देशभरात दारू होणार स्वस्त; वाचा... केंद्र सरकारने अर्थसंकल्पात काय केलीये महत्वाची तरतूद!
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024-25 साठी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी आयकराच्या नवीन कर प्रणालीत काही बदल करण्याची घोषणा केली आहे. तर मानक वजावटीची, स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवली आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशातच आता देशभरातील मद्यपींच्या जिव्हाळयाचा विषय असलेल्या दारूच्या दरात कपात होईल, यासाठी देखील सरकारकडून महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. ज्यामुळे देशभरात दारुच्या किंमती स्वस्त होण्याची शक्यता आहे.
काय आहे ही घोषणा?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी संसदेत (ता.23) आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थसंकल्पात त्यांनी प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर, यामध्ये प्रामुख्याने सीमा शुल्क, जीएसटीसह इतर करांचा समावेश आहे. या सर्व करांमध्ये बदल होणार असल्याची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे अर्थसंकल्पात एक महत्वाची तरतूद करण्यात आली आहे.
हेही वाचा : हमीभाव कायद्यासाठी सरकारला घेरणार; विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा शेतकरी नेत्यांना शब्द!
काय आहे ही तरतूद?
केंद्र सरकारने कलम-9 मध्ये सुधारणा करत ईएनए हे केंद्रीय जीएसटीच्या परीघा बाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे. ईएनए म्हणजे एक्स्ट्रा न्युट्रल अल्कोहोलचा वापर अल्कोहोल बेव्हरेजेस तयार करण्यासाठी करण्यात येतो. अर्थात सरकारच्या या निर्णयामुळे दारु स्वस्त होण्याची शक्यता आहे. याशिवाय केंद्र सरकारने सीजीएसटीसह इंट्रिग्रेटेड जीएसटी आणि टेरिटेरी जीएसटीमध्ये बदल करणार असल्याचे म्हटले आहे.
परिणामी, सरकारच्या या निर्णयांमुळे देशातंर्गत व्यापार आणि परदेशातून होणारी मद्य आयात यावरील खर्चात कपात होईल. ज्यामुळे दारू स्वस्त होण्यास मदत होणार आहे. आगामी जीएसटी परिषदेच्या बैठकीत याविषयीचे चित्र स्पष्ट होईल. या कपातीचा किती फायदा होईल? याची माहिती पण या बैठकीत समोर येणार आहे.