फोटो सौजन्य - Social Media
भंगाराच्या व्यवसायातून कोटींचा टर्नओव्हर होऊ शकतो, यावर खूप कमी लोक विश्वास ठेवतील. मात्र ठाणे शहरातील दोन तरुणांनी हे शक्य करून दाखवले आहे. हेनिक गाला आणि श्रेयस जलपूर या मित्रांनी आपल्या बालपणी पाहिलेल्या एका साध्या भंगारवाल्यापासून प्रेरणा घेऊन ‘स्क्रॅपजी’ नावाचं स्टार्टअप सुरू केलं आणि आज लाखोंची उलाढाल करणाऱ्या यशस्वी व्यावसायिकांमध्ये त्यांचं नाव झळकतंय. हेनिक आणि श्रेयस लहान असताना त्यांनी त्यांच्या शाळेजवळ एक भंगारवाला नियमितपणे कचरा वेचताना आणि तौलताना पाहिला. त्याचे काम त्यांच्या मनात खोलवर ठसले. त्यातूनच त्यांना जाणवलं की, कचऱ्याचं व्यवस्थापन ही एक गंभीर समस्या आहे आणि त्यावर उपाय करणं गरजेचं आहे. या जाणिवेच्या पायावर त्यांनी 2023 मध्ये, वयाच्या 26व्या वर्षी, ‘स्क्रॅपजी’ची सुरुवात केली.
‘स्क्रॅपजी’ हे एक तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप आहे, जे घराघरातून कचरा गोळा करतं आणि त्याचं पुनर्वापरासाठी व्यवस्थापन करतं. जुने वर्तमानपत्र, प्लास्टिक, धातू, ई-कचरा इत्यादी वस्तू नागरिकांच्या घरातून गोळा केल्या जातात. या प्रक्रियेसाठी नागरिक वेबसाइट किंवा WhatsApp वरून वेळ ठरवू शकतात. कंपनीचे कर्मचारी ठरलेल्या वेळेला येऊन कचरा तौलतात आणि लगेच पैसे देतात. संकलित कचरा नंतर अधिकृत रीसायकलिंग सेंटरला पाठवला जातो.
आज स्क्रॅपजीचे 2,000 हून अधिक ग्राहक आहेत आणि ते दर महिन्याला सुमारे 10 टन कचरा रीसायकल करतात. विशेष म्हणजे, प्रसिद्ध क्रिकेटपटू दिनेश कार्तिकही या उपक्रमाचा भाग बनले आहेत. ते स्क्रॅपजीचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत आणि त्यांनी या कंपनीत गुंतवणूकही केली आहे. त्यामुळे स्क्रॅपजीला आर्थिक पाठबळ मिळण्यास मदत झाली आहे.
हेनिक आणि श्रेयस यांचं स्वप्न आहे की, 2030 पर्यंत भारत देश कचरामुक्त व्हावा. मात्र ते जाणून आहेत की हे काम एकट्याने शक्य नाही. त्यामुळे त्यांनी स्थानिक कबाड्यांना आपल्या नेटवर्कमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि चांगलं वेतन दिलं जाणार आहे. आज स्क्रॅपजी सात रीसायकलिंग कंपन्यांशी भागीदारी करत आहे. दररोज 10-15 घरे आणि कार्यालयांतून कचरा संकलन केलं जातं. आतापर्यंत त्यांनी 25 लाखांहून अधिक कमाई केली असून 2025 पर्यंत 1 कोटींचा टर्नओव्हर गाठण्याचा त्यांचा निर्धार आहे.