुका मुक्ताईनगरवरून आळंदीला येतात.
कीर्तन महोत्सव होतो. काला होतो. पण कीर्तनं फक्त पुरुषांची होतात. संपुर्ण आळंदीत संत मुक्ताबाईंच्या उपदेशाचा सकारात्मक परिणाम झाला असला, तरी संत मुक्ताबाईंच्या मठात अजून प्रकाश पोचायचा आहे. कोथळी मुक्ताईनगरच्या देवळात महिलांची कीर्तनं होतात. पण इथे नाहीत.
अंध परंपरेचा डांगोरा पिटणाऱ्या या माणसांची अंधाराची ताटी उघडण्यासाठी मुक्ताईचा वैचारिक वारसा सांगणाऱ्या महिलांनी पुढं यायला हवं. विचारचक्र सुरू झालं, म्हणून पुन्हा सिद्धबेटावर जायचं ठरवलं. मुक्ताई आजही अजानवृक्षाखाली ज्ञानेश्वरी वाचतच होती. तिच्या पायावर डोक ठेवलं. एकदा इंद्रायणीकडे पाहिलं. वारी जवळ आल्यानं इंद्रायणीतली जलपर्णी जेसीबीने बाहेर काढली जात होती. परंपरांवर पसरलेली जलपर्णीही अशीच दूर करावी लागणार आहे. त्यासाठी मुक्ताईला शुभेच्छा देतच मी सिद्धबेटाचा निरोप घेतला.
स्वामीराज भिसे
(लेखक तरुण कीर्तनकार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सांस्कृतिक समन्वयक आहेत.)