ओला इलेक्ट्रिक कंपनीचा 6000 कोटींचा आयपीओ लॉन्च करणार; गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी!
अर्थसंकलपाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. मात्र, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार सावरला. ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा नवचैतन्य पसरले आहे. अशातच पुढील आठवड्यात ओला इलेक्ट्रिक या बड्या बाईक कंपनीचा तब्बल ६००० कोटींचा मोठा आयओपी शेअर बाजारात खुला होणार आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी मोठी संधी असणार आहे.
कधी खुला होणार हा आयपीओ?
ओला इलेक्ट्रिक ही देशातील आघाडीची इलेकट्रीक बाईक कंपनी असून, 2 ऑगस्ट ते 6 ऑगस्टदरम्यान कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला असणार आहे. यामध्ये प्रामुख्याने २ ऑगस्टपासून हा आयपीओ खुला असणार आहे. तर ६ ऑगस्ट रोजी बंद होणार आहे. विशेष म्हणजे आयपीओ लॉन्च करणारी ओला ही देशातील पहिली इलेक्ट्रिक वाहन कंपनी ठरणार आहे. मारुतीनंतर ऑटो क्षेत्रातील हा देशातील सर्वात मोठा आयपीओ असणार आहे.
हेही वाचा : 1 ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडणार!
६००० कोटींचा असेल आयपीओ
ओला इलेक्ट्रिकने शनिवारी (ता.२७) स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, कंपनीचा हा आयपीओ 6000 कोटी रुपयांचा असणार आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना नवीन शेअर्ससह विक्रीसाठी ऑफर ऑफ सेलही असणार आहे. कंपनीने 22 डिसेंबर 2023 रोजी बाजार नियामक सेबीकडे आयपीओ कागदपत्रे सादर केली. सेबीने 20 जून रोजी आयपीओ लॉन्च करण्यास मान्यता दिली.
कंपनी आयपीओतून उभारलेल्या पैशातून 1,226 कोटी रुपये भांडवली खर्चासाठी वापरण्यात येणार आहेत. याशिवाय कर्जाची परतफेड करण्यासाठी 800 कोटी रुपये, संशोधन आणि विकासासाठी 1600 कोटी रुपये आणि कंपनीच्या भविष्यातील योजनांवर 350 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.
ओला कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओच्या माध्यमातून ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल 3.79 कोटी शेअर्स विकणार आहेत. हा आकडा कंपनीने सेबीला सादर केलेल्या आयपीओच्या दस्तऐवजापेक्षा सुमारे 20 टक्के कमी आहे. याशिवाय अनेक बडे शेअर होल्डर्सही त्यात आपले स्टॉक विकणार आहेत. ओला अधिकाधिक गुंतवणूकदारांना त्यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करत आहे.