Photo Credit- Social Media केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द
सणासुदीचा काळ आणि काही राज्यांतील विधानसभा निवडणुका पाहता देशभरात कांद्याचे वाढलेले भाव जनतेच्या डोळ्यात पाणी आणणारे आहे. त्यामुळे महागडा कांदा सरकारला अडचणीत आणत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने आपल्या बफर स्टॉकमधून कांद्याची विक्री करून, भाव नियंत्रित ठेवण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील शुल्क हटवले होते, त्यानंतर आता कांद्याच्या भावात पुन्हा वाढ होताना दिसत आहे.
केंद्र सरकारने आपल्या बफर स्टॉकमधून दिल्ली आणि इतर मोठ्या शहरांच्या घाऊक बाजारात कांद्याची विक्री सुरु केली आहे. इतकेच नाही तर आता सरकार देशभरातील अनुदानित किरकोळ बाजारात कांद्याची विक्री करणार आहे. जेणेकरून सर्वसामान्यांना महागड्या कांद्यापासून दिलासा मिळण्यास मदत होईल. असे ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी सांगितले आहे.
(फोटो सौजन्य – istock)
केंद्र सरकार देशभरात ३५ रुपये किलोने कांदा विकण्याचा विचार करत आहे. विशेषत: ज्या शहरांमध्ये भाव वाढले आहेत. अशा सर्व शहरांमध्ये अधिक कांदा विकला जाईल. सरकारकडून निर्यात शुल्क हटवल्यानंतर, कांदा दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता सरकार आपल्याकडील 4.7 लाख टनांचा बफर स्टॉकमधील कांदा बाजारात विक्री करणार आहे. त्यामुळे कांद्याचे भाव नियंत्रणात राहण्यास मदत होण्याची अपेक्षा सरकारला आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, 22 सप्टेंबर रोजी दिल्लीत कांद्याची किरकोळ किंमत 55 रुपये प्रति किलो होती. जी याच कालावधीत वर्षभरापूर्वी 38 रुपये प्रति किलो होती. मात्र, अनेक ठिकाणी किरकोळ बाजारात कांदा ७० रुपये किलोने विकला जात आहे. मुंबईत कांदा दर 58 रुपये प्रति किलो आणि चेन्नईमध्ये 60 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.
सरकार 5 सप्टेंबरपासून दिल्ली आणि इतर राज्यांच्या राजधानीत मोबाईल व्हॅन, NCCF आणि NAFED दुकानांद्वारे 35 रुपये प्रति किलो दराने कांद्याची विक्री करत आहे. खरिपातील कांदा पिकाकडून खूप अपेक्षा आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक पेरणी झाली आहे. पुढील महिन्यापासून खरीपातील कांद्याचा पुरवठा सुरू होईल. असेही ग्राहक व्यवहार सचिव म्हणाले आहे.
ग्राहक व्यवहार सचिवांनी खाद्यतेलांवरील आयात शुल्कात वाढ केल्यानंतर खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाल्याचे मान्य केले, परंतु सरकारने घरगुती शेतकऱ्यांना लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे सांगितले. तुर आणि उडीदचे चांगले उत्पादन आणि डाळींच्या आयातीत वाढ होऊन, येत्या काही महिन्यांत डाळींच्या किमती स्थिर राहण्याची अपेक्षाही निधी खरे यांनी व्यक्त केली आहे.