1 crore government employees will have a sweet Diwali Possibility of 3 percent increase in Dearness Allowance
देशातील सुमारे १ कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळीपूर्वी या सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) ३ टक्क्यांनी वाढ केली जाण्याची शक्यता आहे. उपलब्ध माहितीनुसार, २५ ऑक्टोबरपर्यंत केंद्र सरकार महागाई भत्त्याच्या वाढीची घोषणा करू शकते. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यासाठी प्लान तयार केला आहे. केंद्रीय कर्मचारी दीर्घकाळापासून मगागाई भत्त्यात वाढ व्हावी, याची वाट पाहत आहेत.
महागाई भत्त्यात ३ टक्के वाढीची शक्यता
सरकारमधील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या कर्मचाऱ्यांना डीए ५० टक्के महागाई भत्ता दिला जात आहे. पण त्यात आणखी ३ टक्के वाढ झाल्यास १ जुलै २०२४ पासून नवीन दर ५३ टक्क्यांवर पोहोचेल. कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल. दरम्यान, कर्मचाऱ्यांना येत्या काही महिन्यांत केवळ वाढीव पगार मिळणार नाही तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांची थकबाकीही मिळण्याची शक्यता आहे. मात्र, याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
ऑल इंडिया कंज्युमर प्राइस इंडेक्सवर आधारित महागाई भत्ता असतो. जर महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ झाली तर ज्यांची बेसिक सॅलरी १८,००० रुपये आहे. त्यांनी महागाई भत्ता ९००० रुपयांत वाढ करुन ९,५४० रुपये मिळणार आहे. जर महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ झाली तर ९,७२० रुपये मिळू शकतात. त्यामुळे आता दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही खुप महत्त्वाची बातमी मानली जात आहे.
राज्यातील कर्मचाऱ्यांना मिळाली खूशखबर
विधानसभा निवडणुकांच्या आधी राज्य सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४६ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ जानेवारी २०२४ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे. राज्य सरकारने नुकतेच ऊर्जा विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या भत्त्यात वाढ केली होती. त्यानंतर शासनातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ जुलै महिन्यात घेतली आहे.