गारमेंट कंपनीचा आयपीओ आजपासून खुला; केवळ 20-24 रुपयांमध्ये लावता येईल बोली!
नीलम लिनन्स अँड गारमेंट्स (इंडिया) चा आयपीओ आज म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला आहे. आयपीओद्वारे 13 कोटी रुपये उभे करण्याचा कंपनीचा मानस आहे. यासाठी प्रति शेअर 20-24 रुपये किंमत बँड निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना 12 नोव्हेंबरपर्यंत यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी असणार आहे. या आयपीओमध्ये 54.18 लाख शेअर्सची विक्री केली जाणार आहे.
कुठे वापरला जाणार निधी?
महाराष्ट्रस्थित सॉफ्ट होम फर्निशिंग कंपनी नीलम लिनन्स अँड गारमेंट्स विस्ताराचा एक भाग म्हणून एम्ब्रॉयडरी मशीन खरेदी करण्यासाठी निधीतील 5.57 कोटी रुपये वापरणार आहे. याशिवाय, कर्जाची परतफेड करण्यासाठी 4 कोटी रुपये वापरले जातील. उर्वरित निधी सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरला जाईल. जून 2024 पर्यंत कंपनीचे एकूण कर्ज 75.66 कोटी रुपये होते.
(फोटो सौजन्य – istock)
कसा आहे लाॅटचा आकार
आयपीओमधील 50 टक्के शेअर्स पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, 35 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित 15 टक्के बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. किरकोळ गुंतवणूकदार किमान 6000 शेअर्स आणि त्याच्या पटीत बोली लावू शकतात. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 144,000 रुपये गुंतवावे लागतील.
हे देखील वाचा – 20 नोव्हेंबरला शेअर बाजार बंद राहणार; ‘या’ कारणामुळे शेअर बाजाराला असेल सुट्टी!
शेअर्सचे लिस्टिंग
गुंतवणूकदार 18 नोव्हेंबरपासून एनएसई इमर्जवर नीलम लिननच्या शेअर्समध्ये ट्रेडिंग सुरू करू शकतात. एक्सपर्ट ग्लोबल कन्सल्टंट्स या आयपीओसाठी मर्चंट बँकर म्हणून काम करत आहेत. तर पूर्वा शेअर रजिस्ट्री (इंडिया) रजिस्ट्रार आहेत.
कशी आहे कंपनीची आर्थिक कामगिरी
नीलम लिनन्स अँड गारमेंट्सचा महसूल आर्थिक वर्ष 24 मध्ये किरकोळ घसरून, 102.3 कोटी रुपये झाला आहे. नफा गेल्या वर्षी 103.6 कोटी रुपये होता. त्याच वेळी कंपनीचा करानंतरचा नफा वाढून 2.46 कोटी रुपये झाला, जो एका वर्षापूर्वी 2.38 कोटी रुपये होता. जून 2024 ला संपलेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत नफा 0.8 कोटी रुपये होता आणि महसूल 21.8 कोटी रुपये होता.
हे देखील वाचा – पुढील आठवड्यात खुला होणार ‘हा’ जबरदस्त आयपीओ; वाचा किंमत पट्टा… सर्व डिटेल्स!
नीलम लिनन्सचा व्यवसाय
नीलम लिनन्सने 2023 पासून पुरुष आणि महिलांच्या फॅशन पोशाखांचे उत्पादन सुरू करून परिधान उद्योगात प्रवेश केला. कंपनी प्रामुख्याने बेडशीट्स, पिलो कव्हर्स, ड्युवेट कव्हर्स, टॉवेल, शर्ट्स आणि कपड्यांवर प्रक्रिया करणे, फिनिशिंग करणे आणि सवलतीच्या किरकोळ दुकानांना पुरवठा करते. कंपनीला आयात परवान्यांच्या विक्रीतूनही महसूल मिळतो. आयात परवाना हा मुक्तपणे आयात करण्यायोग्य नसलेल्या वस्तूंच्या आयात करण्यासाठी आवश्यक असलेला सरकारी अधिकृतता आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)