संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा! (Photo Credit- X)
फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावरच सूर्य तळपू लागल्याने तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी नागरिकांना उष्णतेचा त्रास जाणवू लागला आहे. साधारणपणे फेब्रुवारीत वातावरण आल्हाददायक असते. मात्र यंदा कमाल तापमान ३४ अंशांच्या पुढे गेल्याने दुपारच्या वेळेत उन्हाचा तीव्र चटका जाणवत आहे. सकाळी आणि रात्री गारवा जाणवत असला, तरी दुपारनंतर शहरातील रस्ते, बाजारपेठा आणि वर्दळीच्या भागांत उष्णतेची तीव्रता वाढलेली दिसून येत आहे.
आठ दिवसांपूर्वी सोमवार, १६ रोजी किमान तापमान १६. ९ अंश होते ते रविवार, २२ रोजी २१. ४ अंशांपर्यंत वधारले आहे. पुढील दिवसांत यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान अभ्यासकांच्या मते, ढगाळ वातावरणाचा अभाव, कोरडे हवामान, वार्याचा वेग कमी असणे आणि बदलते हवामान चक्र या कारणांमुळे तापमानात वाढ होत आहे.
दरम्यान, फेब्रुवारीतच अशी स्थिती राहिल्यास मार्च एप्रिलमध्ये उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फेब्रुवारीतच जाणवणारी ही उष्णता आगामी उन्हाळ्यासाठी चिंतेचा इशारा मानली जात असून, नागरिकांनी योग्य खबरदारी घेणे गरजेचे ठरत आहे.
तापमानवाढीचा परिणाम लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, तसेच उन्हात काम करणाऱ्या मजुरांवर अधिक जाणवत आहे. डोकेदुखी, थकवा, अंगाची लाही होणे अशा तक्रारी वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी व द्रवपदार्थ घ्यावेत, हलके व सुती कपडे परिधान करावेत असा सल्ला तज्ञ मंडळींकडून दिला जात आहे.
रविवारी दुपारी उन्हाची काहिली सुरु असताना काही वेळ ढगांनी सूर्य झाकोळला गेला होता. यामुळे अधूनमधून उन्हापासून काहीसा दिलासा मिळाल्याने नागरिकांना हायसे वाटले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनावर असलेल्या पिक नुकसानीचे ओझे कमी झाले.






