एकच दिवसात देशभरात 22 हजार कोटींची उलाढाल; करवा चौथच्या उत्सवामुळे विक्रेते मालामाल!
देशभरात करवा चौथचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सणासाठी देशभरातील बाजारपेठांमध्ये मोठी उलाढाल झाल्याचे दिसून आले. यामध्ये प्रामुख्याने कपडे, दागिने, मेकअप, पूजा साहित्य आणि भेटवस्तू यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली. सोन्या-चांदीच्या दागिन्यांचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली. परिणामी, बाजारापेठांमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली.
देशभरात 22 हजार कोटींची उलाढाल
दरम्यान, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (सीएआयटी) अंदाजानुसार, करवा चौथच्या मुहूर्तावर देशभरात 22 हजार कोटी रुपयांहून अधिकचा व्यवसाय झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 30 टक्क्यांनी अधिक असल्याचे दिसून आले आहे. दिवाळीपर्यंत सणासुदीच्या काळात देशात 4.25 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होईल, असा अंदाजही कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने व्यक्त केला आहे.
कधी साजरा केला जातो हा सण
हिंदू धर्मात प्रत्येक सण-उत्सव, व्रत-वैकल्याला धार्मिक महत्व आहे. आज 20 ऑक्टोबर 2024 रोजी करवा चौथ व्रत पाळले जात आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिलांकडून रविवारी निर्जळी उपवास करण्यात आला. या दिवशी महिला दिवसभर पाण्याचा एक थेंबही पीत नाहीत. दरवर्षी हा उत्सव कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जातो.
दिवाळीसाठीही ग्राहकांची रेलचेल सुरु
दिवाळी काही दिवसांवर आली आहे. लोक त्याची तयारी करण्यात व्यस्त आहेत. विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. लोक आपली घरे सजवण्यासाठी यातून भरपूर खरेदी करत आहेत. बाजारपेठेत स्वदेशी मालाला अधिक मागणी आहे. सर्वच बाजारपेठांमध्ये मेड इन इंडिया उत्पादनांचा दबदबा आहे. काही ठिकाणी महिला मेहंदी लावत आहेत तर काही ठिकाणी बांगड्या खरेदी करत आहेत. नवनवीन व्हरायटीचे कपडे, शूज आणि घर सजावटीच्या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. मुलांसाठीही अनेक अनोख्या वस्तू आहेत. त्यामुळेच लोक यावेळी दिवाळीची जोरदार तयारी करत आहेत.