सोने खरेदीत भारतीय महिला आघाडीवर, जगातील 11 टक्के सोने भारतात; वाचा... सर्वाधिक सोने असलेले देश!
भारतात सोन्याच्या दागिन्यांना अधिक महत्त्व दिले जाते. भारतीय लग्न समारंभ असो किंवा मग इतर कार्यक्रम असो, त्यात महिला सोन्याच्या दागिन्यांना पहिली पसंती देतात. याशिवाय आपल्या देशात प्रत्येक घरातील महिलांकडे थोड्या प्रमाणात का होईना सोने हे आढळतेच. विशेष म्हणजे सोन्या-चांदीचे दागिने हे महिलांचा जीव की प्राण असतात. त्यासाठी बऱ्याचदा भावकीचे भांडण होतात. इतकेच नाही तर ग्रामीण भागात भावाने आई-वडिलांकडील सोने न दिल्यामुळे, बहिण भावाच्या नात्यात देखील कटूता आल्याची अनेक प्रकरणे आपल्या ऐकिवात असतात.
सोने म्हणजे श्रीमंती दाखवण्याचे माध्यम
भारतीय संस्कृतीमध्ये सोने म्हणजे श्रीमंती दाखवण्याचे माध्यम आहे. म्हणुनच बऱ्याच समारंभात, लग्न कार्यात किंवा धार्मिक कार्यक्रमांवेळी सोन्याच्या दागिन्यांचा वापर करण्यास महिला पसंती देतात. याच पार्श्वभुमीवर आज आपण भारतातील महिलांकडे नेमके किती सोने आहे हे जाणून घेणार आहोत. याशिवाय जगभरातील कोणत्या देशातील महिलांकडे सर्वाधिक सोने आहे. भारताचा त्या यादीत कितवा क्रमांक लागतो. याबाबतही आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
भारतामध्ये इतर देशांच्या तुलनेत सोन्याच्या दागिन्यांचा वापर अधिक केला जातो. महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत अधिक सोन्याच्या दागिन्यांचा आवड असल्याचे पाहायला मिळते. भारतात काही राज्यांमध्ये धार्मिक कार्यक्रमांमध्ये महिला सर्वाधिक सोन्याच्या दागिने घालतात. तर लग्न कार्यात आणि अन्य समारंभात देखील सोन्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
भारतीय महिलांकडे किती सोने आहे?
जागतिक सोने परिषदेच्या एका रिपोर्टनुसार, भारतातील महिलांच्या जवळ 24 हजार टन सोने आहे. हे सर्वाधिक सोने असल्याचे मानले जाते. सोने परिषदेच्या माहितीनुसार भारतातील महिलांकडील सोने हे जगातील एकूण सोन्यापैकी 11 टक्के इतके आहेत. भारतातील महिला जेवढे सोने वापरतात. ते जगातील सोन्याचा वापर करणाऱ्या इतर टॉप पाच देशांच्या तुलनेत अधिक आहे.
दक्षिणेकडील राज्यांमध्ये सर्वाधिक सोने वापरले जाते
आपल्या देशात सर्वाधिक सोने हे दक्षिण भारतातील महिला वापरतात. दक्षिण भारतात देशातील एकूण सोन्यापैकी 40 टक्के सोने आहे. तामिळनाडू राज्यात सर्वाधिक 28 टक्के सोने आहे. इतर राज्यांच्या तुलनेत तामिळनाडूमध्ये सोन्याचे दागिने सर्वाधिक आहेत.
कोणत्या देशांकडे किती सोने
अमेरिकेकडे 8 हजार टन सोने आहे. जर्मनीकडे 3300 टन सोने आहे. त्यानंतर इटलीजवळ 2450 टन, फ्रान्सकडे 2400 टन, रशियाकडे 1900 टन सोने आहे. भारताने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये ब्रिटनमध्ये ठेवलेले 100 टन सोने देशात परत आणले आहे. 1991 मध्ये भारताकडे परकीय चलन कमी असल्याने देशातील सोने विदेशात ठेवावे लागले होते.