बांगलादेशातील पेचप्रसंगाचा संत्रा उत्पादकांना फटका; शेतकऱ्यांसह निर्यातदार चिंतेत!
राज्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. राज्यात प्रामुख्याने नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन होते. बांगलादेशमधून या संत्र्यांला मोठी मागणी असते. दर हंगामात बांगलादेशला अडीच लाख टन संत्र्याची निर्यात होते. पण आता बांगलादेशमधील राजकीय पेचप्रसंगामुळे संत्र्यांची निर्यात थांबली आहे. याचा राज्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे विदर्भातून बांगलादेशला निर्यात होणाऱ्या अडीच लाख टन संत्र्याचे यावर्षी काय करायचे? असा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे.
शेतकऱ्यांसह निर्यातदारही चिंतेत
बांगलादेशात निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगामुळे संत्रा उत्पादक शेतकरी तसेच व्यापारी आणि निर्यातदार सध्या चिंतेत पडले आहेत. बांगलादेशमध्ये गेले काही वर्षं सातत्याने विदर्भातून मोठ्या प्रमाणावर संत्र्याची निर्यात होत होती. गेल्या काही वर्षात बांगलादेशाने भारतातून येणाऱ्या संत्र्यावर भरमसाठ आयात शुल्क लावले असले, तरी बांगलादेशमध्ये विदर्भातील संत्र्याची मागणी कमी झालेली नव्हती.
(फोटो सौजन्य : istock)
हेही वाचा : पेट्रोलनंतर डिझेलमध्येही होणार इथेनॉलचा वापर; ऊस, मका उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा!
त्यामुळे विदर्भातील अनेक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या संत्रा बागांमध्ये लाखो रुपये गुंतवून निर्यात योग्य, दर्जेदार संत्रा उत्पादनासाठी खास प्रयत्न सुरू केले होते. मात्र आता बांगलादेशमधील अस्थिरतेच्या परिस्थितीमुळे बांगलादेशातील एक ही व्यापारी विदर्भातून संत्रा घेऊन जायला तयार नसल्याचे सांगितले जात आहे.
नवीन बाजारपेठ शोधण्यास सरकारने पुढे यावे
यावर्षीच्या हंगामातील संत्रा ऑक्टोबर महिन्यात बाजारात येण्यास सुरुवात होईल. विशेष म्हणजे यंदा संत्र्याचा बहारही चांगला असल्याने, दमदार उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ शोधण्यास मदत करावी, अशी अपेक्षा संत्रा उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदारांकडून करण्यात येत आहे.
चीन, आखाती देशांमध्ये निर्यातीसाठी प्रयत्न करावेत
राजकीय पेचप्रसंगामुळे बांगलादेशमध्ये यावर्षी न जाऊ शकणारा संत्रा चीन किंवा आखाती देशांमध्ये निर्यात करता येऊ शकतो. असे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यासाठी वाणिज्य मंत्री पियुष गोयल तसेच कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एकत्रित प्रयत्न करून, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना येऊ घातलेल्या संकटातून बाहेर काढावे, अशी अपेक्षाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.