अनिल अंबानींना मोठा धक्का; रिलायन्सच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी, शेअर गडगडले!
सिक्युरिटीज ॲन्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) या देशातील भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सर्वोच्च संस्थेने उद्योगपती अनिल अंबानी आणि रिलायन्स होम फायनान्सचे माजी प्रमुख अधिकारी आणि इतर 24 संस्थांवर कंपनीचा निधी वळवल्याबद्दल पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. रोखे बाजारात हे निर्बंध लादण्यात आले असून, सेबीने अनिल अंबानींना 25 कोटी रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. हे संपूर्ण प्रकरण रिलायन्स होम फायनान्सकडून पैसे वळवण्याशी संबंधित आहे. मात्र, आता याचा त्याचा थेट परिणाम अनिल अंबानी यांच्या शेअर बाजारातील सर्वच कंपन्यांंच्या शेअरवर पाहायला मिळत आहे.
शेअर्समध्ये तब्बल १७ टक्क्यांपर्यंत घसरण
सेबीने अनिल अंबानी यांच्यावर कारवाईचा बडगा उगारताच, आज शेअर बाजारात त्यांच्या नेतृत्वाखालील एडीएजी समुहाच्या सर्वच कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. विशेष म्हणजे ही घसरण तब्बल १७ टक्क्यांपर्यंत झाली आहे. शेअर बाजार सुरु होताच अनिल अंबानी यांच्या कंपन्यांचे शेअर उच्च पातळीवर व्यवहार करत होते. मात्र, सेबीच्या कारवाईची माहिती समोर येताच, त्यांच्या कंपन्यांच्या शेअरने मोठी आपटी खाल्ली. विशेष म्हणजे ही आपटी इतकी मोठी होती की अनिल अंबानी यांच्या कंपन्यांच्या शेअरने तब्बल १७ टक्क्यांपर्यंत गटांगळी खाल्ली. गुंतवणूकदारांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.
उच्च पातळीवर असलेले शेअर क्षणात कोसळले
सेबीने अनिल अंबानी यांच्यावर कारवाई केल्याची माहिती समोर येताच, रिलायन्स इन्फ्राचा शेअर 201.99 रुपयांपर्यंत घसरला. जो दिवसाच्या 243.64 रुपयांवर व्यवहार करत होता. अर्थात रिलायन्स इन्फ्राच्या शेअरमध्ये तब्बल 17 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. तर गुरुवारी शेअर बाजार बंद होताना रिलायन्स इन्फ्राचा शेअर 235.71 रुपयांवर व्यवहार करत होता.
दरम्यान, एडीएजी समूहाची दुसरी कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्येही अशीच घसरण पाहायला मिळाली आहे. रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये 5 टक्के घसरण झाल्याने, सध्या हा शेअर लोअर सर्किट अर्थात 34.48 रुपयांपर्यंत कोसळला आहे. तर 38.11 रुपयांच्या दिवसाच्या उच्चांकावरून शेअरमध्ये 9.52 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.
याशिवाय रिलायन्स होम फायनान्सचा शेअर देखील ५.१२ टक्क्यांच्या घसरणीसह, ४.४५ रुपयांच्या लोअर सर्किटवर पोहोचला आहे. त्यामुळे आज शेअर बाजार सुरु होताच, सर्वोच्च 4.92 रुपयांवरून, ४.४५ रुपयांपर्यंत घसरण झाल्याने आज दिवसभरात रिलायन्स होम फायनान्सचा शेअर 9.55 टक्क्यांनी घसरला आहे.