देशात यंदा सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळे यंदा मॉन्सून काळात डाळवर्गीय पिकांचे उत्पादन चांगले राहू शकते. तसेच पुढील महिन्यात तूर, हरभरा आणि उडीद या डाळींच्या आयातीत देखील वाढ होऊ शकते. परिणामी, या डाळींच्या किमती या पुढील महिन्यात कमी होण्याची शक्यता आहे. असे केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या सचिव निधी खरे यांनी म्हटले आहे. तसेच डाळींच्या वाढत्या किंमतींबाबत घाबरुन जाण्याचे कोणतेही कारण नाही. पुढील महिनाभरात डाळींच्या किमती आटोक्यात येतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
मॉन्सूनच्या पावसामुळे दिलासा मिळणार
केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या सचिव निधी खरे यांनी म्हटले आहे की, मागील सहा महिन्यांपासून तूर, हरभरा आणि उडीद डाळींच्या किमती स्थिर राहिल्या आहेत. मात्र, असे असले तरी या सर्व डाळींच्या किमती या उच्च पातळीवर आहेत. याउलट मूग आणि मसूर डाळींच्या किमती काहीशा कमी आहेत. यंदा हवामान विभागाने संपूर्ण मॉन्सून काळात चांगला पाऊस होण्याचे संकेत दिले आहे. ज्याचा घाऊक बाजारातील डाळींच्या किंमतींवर सकारात्मक परिणाम दिसून येत, त्यांच्या दरामध्ये लवकरच घसरण होण्याची शक्यता आहे.
(फोटो सौजन्य : इकोनॉमिक टाइम्स)
हिरव्या पालेभज्यांचे उत्पादन घटले
त्यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की, गेल्या काही काळापासून उन्हाळ्यामुळे हिरव्या पालेभज्यांचे उत्पादन घटले असल्याने, बाजारात कांदा, बटाट्याची मागणी वाढली आहे. ज्यामुळे बटाट्याच्या आणि कांद्याच्या दरात वाढ दिसून येत आहे. केंद्र सरकारने आपल्या राखीव साठ्यांमध्ये शीतगृहांमध्ये कांदा आणि बटाट्याची साठवणूक करून ठेवली आहे. कांदा बटाट्याचे वाढते दर पाहता आवश्यकतेनुसार हा स्टॉक बाहेर काढला जाईल. असेही त्यांनी म्हटले आहे.
महागाई नियंत्रणासाठी सरकारचे प्रयत्न
सचिव निधी खरे यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य ते पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ज्याअंतर्गत भारत चणा डाळ सर्वसामान्यांना 60 रुपये प्रति किलो दराने सर्वसामान्यांना सरकारकडून विक्री केली जात आहे. याशिवाय तूर आणि उडीद डाळींच्या दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारने मागील आर्थिक वर्षात जवळपास 8 लाख टन तुर आणि 6 लाख टन उडीद आयात केला आहे. याशिवाय म्यानमार आणि आफ्रिकी देशांकडून भारताला नियमित स्वरूपात डाळींचा पुरवठा सुरूच आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.