(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Meesho सारख्या प्लॅटफॉर्मवरून त्वचेची काळजी घेणारी किंवा सौंदर्य प्रसाधने खरेदी करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फार उपयुक्त आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने मीशोवर विकल्या जाणाऱ्या सन फार्मास्युटिकल्सच्या कथित बनावट सनस्क्रीन उत्पादनांची सूची काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. नेमकं काय आहे प्रकरण? तुम्ही तर हे प्रोडक्ट वापरत नाहीत ना?
वास्तविक पाहता, सन फार्मास्युटिकल्सने न्यायालयाला सांगितले की, मीशोवर काही सनस्क्रीन त्यांच्या ब्रँड नावाने विकले जात होते. परंतु कंपनीचे मूळ उत्पादन त्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नव्हते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ‘Belo Photostable’ आणि ‘Photostable Gold’ या नावांनी ग्राहकांना प्लॅटफॉर्मवर बनावट उत्पादने विकली जात होती. इतकेच नाही, तर कंपनीने न्यायालयाला अशा अनेक ऑनलाइन लिंक्सबद्दलही माहिती दिली, ज्यावर मीशोवर त्यांच्या नावाने बनावट उत्पादने लीस्ट होती.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने Meesho ला सूचीबद्ध केलेले सर्व URLs काढून टाकण्याचे कडक आदेश दिले आहे. सन फार्मास्युटिकल्सने म्हटले आहे की, बनावट उत्पादने विकल्याने कंपनीच्या प्रतिमेला हानी पोहोचू शकते आणि कंपनीच्या अस्सल उत्पादनांवरील ग्राहकांचा विश्वास कमी होऊ शकतो.






