राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हजार रुपये अनुदान जमा; सोयाबीन, कापूस उत्पादकांना दिलासा!
राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मागील वर्षी अपेक्षित उत्पन्न मिळाले नव्हते. विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांना खर्चाची रक्कम देखील मिळाली नव्हती. हीच बाब लक्षात घेऊन राज्यातील शिंदे सरकारने राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज जास्तीत जास्त 10 हजार रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण प्रणालीची कळ दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातील सोयाबीन आणि कापुस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
49 लाख 50 हजार शेतकऱ्यांना लाभ
एका क्लिकवर सुमारे 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर 2389 कोटी 93 लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
4 हजार 892 रुपये प्रति क्विंटल हमीभाव निर्धारीत
केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनचा हमीभाव (किमान आधारभूत किंमत) 4 हजार 892 रुपये प्रति क्विंटल इतका निर्धारित केला आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे याबाबत वेळोवेळी पाठपुरावा देखील केला आहे. यासोबतच या मागणीला समर्थन देणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे देखील मंत्री मुंडे यांनी यावेळी आभार व्यक्त केले आहे.
राज्यात प्रामुख्याने जवळपास 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांना आपण या अनुदानाद्वारे लाभ मिळाला असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. यापुढेही आधार व अन्य माहितीची जसजशी जुळणी होत राहील तसे उर्वरित शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाईल, असेही राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले आहे.