भारतात लवकरच काहीतरी मोठे घडणार? हिंडेनबर्ग रिसर्चची एक पोस्ट, अन् चर्चांना उधाण!
मागील वर्षीचा 24 जानेवारी 2023 हा दिवस भारताच्या इतिहासात लक्षात राहण्यासारखा दिवस आहे. विशेषकरून आशियायातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आणि अदानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदानी यांना तर हा दिवस न विसरता येण्यासारखा आहे. याच दिवशी अमेरिकेची शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहाबद्दल एक रिपोर्ट जारी करत गंभीर घोट्याळ्याचे आरोप केले होते. त्यानंतर केवळ अदानी ग्रुपचेच शेअर्स कोसळले नाहीत, तर संपूर्ण शेअर बाजार हादरला होता. आता याच हिंडनबर्ग रिसर्चने भारताबद्दल आणखी एक मोठा इशारा दिला आहे.
‘एक्स’प्लॅटफॉर्मवर हिंडनबर्ग रिसर्चची पोस्ट
हिंडनबर्ग रिसर्चने आज (ता.10) सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक पोस्ट केली आहे. त्यात हिंडनबर्गने म्हटले आहे की, ‘भारतात लवकरच काही तरी मोठे घडणार आहे’. मात्र, हिंडनबर्गकडून नेमका कोणता खुलासा केला जाणार आहे, याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. हिंडनबर्ग रिसर्चच्या या पोस्टनंतर उद्योग विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे येत्या काळात याचा परिणाम शेअर बाजारावरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Something big soon India
— Hindenburg Research (@HindenburgRes) August 10, 2024
हेही वाचा : बँक ठेवींबाबत अर्थमंत्र्यांनी बँकांना दिले ‘हे’ निर्देश; म्हणाल्या केवळ गरजूंनाच कर्ज…
काय आरोप केले होते हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर?
उद्योगपती गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहातील कंपन्यांविषयी हिंडेनबर्ग रिसर्चने १०६ पानी अहवालात अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले होते. यामध्ये प्रामुख्याने कंपनीने क्षमतेपेक्षा अधिक कर्ज घेतले असून, हे कर्ज मिळवण्यासाठी कंपनीने शेअर्सचे मूल्य फुगवून दाखवले, असा ठपका अहवालात ठेवण्यात आला होता. यासह अनेक आरोप करण्यात आले होते. ज्यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांची भांडवली बाजारात पडझड सुरू झाली होती. एकंदर १२५ अब्ज डॉलरच्या आसपास बाजारमूल्याचा फटका समूहाला बसला होता.
गुंतवणूकदारांवर परिणाम होणार का?
दरम्यान, हिंडनबर्ग रिसर्चच्या निशाण्यावर कोण आहे? हे त्यांच्या एक्सवरील पोस्टवरुन स्पष्ट होत नाहीये. मात्र, हिंडनबर्गच्या अशा प्रकारचा इशारा देण्यामुळे शेअर बाजारतील गुंतवणूकदारांवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इतकेच नाही तर, सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या मनात पुन्हा एकदा अदानी ग्रुपबद्दल संशय निर्माण होऊ शकतो. काही एक्स युजर्सनी पोस्ट वाचल्यानंतर हिंडनबर्गच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. हिंडनबर्ग रिसर्चच्या पोस्टवर यूजर्सनी केलेल्या कमेंटसवरुन ही गोष्ट दिसून येते.