"बँकांनी कापले सर्वसामान्यांचे खिसे..!" मिनिमम बॅलन्स नावाखाली कमावलेत 8500 कोटी रुपये
सर्वसामान्य ग्राहकांना बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी एक विशिष्ट रक्कम खात्यावर नेहमी ठेवावी लागते. अशी रक्कम न ठेवल्यास बँका खातेधारकांकडून दंड आकारतात. मात्र, आता बँकांनी खातेधारकांकडून ही रक्कम आकारण्याचा मुद्दा आता थेट संसदेत उपस्थित करण्यात आला. यावर उत्तर देताना केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी मागील पाच वर्षात सरकारी बँकांनी मिनिमम बॅलन्स नसलेल्या खातेधारकांकडून दंडाच्या स्वरूपात 8500 कोटी रुपये इतकी रक्कम वसूल केली आहे. अशी माहिती लोकसभा सभागृहाला दिली आहे.
राहुल गांधींचा ट्विट करत सरकारवर निशाणा
यावर आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात सामान्य जनतेचे खिसे कापले जात आहे. ज्या केंद्र सरकारकडून देशातील उद्योगपतींचे तब्बल 16 लाख कोटींचे रुपये कर्ज माफ केले जाते. त्याच सरकारकडून सर्वसामान्यांच्या खिशातून सरकारी बँका 8500 कोटी रुपये दंड वसूल करतात. हा दंड प्रामुख्याने ज्यांना बँक खात्यात कमी रक्कम ठेवणे शक्य नसते. अशा गरीब जनतेकडून आकारला जातो, असेही राहुल गांधी यांनी लोकसभेत म्हटले आहे.
हेही वाचा : अंबानींच्या अँटिलिया हाऊसचे वीज बिल माहितीये का? आयुष्यभर कमवाल तरी…नाही होणार कमाई!
बड्या बँकांची दंडातून मोठी कमाई
दरम्यान, बँक खात्यात किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल बँका खातेधारकांकडून दंड वसूल करतात. विशेष म्हणजे यात सरकारी बँकांनी गेल्या पाच वर्षांत किमान शिल्लक दंडातून 8500 कोटी रुपये कमावले आहेत. पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक या देशातील मोठ्या सरकारी बँका आहेत. कॅनरा बँक आणि बँक ऑफ इंडियाने किमान शिल्लक रकमेवर दंड आकारून कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षांत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या किमान शिल्लक रकमेच्या दंडामध्ये ३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कोणत्या बँकेने कमावलेत दंडाचे सर्वाधिक रुपये
विशेष म्हणजे देशातील सरकारी बँकांनी वर्ष 2020 ते 2024 या पाच आर्थिक वर्षात किमान शिल्लक दंडातून 8500 कोटी रुपये कमावले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने वर्ष 2019-20 मध्ये किमान शिल्लक दंडातून सर्वाधिक 640 कोटी रुपये कमावले. तर पंजाब नॅशनल बँकेने वर्ष 2023-24 मध्ये 633 कोटी रुपये कमावले. त्याचप्रमाणे 2023-24 या आर्थिक वर्षात बँक ऑफ बडोदाने 387 कोटी रुपये, इंडियन बँकेने 369 कोटी रुपये, कॅनरा बँकेने 284 कोटी रुपये आणि बँक ऑफ इंडियाने 194 कोटी रुपयांची कमाई केली आहे.