फोटो सौजन्य - Social Media
साल 2010 मध्ये दोन तरुण भाविश अग्रवाल आणि अंकित भाटी यांनी एक वेगळीच कल्पना मांडली. एकदा भाविश कर्नाटकमधून मुंबईला जात असताना त्याला टॅक्सी ड्रायव्हरने अर्ध्या रस्त्यात सोडलं. त्यावेळी त्याच्या मनात विचार आला “आपण अशी एखादी सेवा सुरू का करू नये, जिथे लोक मोबाइलवरून सहजपणे टॅक्सी बुक करू शकतील?” याच कल्पनेतून ओला (Ola) या कॅब स्टार्टअपची सुरुवात झाली.
सुरुवातीला कंपनीचं नाव OlaCabs होतं आणि त्यांच्याकडे फक्त दोनच गाड्या होत्या. त्यांनी एक अॅप तयार केलं ज्यामध्ये ग्राहकांना घरबसल्या टॅक्सी बुक करता येईल. त्या काळात अशा प्रकारचं तंत्रज्ञान भारतात नवीन होतं. त्यामुळे लोकांचा विश्वास मिळवणं हे मोठं आव्हान होतं. ओलाने त्यासाठी मोफत राईड्स, कॅश पेमेंट आणि वेळेवर सेवा देऊन ग्राहकांचं मन जिंकलं.
ड्रायव्हर पार्टनर्ससाठी ओलाने चांगली कमाई, लवचिक वेळ आणि प्रशिक्षणाची सोय केली. त्यामुळे बऱ्याच लोकांनी आपली गाडी ओलाशी जोडली. यामुळे कंपनीचं नेटवर्क वाढत गेलं. लवकरच मुंबई, दिल्लीसह अनेक शहरांमध्ये ओलाने पाय रोवले. ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजांनुसार ओलाने ओला मिनी, ओला शेअर, ओला आउटस्टेशन अशा विविध सेवा सुरू केल्या. नंतर ओलाने ऑटो रिक्षा आणि ई-रिक्शाही अॅपमध्ये समाविष्ट केल्या. या सेवांमुळे ग्रामीण भागातही ओला पोहोचू लागली.
कंपनीने भारताबाहेर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूकेमध्येही सेवा सुरू केली. पुढे ओला इलेक्ट्रिकची स्थापना करून त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या दिशेने पाऊल टाकलं. ओला S1 इलेक्ट्रिक स्कूटरने बाजारात चांगली छाप पाडली. आज ओला ही केवळ कॅब सेवा नाही, तर एक संपूर्ण मोबिलिटी सोल्यूशन बनली आहे. सुरुवातीला अपयश, टीका आणि स्पर्धा यांना तोंड देत ओलाने एक यशस्वी भारतीय स्टार्टअप म्हणून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. भाविश आणि अंकितच्या कल्पनेतून जन्मलेली ही कंपनी आज लाखो लोकांच्या दैनंदिन प्रवासाचा भाग बनली आहे: हीच खरी यशोगाथा!