कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. महिनाभरापूर्वी २००० रुपये प्रति क्विंटलच्या आत रेंगाळलेले कांदा दर सध्या रोज नवनवीन उच्चांक गाठत आहे. आज रायगड जिल्ह्यातील पेन आणि नागपूर जिल्ह्यातील रामटेक बाजार समितीत कांद्याला ४२०० रुपये प्रति क्विंटल विक्रमी दर मिळाला आहे. तर राज्यातील अन्य बाजार समित्यांमध्ये देखील कांद्याचे दर ३००० ते ४००० रुपये प्रति क्विंटल पातळीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कांदा पिकातून दिलासा मिळताना दिसत आहे.
बाजारात आवक कमी
राज्यात आज नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा आवक कमी झालेली पाहायला मिळाली आहे. यामध्ये प्रामुख्याने पिंपळगाव-बसवंतमध्ये 18000 क्विंटल, लासलगाव-विंचूरमध्ये 12500 क्विंटल, लासलगावमध्ये 11328 क्विंटल आवक झाली आहे. याशिवाय राज्यात महत्वाची कांदा बाजार समिती असलेल्या सोलापुर बाजार समितीत देखील कांद्याची 11793 क्विंटल आवक झाली आहे. अर्थात कांदा दरवाढीमुळे शेतकरी आपला माल बाजारात विक्रीसाठी दरातील चढ-उतारावर लक्ष ठेऊन असल्याचे सांगितले जात आहे.
(फोटो सौजन्य : istock)
काय आहेत प्रमुख बाजार समित्यांमधील दर!
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बाजार समितीत कांद्याला कमाल 3605 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तर लासलगाव बाजार समितीत कांद्याला कमाल 3311 रुपये प्रति क्विंटल, लासलगाव – विंचूर बाजार समितीत कांद्याला कमाल 3411 रुपये प्रति क्विंटल, सोलापूर बाजार समितीत कांद्याला कमाल 3500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. राज्यातील 44 बाजार समित्यांमध्ये आज कांद्याचा लिलाव झाला. यापैकी 34 बाजार समित्यांमध्ये 3000 ते 4200 रुपये प्रतिक्विंटल भाव होता. तर आज कोणत्याही बाजारात भाव 2500 रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमी नव्हता. दरम्यान, आवक कमी असल्यामुळे कांद्याच्या दरात वाढ होत आहे.
शेतकऱ्यांमध्ये पसरले नवचैतन्य
सध्या कांद्याच्या दरात वाढ होत असताना, दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये एक नवचैतन्य पसरले आहे. मात्र, असे असले तरी शेतकऱ्यांकडे मात्र कांदा शिल्लक नाही. त्यामुळे या कांदा दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदा होणार नसल्याचे बोलले जात आहे. मात्र, सध्या ज्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे, त्या शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.