महिनाभरानंतर पीएम मोदींनी रतन टाटांबाबतच्या आठवणींना दिला उजाळा; म्हणाले... तुम्हांला विसरु शकत नाही!
९ ऑक्टोबर २०२४ रोजी देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले. त्यानंतर आता जवळपास महिनाभराच्या कालावधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रतन टाटा यांचे स्मरणार्थ आपले मनोगत लिहिले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आजही शहरे, गावांपासून ते खेड्यापर्यंत लोकांना तुमची अनुपस्थिती मनापासून जाणवत आहे. उद्योगपती असो, नवोदित उद्योजक असो की व्यावसायिक, त्यांच्या निधनाने सर्वांनाच दु:ख झाले आहे. पर्यावरण रक्षणाशी निगडित…समाजसेवेशी निगडीत असलेल्या लोकांना तुमच्या निधनाने तितकेच दु:ख झाले असून, केवळ भारतच नाही तर जगाला हे दु:ख झाले आहे. असेही मोदी यांनी म्हटले आहे.
रतन टाटा हे तरुणांसाठी प्रेरणास्थान असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या लेखात म्हटले आहे. त्यांचे जीवन, त्यांचे व्यक्तिमत्व आपल्याला आठवण करून देते की, असे कोणतेही स्वप्न नाही जे पूर्ण होऊ शकत नाही. कोणतेही ध्येय नाही जे साध्य केले जाऊ शकत नाही. रतन टाटाजींनी सर्वांना शिकवले आहे की, नम्र स्वभावाने आणि इतरांना मदत करून यश मिळवता येते. असेही मोंदीनी म्हटले आहे.
टाटा समूह बनला प्रामाणिकपणाचा प्रतिक
रतन टाटा हे भारतीय उद्योजकतेच्या उत्कृष्ट परंपरांचे प्रतीक होते. ते विश्वासार्हता, उत्कृष्टता आणि उत्कृष्ट सेवा या मूल्यांचे कट्टर प्रतिनिधी देखील होते. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने जगभरात आदर, प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हतेचे प्रतीक बनून नवीन उंची गाठली. रतन टाटांनी तरुणांच्या स्वप्नांना उघडपणे पाठिंबा दिला, इतरांची स्वप्ने पूर्ण करण्यात मदत करणे हा रतन टाटा यांच्यातील सर्वात अद्भुत गुण होता. अलीकडच्या काळात, ते भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टमला मार्गदर्शन करण्यासाठी आणि भविष्यातील आशादायक उपक्रमांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रसिद्ध झाले आहेत.
हे देखील वाचा – 20 नोव्हेंबरला शेअर बाजार बंद राहणार; ‘या’ कारणामुळे शेअर बाजाराला असेल सुट्टी!
तरुण पिढीसाठी बनले प्रेरणास्त्रोत
भारतातील तरुणांच्या प्रयत्नांना पाठिंबा देऊन, त्यांनी स्वप्न पाहणाऱ्यांच्या नवीन पिढीला जोखीम पत्करण्यास आणि सीमांच्या पलीकडे जाण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्या या पावलामुळे भारतात नवकल्पना आणि उद्योजकतेची संस्कृती विकसित होण्यास मोठी मदत झाली आहे. येत्या काही दशकांमध्ये भारतावर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला नक्कीच दिसेल. असेही मोदी यांनी म्हटले आहे.
याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, रतन टाटा यांच्यासोबत केलेल्या कामांची देखील यावेळी आठवण करून दिली आहे. पंतप्रधान म्हणाले की, आपण जेव्हा केंद्रात आलो तेव्हा त्यांच्यासोबतचे जवळचा संवाद कायम राहिला. रतन टाटा राष्ट्र उभारणीच्या प्रयत्नांमध्ये एक वचनबद्ध भागीदार म्हणून राहिले आहे. याशिवाय चालू वर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला स्वच्छ भारत मिशनच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी दिलेला व्हिडिओ संदेश मला अजूनही आठवतो. एक प्रकारे, हा व्हिडिओ संदेश त्याच्या शेवटच्या सार्वजनिक संवादांपैकी एक आहे. असेही पंतप्रधान मोदी म्हणाले आहे.