शेअर बाजारात लवकरच येणार 'हा' 2000 कोटींचा आयपीओ; गुंतवणुकीची मोठी संधी!
शेतीसाठी ट्रॅक्टर आणि बांधकाम क्षेत्रातील वाहनांसाठी ट्रान्समिशन सिस्टम बनवणारी कॅरारो इंडिया ही कंपनी लवकरच शेअर बाजारात आपला आयपीओ आणणार आहे. यासाठी कंपनीने बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे मसुदा कागदपत्रे दाखल केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी बाजारातून 1811.65 कोटींची उभारणी करणार आहे. यासाठी कंपनीने सेबीकडे आपला प्रस्ताव सादर केला आहे.
ऑफर फॉर सेलद्वारे होणार शेअरची विक्री
इटलीची कॅरारो एस.पी.ए ही कॅरारो इंडिया या कंपनीची उप कंपनी आहे. सेबीकडे दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार, हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेलद्वारे शेअर बाजारात खुला होणार आहे. त्यात एकही शेअर नवीन जारी केला जाणार नाही. अशा स्थितीत बाजारातून उभारलेली संपूर्ण रक्कम कंपनीच्या भागधारकांकडे जाणार आहे. अर्थात या आयपीओची संपूर्ण रक्कम कॅरारो इंटरनॅशनल एसई आणि कॅरारो एसपीएकडे जाणार आहे.
हेही वाचा – अदानी समुह आणखी एक कंपनी खरेदी करणार; 4101 कोटींमध्ये झालीये डील!
कशी आहे कंपनीची आर्थिक स्थिती
कॅरारो इंडियाने आर्थिक वर्ष 2023 मध्ये एकूण 47 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. तर आर्थिक वर्ष 2024 मध्ये हा नफा 29.4 टक्क्यांनी वाढून, 60.60 कोटी रुपये झाला आहे. या आर्थिक वर्षात कंपनीने एकूण 1,770.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीच्या महसुलात 4.40 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये, कंपनीच्या EBITDA मध्ये 27.2 टक्के वाढ नोंदवली गेली असून, ती 128.20 कोटी रुपये झाली आहे. दरम्यान, EBITA मार्जिन 130 आधार अंकांनी वाढून, 7.20 टक्के इतके झाले आहे.
काय करते ही कंपनी
कॅरारो इंडिया 1997 मध्ये सुरु झालेली कंपनी आहे. ही कंपनी शेतीसाठी ट्रॅक्टर आणि बांधकाम क्षेत्रातील विविध उपकरणे बनवते. जसे की बॅकहो लोडर, माती कॉम्पॅक्टर्स, क्रेन, लहान मोटर बॅकहो लोडर आणि सेल्फ-लोडिंग काँक्रीट मिक्सर आणि ट्रॅक्टर आणि शेतीसाठी बांधकाम वाहनांसाठी इतर पार्ट तयार करते. याशिवाय कंपनी अनेक ऑटोमोटिव्ह वाहनांसाठी गीअर्स, शाफ्ट्स, रिंग गीअर्स सारख्या वस्तूंचे उत्पादन आणि पुरवठा करते.
कंपनीचे पुण्यासह महाराष्ट्रात दोन उत्पादन युनिट्स आहेत. ही कंपनी रामकृष्ण फोर्जिंग्स, हॅपी फोर्जिंग्स, ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट, एस्कॉर्ट्स कुबोटा, शेफलर इंडिया, सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्स यांसारख्या कंपन्यांशी स्पर्धा करते.