तब्बल... 84.16 कोटी रुपये पगार, कोण आहेत विजय कुमार; ज्यांची सर्वदूर होतीये चर्चा!
एखाद्या व्यक्तीला वर्षाला ८४.१६ कोटी रुपये अर्थात महिन्याला ७ कोटी रुपये इतका पगार आहे. असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्ही सांगणाऱ्यास वेडा ठरवल्याशिवाय राहणार नाही. कारण एखाद्या कंपनीत महिना ७ सात कोटी पगार म्हणजे ही तितकीशी सोपी बाब नाहीये. मात्र, आता देशातील आयटी कंपनीच्या सीईओंच्या पगारात मोठी वाढ होत आहे. देशातील आघाडीची आयटी कंपनी एचसीएल टेकचे सीईओ विजय कुमार हे देखील सर्वाधिक पगार घेत आहे. विशेष म्हणजे सामान्य कर्मचाऱ्यांपेक्षा तुलनेत त्यांना तब्बल ७०० पट अधिक पगार आहे.
सर्वाधिक पगार घेणारे सीईओ म्हणून ओळख
कोणतीही कंपनी म्हटले की तिचा सीईओ हा ती कंपनी चालवणारा सर्वात महत्वाचा व्यक्ती असतो. कामाचा व्याप आणि कंपनीला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी कंपनीच्या सीईओला पगारही तितका दिला जातो. सीईओ विजय कुमार यांचा वार्षिक पगार ८४.१६ कोटी रुपये इतका आहे. भारतीय आयटी कंपन्यांच्या सीईओमध्ये ते सर्वाधिक पगार घेतात. कंपनीने २२ जुलै रोजी एक अहवाल जारी केला. या अहवालानुसार, त्यांचा पगार दरवर्षी १९१ टक्क्यांनी वाढला आहे.
हेही वाचा : ओला इलेक्ट्रिक कंपनी 6000 कोटींचा आयपीओ लॉन्च करणार; गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी!
वार्षिक ८४.१६ कोटी रुपये मिळतो पगार
कंपनीच्या अहवालानुसार, सी विजय कुमार यांचे मूळ वेतन १६.३९ कोटी रुपये आहे. त्यांना बोनस म्हणून ९.५३ कोटी रुपये दिले जातात. याचसोबत लाँग टर्म इन्सेन्टिव्ह म्हणून १९.७४ कोटी रुपये दिले जातात. त्यांच्या पगारात शेअर्स, भत्ते आणि अनेक इन्सेन्टिव्हचा समावेश आहे. हा सर्व पगार मिळून त्यांना वार्षिक ८४.१६ कोटी रुपये पगार मिळतो. विजय कुमार हे १९९४ पासून एचसीएल कंपनीत काम करत आहेत.
देशातील मोठ्या कंपनीच्या सीईओंचा पगार
सर्वाधिक पगार घेणाऱ्या आयटी कंपन्यांच्या सीईओमध्ये इन्फोसिस कंपनीचे सीईओ दुसऱ्या क्रमांकावर आहे. इन्फोसिस कंपनीचे सीईओ सलील पारेख यांना ६६.२५ कोटी रुपये इतका वार्षिक पगार आहे. त्यानंतर विप्रोचे नवीन सीईओ श्रीनी पल्लिया हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना ५० कोटी रुपये इतका वार्षिक पगार मिळतो.