Indian Economy: 100 आणि 200 रुपयांच्या नोटांबाबत मोठी बातमी! लोक घरात का साठवून ठेवताहेत लहान नोटा? पाहा RBIचा नवा अहवाल ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
RBI currency in circulation data 2026 : भारतामध्ये गेल्या काही वर्षांत युपीआय (UPI) आणि डिजिटल पेमेंटने क्रांती घडवून आणली आहे. भाजी विक्रेत्यापासून ते मोठ्या मॉल्सपर्यंत सर्वत्र लोक क्यूआर कोड स्कॅन करून पैसे देणे पसंत करतात. परंतु, या अत्यंत आधुनिक डिजिटल युगातही भारतीय अर्थव्यवस्था आणि जनमानसात एक अत्यंत धक्कादायक आणि वेगळा ट्रेंड पाहायला मिळत आहे. अलीकडे बाजारात मोठ्या नोटांपेक्षा (५०० रुपये) १०० आणि २०० रुपयांच्या लहान नोटांची मागणी कमालीची वाढली आहे. अनेक नागरिक खबरदारीचा उपाय म्हणून आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपल्या घरात मोठ्या प्रमाणावर १०० आणि २०० रुपयांची रोकड साठवून ठेवत असल्याचे समोर आले आहे.
हा ट्रेंड नेमका काय आहे आणि लोक डिजिटल पेमेंट सोडून पुन्हा एकदा रोकडकडे का वळत आहेत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI Research) ताज्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण ‘करन्सी इन सक्युर्लेशन’ (बाजारात फिरणारे चलन) ऐतिहासिक उच्चांकावर म्हणजेच सुमारे ४३ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यात ५०० रुपयांच्या नोटांसोबतच १०० आणि २०० रुपयांच्या नोटांचा वाटा आणि त्यांची मागणी खूप वेगाने वाढली आहे. याचा अर्थ बाजारात नोटांची कमतरता आहे असा मुळीच नाही, तर लोकांनी स्वतःहून या लहान नोटा आपल्या जवळ बाळगण्यास सुरुवात केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : झोमॅटो, स्विगी आणि कॅब चालकांसाठी मोठी बातमी! आता मिळणार मोफत उपचार अन् अपघात क्लेम; सरकार आणतंय ‘ही’ नवी योजना
आर्थिक तज्ञांच्या मते, सर्वसामान्यांच्या या मानसिकतेमागे जागतिक स्तरावर सुरू असलेला भू-राजकीय तणाव (Geopolitical Tensions) हे सर्वात मोठे कारण आहे. पश्चिम आशियामध्ये म्हणजेच इराण आणि इतर देशांमधील वाढते युद्ध, जागतिक अनिश्चितता आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार यामुळे नागरिक काहीसे चिंतेत आहेत. इतिहासाचा हा नियम आहे की, जेव्हा जेव्हा जागतिक स्तरावर आर्थिक किंवा लष्करी संकट निर्माण होते, तेव्हा लोक बँका किंवा डिजिटल व्यवहारांपेक्षा आपल्या हातात ‘हार्ड कॅश’ (रोख रक्कम) असणे अधिक सुरक्षित मानतात.
कोविड-१९ महामारीच्या काळात जेव्हा अचानक लॉकडाऊन लागला होता, तेव्हा ज्यांच्याकडे रोख रक्कम होती, त्यांना दैनंदिन गरजा पूर्ण करणे सोपे गेले होते. या महामारीने भारतीयांना एक मोठा धडा शिकवला आहे, ज्यामुळे लोकांमध्ये ‘खबरदारीचा उपाय’ (Precautionary Motive) म्हणून रोख रक्कम जवळ ठेवण्याची प्रवृत्ती पुन्हा एकदा बळावली आहे. सायबर हल्ले, इंटरनेट बँकिंगमधील तांत्रिक अडचणी किंवा सर्व्हर डाऊन होण्याच्या भीतीमुळेही अनेक लोक आपल्या खिशात आणि घरात लहान नोटांचा साठा करून ठेवणे पसंत करत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : शेअर बाजारात तेजी; अव्वल 10 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹88,678 कोटींची वाढ, ICICI बँकेची सर्वाधिक झेप
अनेक लोकांच्या मनात अशी भीती निर्माण झाली आहे की, १०० आणि २०० रुपयांच्या नोटांची साठवणूक होत असल्यामुळे बाजारात सुट्ट्या पैशांचा तुटवडा निर्माण होईल का? तर याचे थेट उत्तर ‘नाही’ असे आहे. आरबीआय आणि बँकिंग प्रणालीकडे या नोटांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. किंबहुना, आरबीआयने बँकांना आणि एटीएम ऑपरेटर्सना एक कडक आदेश दिला आहे. या नव्या नियमानुसार, मार्च २०२६ च्या अखेरीस देशातील ९० टक्क्यांहून अधिक एटीएममध्ये १०० किंवा २०२ रुपयांच्या नोटांसाठी किमान एक स्वतंत्र कप्पा (Cassette) असणे अनिवार्य केले आहे. जेणेकरून सूक्ष्म व्यावसायिक, किरकोळ दुकानदार आणि सामान्य नागरिकांना दैनंदिन व्यवहारांसाठी ‘छोट्या नोटा’ सहज मिळू शकतील.
तथापि, तज्ञांनी नागरिकांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. दैनंदिन खर्च आणि वैद्यकीय आणीबाणीसाठी मर्यादित प्रमाणात घरात रोख रक्कम ठेवणे योग्य असले, तरी खूप मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम घरात साठवून ठेवणे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोक्याचे आहे. यामुळे चोरीची भीती तर असतेच, शिवाय त्या पैशांवर मिळणारे व्याजही बुडते. त्यामुळे नागरिकांनी डिजिटल पेमेंटचा वापर सुरू ठेवावा आणि घरात केवळ आवश्यक तेवढीच रोकड बाळगावी, जेणेकरून देशाच्या आर्थिक व्यवस्थेलाही गती मिळत राहील.






