इराण इस्रायल युद्धामुळे नांदेड एलपीजी गॅसचा तुटवडा ग्राहकांना त्रास होत आहे (फोटो - सोशल मीडिया)
Nanded News : नांदेड : आखाती देशांमध्ये युद्ध परिस्थितीमुळे (Iran-Israel War) गॅस, इंधन आणि तेलाची कमतरता भासू लागली आहे. इराण-इस्रायल देशाच्या युद्धाचा परिणाम भारतावर दिसू लागला आहे. अनेक राज्यांमध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. घरगुती गॅस मिळवण्यासाठी देखील अनेक दिवसांची प्रतिक्षा करावी लागत आहे. तर व्यावसायिक गॅस मिळणे देखील बंद झाले आहे. यामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नांदेडमध्ये (Nanded News) देखील याचे परिणाम भोगावे लागत आहे.
नांदेड शहरात घरगुती व व्यावसायिक गॅसच्या संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची गॅस एजन्सींवर गर्दी वाढली आहे. मात्र गॅस बुकिंगसाठी दिलेले दूरध्वनी क्रमांक बंद असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी तर बंद असलेल्या क्रमांकावरच गॅस बुकिंग करण्याचा सल्ला देण्यात येत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅसचा पुरवठा मागील चार दिवसांपासून ठप्प असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हॉटेल, खानावळी आणि गॅसवर चालणाऱ्या व्यवसायांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच कारणामुळे घरगुती गॅसचीही कृत्रिम टंचाई निर्माण इतर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे देखील वाचा : “त्यांना 20 वर्षापासून मारण्याचा प्रयत्न…; फारुख अब्दुल्लांवर हल्ला करणाऱ्याचे धक्कादायक विधान
कर्मचाऱ्यांच्या उडवाउडवीमुळे ग्राहकांना त्रास
या परिस्थितीत अनेक ग्राहक गॅस एजन्सींवर जाऊन पैसे भरून पावती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र एजन्सीकडून ऑनलाईन बुकिंग करण्यास सांगितले जाते. ग्राहकांनी दिलेल्या क्रमांकावर कॉल केल्यास तो नंबर स्विच ऑफ येतो किंवा अस्तित्वात नसल्याचे सांगितले जाते. ही बाब लक्षात आणून दिल्यावर “अर्ध्या तासानंतर प्रयत्न करा, आम्ही काय करू?” अशी उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याची तक्रार ग्राहकांनी केली. भारत गॅसच्या उज्वल गैस कार्यालयात चार-पाच क्रमांक दिले असले तरी त्यापैकी दोन-तीन क्रमांक बंद असून उर्वरित नंबरवर बुकिंग होत नसल्याचे नागरिक सांगतात, गांधी पुतळ्याजवळील महावीर गॅस एजन्सीतही अशीच परिस्थिती असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून जिल्हा पुरवठा विभागाने तातडीने हस्तक्षेप करून गॅस बुकिंगची व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.
हे देखील वाचा : पंचायत समिती सभापती निवडणुकीत भाजपचा झेंडा; पूर्णामध्ये अपक्षाला मिळाला सभापती पदाचा मान
संसदेमध्ये विरोधी पक्षाचे जोरदार आंदोलन
यंदाचे अधिवेशन हे आखाती देशांमधील युद्धामुळे भारतामध्ये निर्माण झालेल्या इंधन टंचाईवरुन गाजले आहे. विरोधकांनी यावरुन सत्ताधाऱ्यांना जोरदार धारेवर धरले आहे. तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिरला (Om Birla) यांच्याविरोधात देखील अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. या मुद्द्यावरुन संसदेतील वातावरण तापले आहे.
संसदेच्या सुरुवातीला विरोधकांनी इंधन टंचाईवरुन पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. या आंदोलनामध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी देखील सहभागी झाले होते. राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये झालेल्या या आंदोलनामध्ये मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.






