(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
FSSAI ने केलेल्या तपासणीत, त्यांच्या हिंगावरील चुकीच्या लेबलिंगसोबतच, गुणवत्तेशी संबंधित काही दोषही आढळून आले आहेत. याव्यतिरिक्त, एव्हरेस्ट कंपनीच्या एग करी मसाला, चिकन मसाला आणि गरम मसाल्यामध्येही अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचं आढळून आले आहे. या घटनेनंतर, अन्न नियामकाने कंपनीला नोटीस बजावली आहे.
ग्राहकाच्या तक्रारीनंतर देशभरातील प्रमुख ब्रँडच्या हिंगची तपासणी करणाऱ्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणच्या बाजार सर्वेक्षणात एव्हरेस्ट आणि एलजी ब्रँडच्या कंपाउंडेड हिंगचे नमुने निकृष्ट दर्जाचे आढळले आहेत. यानंतर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणने मुंबईतील दोन्ही कंपन्यांच्या युनिटमधून घेतलेल्या नमुन्यांच्या आधारे विक्री प्रतिबंधाचे आदेश दिले आहेत.
FSSAI च्या कारवाईत एव्हरेस्टच्या हिंगामध्ये गडबड जाणवली आहे. त्यावर चुकीचे लेबल लावण्यात आले होते आणि ते निकृष्ट दर्जाचे असल्याचे वर्णन केले होते. इतकेच नाही, तर या मसाल्यांनी नियमांचेही उल्लंघनही झालं होतं. यामध्ये पुढील मसाले दोषी निघाले.
दरम्यान मुंबईतील एव्हरेस्ट आणि एलजी युनिटसह गुजरातमधील एव्हरेस्टच्या युनिटची संयुक्त तपासणी करून नमुने घेण्यात आले. हे नमुनेही निकृष्ट ठरल्याने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणने विक्री थांबविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कंपन्यांना सुधारात्मक कृती आराखडा सादर करण्यास आणि बाजारातील निकृष्ट उत्पादनांचा स्वेच्छेने परतावा घेण्याचा सल्ला दिला आहे.
ही कारवाई अशा वेळी होत आहे, जेव्हा FSSAI ने पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांसाठी पॅकच्या पुढील बाजूस एक नवीन चेतावणी लेबल प्रस्तावित केले आहे. पॅकेजच्या पुढील बाजूस एक चमकदार लाल रंगाचे षटकोनी चिन्ह लावण्याची योजना आहे. हे चिन्ह ग्राहकांना साखर, मीठ किंवा सॅचुरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असलेले खाद्यपदार्थ सहजपणे ओळखण्यास मदत करेल. याचा अर्थ असा की, कोणतेही उत्पादन खरेदी करताना, ग्राहक केवळ पॅकेज पाहून त्यातील धोके सहजपणे समजू शकतील.
अन्न उद्योगानेही नवीन लेबलिंग नियमांबद्दल काही चिंता व्यक्त केली आहे. कोका-कोला, नेस्ले आणि पेप्सिको यांसारख्या प्रमुख कंपन्यांच्या प्रतिनिधी गटांनी प्रस्तावित प्रणालीच्या काही पैलूंवर आक्षेप घेतला आहे. दरम्यान, महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अन्न व्यवसायात गुंतलेल्यांना केवळ नियमांचे पालन करण्यापुरते मर्यादित न राहण्याचे आवाहन केले आहे.






